57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 2026 मध्ये व्हर्च्युअल भारत या सत्राच्या माध्यमातून कथाकथनाच्या भारतातील वैविध्यपूर्ण परंपरा आणि भारतीय सिनेमाच्या जागतिक सामर्थ्याचा वेध


भारतीय कथा जगासमोर नेण्यासाठी अस्सल आशय, सर्जनशील स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व भरत बाला आणि धीरज सिंह यांनी केले अधोरेखित

Posted On: 27 NOV 2026 6:27PMby PIB MumbaiRelease ID: 2342838Views: 6

गोवा, 27 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत आज व्हर्च्युअल भारत या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात भारताच्या कथाकथनाच्या वैविध्यपूर्ण परंपरा, सर्जनशील स्वातंत्र्य आणि सिनेमाच्या बदलत्या स्वरूपाचा वेध घेण्यात आला. या सत्रात प्रख्यात चित्रपटकर्मी भरत बाला आणि भारतीय माहिती सेवा (IIS) अधिकारी धीरज सिंह सहभागी झाले होते. धीरज सिंह हे सध्या पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. सोबतच ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. अभिनेत्री, निर्मात्या आणि लेखिका वाणी त्रिपाठी टिकू यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

​चित्रपटकर्मींनी सर्वप्रथम आपल्याच देशातील कथांचा शोध घेऊन त्या जगासमोर आणल्या पाहिजेत 

​भरत बाला यांनी यावेळी आपल्या सर्जनशीलतेच्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगितले. आपण सांगितिक चित्रफिती, लघुपट, कथात्मक चित्रपट, काल्पनिक आणि वास्तववादी आशय यांमध्ये कोणताही भेद करत नाहीत, असे त्यांनी सांगितले. यापैकी प्रत्येक प्रकारात कथाकथन आणि सर्जनशील अभिव्यक्ती केंद्रस्थानी राहिली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

​बाला यांनी गेल्या पाच वर्षांतील आपल्या कामाचाही आढावा घेतला. या काळात त्यांनी देशाच्या अतिशय दुर्गम कानाकोपऱ्यात कॅमेरे नेले. तिथल्या खऱ्या माणसांशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना स्वतःच्या कथा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, असे अनुभव त्यांनी सांगितले. पूर्वग्रहदूषित कथानक लादण्यापेक्षा अस्सल मानवी अनुभव टिपण्यातच चित्रपट निर्मितीचे खरे सार दडलेले आहे, असे त्यांनी नमूद केले.

​क्लाउड आधारित व्यासपीठावर 143 चित्रपट एकत्र उपलब्ध करून देणार्‍या व्हर्च्युअल भारत या उपक्रमांबद्दलही त्यांनी सांगितले. भारतातील अद्वितीय सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता हा न सांगितल्या गेलेल्या कथांचा एक प्रचंड मोठा स्रोत आहे, असे बाला यांनी अधोरेखित केले. जागतिक पटलावर अर्थपूर्ण अस्तित्व निर्माण करण्यासाठी चित्रपटकर्मींनी सर्वप्रथम आपल्याच देशातील कथांचा शोध घेऊन त्या समोर आणल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारत हेच नवे जागतिक केंद्र आहे, असे ते म्हणाले. भारतातील  जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवांतून उगम पावलेल्या अस्सल कथा जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

‘कलात्मक अभिव्यक्तीला मानवी अनुभवांतून बळ मिळते’

सिंह म्हणाले की, चित्रपट महोत्सवांचा उद्देश केवळ चित्रपट दाखवण्यापुरता मर्यादित नसतो. महोत्सव प्रेक्षकांची सिनेमाच्या व्यापक जगाशी ओळख करून देतात, चित्रपट आस्वादाची जाणीव वृद्धिंगत करतात आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना शिकण्याच्या, संवाद साधण्याच्या आणि आपले काम सादर करण्याच्या संधी उपलब्ध करून देतात, असे त्यांनी नमूद केले. 

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया), पुणे आणि अरुणाचल प्रदेश येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTI) या संस्थांच्या विद्यार्थ्यांसह युवा प्रतिभेला सहभागी करून घेण्याच्या इफ्फीच्या  उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, सर्जनशील संधी आणि चित्रपटसृष्टीशी जोडले जाण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा चित्रपट शिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू असल्याचे ते म्हणाले.

या चर्चेत सर्जनशील क्षेत्रांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI – आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वाढता प्रभाव यावरही विचारमंथन झाले. एआयमुळे सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांची जागा घेतली जाईल, या चिंतेबाबत बोलताना सिंह म्हणाले की, घाबरून जाण्याऐवजी निर्मात्यांनी तंत्रज्ञानातील बदलांविषयी जागरूक राहून, त्यानुसार वेळोवेळी आवश्यक बदल करायला हवेत. मानवी सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. कारण कला ही अखेरीस मानवी कल्पनाशक्ती आणि अनुभवांतूनच जन्माला येते, असे त्यांनी अधोरेखित केले.

आपण एआयकडे, विकसित होत असलेले तंत्रज्ञान म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, असे बाला यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामुळे सर्जनशीलतेच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात आणि चित्रपट निर्मात्यांसाठी नवे मार्ग खुले होऊ शकतात, असे ते म्हणाले. मात्र, कथाकथनाचा पाया हा मानवी सर्जनशीलता आणि मौलिकतेतच असतो, यावर त्यांनी भर दिला. तांत्रिक प्रगतीमुळे चित्रपट निर्मात्यांना अधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची आणि मूळ कथाकथनाच्या कक्षा विस्तारण्याची प्रेरणा मिळायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

या चर्चेतून भारतातील विविधतेने नटलेल्या आणि अस्सल कथांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘व्हर्च्युअल भारत’ (Virtual Bharat) यांसारख्या व्यासपीठांचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच, नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे आणि जागतिक चित्रपट क्षेत्रात भारताचे स्थान अधिक भक्कम करणे, यामध्ये चित्रपट महोत्सवांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/तुषार पवार/आशुतोष सावे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342838
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026