रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश


उत्तराखंडमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या रेल मार्ग प्रकल्पाच्या बांधकामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

Posted On: 27 NOV 2026 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे मुख्य खोदकाम पूर्ण करून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या कामामुळे बोगद्याचे दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले खोदकाम एकमेकांना जोडले गेले आहे. यामध्ये पोर्टल-1 (सुमेरपूर) येथून 4.7 किलोमीटर आणि पोर्टल-2 (मरोरा) येथून 1.79 किलोमीटर खोदकाम करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/reel/DgPfP2Py2co/?evlk=bjFvYXRoMndsMXVy

पोर्टल-1 (T14P1 – टी14पी1) येथे वस्तीखालील भुसभुशीत मातीतून तिहेरी रेल मार्गाच्या बोगद्याचे 110 मीटर लांबीचे खोदकाम करण्यात आले. या बोगद्याच्या वर 20 ते 30 मीटर माती आणि खडकाचा थर होता. सुरक्षितपणे खोदकाम करण्यासाठी पूर्वउत्खनन (प्री-एक्स्कॅव्हेशन) आणि मल्टी-ड्रिफ्टिंग यांसारख्या विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला.

पोर्टल-2 (T14P2 – टी14पी2) येथे 30 ते 35 मीटर खोल मायक्रोपाइल्स, 15 ते 20 मीटर लांबीचे रॉक बोल्ट्स (खडकबंधक सळ्या) आणि कन्सोलिडेशन ग्राउटिंग (भेगाभरण) यांच्या साहाय्याने उतार मजबूत करण्यात आला. मरोरा येथे जमीन खचण्याच्या समस्येवर तसेच जमीन आणि घरे संपादनाशी संबंधित अडचणींवर तोडगा काढल्यानंतर, या उपाययोजनांमुळे मार्च 2024 मध्ये मुख्य बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात करणे शक्य झाले.

बोगद्याच्या आत ताजी हवा खेळती राहावी आणि तापमान नियंत्रित ठेवता यावे, यासाठी पोर्टल-1 कडून करण्यात आलेल्या संपूर्ण 4.7 किलोमीटर खोदकामादरम्यान विशेष हवा खेळती ठेवण्याची यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली होती.

उत्तराखंडमधील रेल मार्ग संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे डोंगराळ भागांतील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. तसेच, भाविक आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे सोपे होऊन प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.


सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2342736) अभ्यागत कक्ष : 16