गोवा, 27 नोव्हेंबर 2026
एक गाव क्रिकेट या खेळाच्या आधारे एका साम्राज्याशी लढा देते. तीन मित्र मैत्री, हृदयभंग आणि मोठे होतानाच्या अनिश्चिततेतून मार्ग काढतात. आणि एक चित्रपट निर्माता समाजाने अनेकदा दुर्लक्ष केलेल्या महिला आणि वास्तवाकडे आपला कॅमेरा वळवतो. पारंपरिक साच्यातल्या कथांच्या पलीकडच्या कथा मांडणारे हे तीन चित्रपट, आणि त्यांच्यामुळे 2001 हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात उल्लेखनीय वर्षांपैकी एक ठरले.
लगान, दिल चाहता है आणि चांदनी बार या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांनी रूढ परंपरांना आव्हान दिले, नवे मापदंड रचले आणि चित्रपटांच्या माध्यमातून होणार्या संवादाचा सूर बदलला. लगानने बंडखोरीच्या भावनेचा गौरव केला, दिल चाहता है ने एका पिढीची मानसिकता टिपली, आणि चांदनी बारने अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या महिला आणि जीवनाची दखल घ्यायला लावली.
पंचवीस वर्षांनंतर, आशुतोष गोवारीकर, फरहान अख्तर आणि मधुर भांडारकर ही या अपवादात्मक ठरले चित्रपटांमागील सर्जनशील व्यक्तिमत्वे गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी अंतर्गत आयोजित द लेजेंडरी 25 या सत्राच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. चाकोरी मोडण्याचे धाडस करणाऱ्या चित्रपटांचा आणि स्वतःचा मार्ग निवडणाऱ्या निर्मात्यांचा गौरव या सत्रातून केला गेला.
_20261127180901_7bed08.jpeg)
कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत बदल घडवू शकते, मात्र ते मानवी अभिव्यक्तीची जागा घेऊ शकत नाही
आपण सिनेमाला समाजाचे प्रतिबिंब मानतो, अशी भावना चित्रपटकर्मी आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केली. खऱ्या आयुष्यातून टिपलेल्या कथा सांगण्याबद्दलची आपली बांधिलकीही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः न सांगितल्या गेलेल्या कथा आणि दुर्लक्षित होणारे वास्तव समोर आणणाऱ्या कथा सांगण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या काळात चित्रपटसृष्टी महिलांचे वेगळ्या आणि पारंपरिक चौकटीबाहेरील चित्रण स्वीकारण्यास तयार नव्हती, त्या काळात महिला-केंद्रित विषय हाताळताना आलेल्या आव्हानांची आठवण त्यांनी सांगितली. महिलांचे विविध पैलू, त्यांचा हळवेपणा आणि सामर्थ्य यांसह त्यांचे वास्तववादी चित्रण करण्याच्या ठाम भूमिकेतूनच ‘चांदनी बार’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘फॅशन’ यांसारखे चित्रपट साकारल्याचे ते म्हणाले. “ज्या विषयांवर बोलण्यास किंवा त्यांचा शोध घेण्यासही लोक कचरतात, अशा विषयांवर मला नेहमीच चित्रपट बनवायचे होते. पडद्यामागच्या कथा आणि सर्वसामान्यांच्या नजरेपासून दूर राहणारे वास्तव मला नेहमीच आकर्षित करत आले आहे. माझ्यासाठी सिनेमा हा नेहमीच समाजाचा आरसा राहिला आहे. काल्पनिक आणि आदर्शवत चित्रण करण्यापेक्षा मला वास्तव जीवनाचा शोध घ्यायला अधिक आवडतो,” असे ते म्हणाले.

सर्जनशील धैर्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करताना भांडारकर यांनी चित्रपट निर्मात्यांना प्रचलित प्रवाह किंवा प्रेक्षकांच्या अपेक्षांच्या दबावाखाली न येता, स्वतःला महत्त्वाच्या वाटणाऱ्या कथांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. चित्रपट निर्मितीतील तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि दृश्य विशेष प्रभावांमुळे (व्हिज्युअल इफेक्ट्स) दृश्य माध्यमातून कथा मांडण्याच्या नव्या आणि आकर्षक शक्यता निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी मान्य केले. मात्र, सिनेमाला भावनिक खोली देणाऱ्या मानवी घटकाची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“एआय (AI) आणि व्हीएफएक्स (VFX) दृश्य अनुभव निश्चितच समृद्ध करू शकतात आणि चित्रपट निर्मितीच्या कक्षा विस्तारू शकतात, परंतु ते मानवी स्पर्शाची जागा कधीही घेऊ शकत नाहीत. तंत्रज्ञान प्रतिमा तयार करू शकते, पण ते पात्रात प्राण फुंकणाऱ्या मानवी भावना, संवेदनशीलता आणि भावनिक नात्याची पुनरावृत्ती करू शकत नाही,” असेही ते म्हणाले.
“प्रत्येक चित्रपट म्हणजे शून्यापासून सुरुवात. अभिनयाची जादू शब्दांमधील शांततेत दडलेली असते.”
आपल्या सर्जनशील प्रवासाविषयी बोलताना आशुतोष गोवारीकर यांनी प्रत्येक नवीन चित्रपट म्हणजे नव्याने सुरुवात असल्याचे सांगितले. त्यासाठी नवा दृष्टिकोन, मोकळे मन आणि कथाकथनाच्या कलेचा नव्याने शोध घेण्याची तयारी आवश्यक असते, असे ते म्हणाले. अपारंपरिक चित्रपटांसमोरील आव्हानांवर भाष्य करताना ते म्हणाले, “जे काही नवीन, वेगळे किंवा पारंपरिक चौकटीबाहेरचे असते, त्याला आपले प्रेक्षक मिळण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाचे मूल्यमापन केवळ पहिल्या आठवड्याच्या शेवटी झालेल्या कमाईवरून करू नये.”
अभिनयाच्या कलेविषयीचे आपले विचार मांडताना त्यांनी पात्राला जिवंत करण्यासाठी ऐकणे, हावभाव आणि पॉज म्हणजे विशिष्ट पद्धतीनं काहीशा विलंबानं संवादफेक यांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "माझ्या मते, खरा अभिनय पॉजमध्ये दडलेला असतो. ऐकणे हा कलाकाराच्या सर्वात महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे. एखादा क्यू म्हणजे संकेताद्वारे केलेली सूचना कलाकार कसे ऐकतो आणि कसा प्रतिसाद देतो, हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते."

प्रेक्षकांना काय हवे आहे याचा आधीपासून तर्क करण्यापेक्षा चित्रपट निर्मात्यांनी आपल्या कथांवर विश्वास ठेवला पाहिजे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी प्रेक्षकांना स्वतःचा अर्थ लावण्याची मुभा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
"तुमची कथा निर्भयपणे सांगा. तुमचा अहंकार दाराबाहेरच सोडून द्या."
मौलिकता आणि सर्जनशील निर्भयतेचा पुरस्कार करताना फरहान अख्तर यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्याचे आणि स्वतःचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करणाऱ्या कथा सांगण्याचे आवाहन केले. पारंपरिक विचारसरणीच्या पलीकडे जाण्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, "दिग्दर्शक किंवा लेखकाने आपले मन आणि हृदय खुले ठेवले पाहिजे आणि आपला अहंकार मागे ठेवला पाहिजे. निर्भय व्हा, आपल्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जी कथा खरोखर सांगायची आहे, ती सांगा."
पटकथेचे वर्णन "जिवंत आणि श्वास घेणारी गोष्ट" असे करताना फरहान यांनी लेखक, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सामूहिक कल्पनेतून कथा कशी विकसित होत जाते, यावर प्रकाश टाकला. चित्रपट निर्मिती ही एक सांघिक प्रक्रिया आहे, जिथे वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवल्याने कथेला वाढता येते आणि तिला स्वतःचा खरा आवाज सापडतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, अतिरेकी प्रसिद्धीमुळे सिनेमाचे मूळ सार झाकोळले जाऊ देऊ नये, असा इशारा देत त्यांनी अर्थपूर्ण कथानक आणि प्रेक्षकांशी प्रांजल नाते जोडणे याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे, यावर भर दिला.

संवाद शेवटाकडे झुकत असताना, सर्जनशील धैर्य, मौलिक कथनशैली आणि पारंपरिक संकेतांना आव्हान देण्याची तयारी यातूनच श्रेष्ठ सिनेमा घडतो, असा विचार प्रकर्षाने समोर आला. 'लगान', 'दिल चाहता है' आणि 'चांदनी बार' या चित्रपटांनी भारतीय समाजाच्या विविध पैलूंचा वेध घेत सिनेमामधील संवादाची दिशा बदलल्यानंतर पंचवीस वर्षांनी, या चित्रपटांच्या निर्मात्यांनी मानवी अनुभवांवर आधारित कथांची चिरंतन ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली.
'स्टोरीज विदाउट बॉर्डर्स' या संकल्पनेअंतर्गत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भावनेशी सूर जुळवत या चर्चेत असे अधोरेखित करण्यात आले की, सांस्कृतिक किंवा भौगोलिक उगम काहीही असो, अस्सल कथा सीमा ओलांडू शकतात आणि सर्वत्र प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकतात. तंत्रज्ञान चित्रपट निर्मितीचे स्वरूप सातत्याने बदलत असले, तरी अंतिमतः मानवी भावना, सर्जनशील निर्धार आणि कथनकलेची सार्वत्रिकता हेच सिनेमाला चिरकाल टिकणारे आकर्षण देतात.
या सत्राचे सूत्रसंचालन ख्यातनाम अभिनेत्री आणि निर्माती खुशबू सुंदर यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/आशुतोष सावे/शैलेश पाटील/दर्शना राणे