गोवा, 27 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत आज आयोजित पत्रकार परिषदेत द रिव्हर ट्रेन (El Tren Fluvial) या स्पॅनिश चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी संवाद साधला. या चित्रपटाचे निर्माते व्हॅलेंटाईन टोरे आणि अभिनेत्री रिटा पॉल्स यांनी विश्वास, मैत्री आणि संवेदनशीलतेने या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेला कसा आकार दिला, याबद्दलचे अनुभव सांगितले. लोरेन्झो फेरो आणि लुकास ए. व्हिग्नाले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अर्जेंटिनातील या 75 मिनिटांच्या स्पॅनिश कथात्मक चित्रपटाचा (फीचर) भारतातील पहिला प्रीमियर इफ्फी 2026 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात पार पडला.

या चित्रपटाची कथा अर्जेंटिनातील पम्पास प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर घडते. ही कथा नऊ वर्षांच्या मिलोभोवती गुंफलेली आहे. मिलो हा अर्जेंटिनाचे पारंपरिक लोकनृत्य असलेल्या मालाम्बोचे प्रशिक्षण घेत असतो. मात्र, केवळ चित्रपटांमधूनच पाहिलेल्या ब्युनोस आयर्स शहरात रेल्वेने प्रवास करण्याचे त्याचे स्वप्न असते. जेव्हा तो एकटाच या प्रवासासाठी बाहेर पडतो, तेव्हा अनोळखी लोकांच्या भेटी आणि एकाकीपणाचे क्षण त्याला इतरांनी त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांपलीकडचे जग शोधण्यास प्रवृत्त करतात. त्याचा हा प्रवास बालपण, स्वातंत्र्य आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करताना येणाऱ्या आव्हानांचा वेध घेतो.
या चित्रपट प्रकल्पाला मूळात कशी सुरुवात झाली याबद्दलच्या आठवणींनाही टोरे यांनी उजाळा दिला. एक छोटा चित्रपट बनवण्यासाठी मित्रांमध्ये दिलेल्या एका अनौपचारिक निमंत्रणातून या प्रवासाची सुरुवात झाली होती. एका लहानशा उपक्रमातून सुरू झालेला हा प्रवास परस्पर विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांमधून हळूहळू एका कथात्मक चित्रपटात रूपांतरित झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या चित्रपटाने बर्लिन, सॅन सेबॅस्टियन आणि ब्युनोस आयर्स येथील चित्रपट महोत्सवांमधून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत मजल मारल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.

चित्रपटात प्राध्यापिकेची भूमिका साकारणाऱ्या पॉल्स यांनी, यापूर्वी अभिनयाचा कोणताही अनुभव नसलेल्या युवा मालाम्बो नर्तक मिलो बॅरियासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. पारंपरिक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पद्धतींशी या बालकलाकाराने जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा करण्याऐवजी चित्रपटाच्या संपूर्ण चमूने त्याच्या गरजा आणि मनःस्थितीनुसार आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केले, असे त्यांनी सांगितले. या लवचिक दृष्टिकोनामुळे युवा कलाकाराला सर्जनशील प्रक्रियेच्या केंद्रस्थानी राहता आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाच्या दृश्यशैलीविषयी बोलताना निर्मात्यांनी सांगितले की चित्रपटासाठी निवडलेले 4:3 हे आस्पेक्ट रेशो दिग्दर्शकांच्या अभिजात चित्रपटांबद्दलच्या आकर्षणातून प्रेरित आहे. त्याचबरोबर या स्वरूपामुळे चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट मर्यादेत ठेवण्यासही मदत झाली. चित्रपटातील काही भागांमध्ये वापरण्यात आलेली कृष्णधवल दृश्ये जुन्या चित्रपटांच्या वातावरणाची अनुभूती देतात आणि कथानकाला स्वप्न स्वरूप प्रदान करतात.

भविष्यातील योजनांविषयी बोलताना टोरे यांनी सांगितले की दोन भावांच्या कथेवर आधारित 'प्लान दे फुगा' या रोड मुव्ही चित्रपटाचे चित्रीकरण 2027 मध्ये सुरू करण्याची चमूची योजना आहे. तसेच स्पेनमध्ये अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'द रिव्हर ट्रेन' या चित्रपटाविषयी त्यांनी माहिती दिली, आणि भारतात भविष्यात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होतील, अशी आशा व्यक्त केली.
मिलोच्या प्रवासाच्या माध्यमातून ‘द रिव्हर ट्रेन’ हा चित्रपट अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याची आणि जीवनात स्वतःचा मार्ग शोधण्याची सार्वत्रिक मानवी इच्छा अधोरेखित करतो. या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रियाही एक महत्त्वाचा संदेश देते. सर्जनशील महत्त्वाकांक्षेला सहवेदना आणि सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाली तर मर्यादित साधनसामग्रीतूनही अर्थपूर्ण चित्रपटाची निर्मिती होऊ शकते.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अनुष्का सरकार यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/माधुरी पांगे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे