Posted On:
27 NOV 2026 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026
ऊर्जा मंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेला आज नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. या परिषदेत (27, 28 नोव्हेंबर 2026) 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांचे ऊर्जा मंत्री, वरीष्ठ अधिकारी आणि वीज नियामक सहभागी होणार असून केंद्रिय ऊर्जा आणि गृहबांधणी व नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. 2024 मध्ये राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची परिषद घेण्यात आली होती.
भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख धोरणात्मक प्राधान्यक्रम व अंमलबजावणीतील आव्हाने याबाबत केंद्र व राज्य सरकारे यांना विचारविनिमय करण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध होते. ऊर्जा सुरक्षा भक्कम करणे, ऊर्जा पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि विभागीय सुधारणांना गती देणे यावर परिषदेतील चर्चांचा भर असेल.

परिषदेत सहभागी झालेले राज्यांचे ऊर्जा मंत्री आणि अन्य मान्यवरांचे स्वागत करताना, मनोहर लाल यांनी ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र व राज्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. ते म्हणाले की, ऊर्जानिर्मिती क्षमता विकसित करणे, नवीकरणीय ऊर्जेचा समावेश व राष्ट्रीय ग्रीड भक्कम करण्यामध्ये भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. आता यापुढील टप्प्यामध्ये आपला ऊर्जा क्षेत्राच्या नियोजनाचा दृष्टीकोन अधिक व्यापक असला पाहिजे. यामध्ये निर्मिती, साठवण, वहन व वितरण यांचे एकाच यंत्रणेचे एकमेकांशी जोडले गेलेले घटक म्हणून नियोजन असेल. राज्यांनी ग्राहकांच्या फायद्याच्या स्मार्ट मीटर योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. मंत्री म्हणाले की, राज्यांच्या सहकार्याने व ऊर्जा मंत्रालयाच्या उपक्रमांमुळे दीर्घ काळानंतर डिसकॉम्सनी नफा मिळविला आहे.
देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये आगामी दोन दशकांमध्ये 200 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची संधी असून हे वास्तवात येण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्रितरित्या काम करावे लागेल. आपण यासाठी खाजगी क्षेत्रासोबत मिळून काम केले पाहिजे असे मंत्री म्हणाले.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये डिसकॉमनी एकत्रितपणे पॉझिटीव्ह पीटीए दर्शविल्याबद्दल मनोहर लाल यांनी राज्यांची व डिसकॉम्सची प्रशंसा केली. ते म्हणाले की, आपल्या डिसकॉम्सची आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि धोरण, कार्यवाही व नियमन यात आवश्यक बदल करुन ही स्थिती कायम राहील याची दक्षता आपण घेतली पाहिजे.
परिषदेचा मुख्य उद्देश सांगताना ते म्हणाले की, परिषदेमध्ये ऊर्जा मंत्रालय, राज्ये व अन्य संबंधितांमध्ये संसाधन उपलब्धता (आरए) आराखड्यांबाबत चर्चा व सखोल विचार विनिमय होईल. यामध्ये वेगवान ऊर्जा साठवण यंत्रणा, आंतरराय व राज्यांतर्गत वीजवहन मुद्दे, वीज वितरण कंपन्यांची (डिसकॉम्स) आर्थिक स्थिती, सुधारित वितरण विभाग योजना (आरडीएसएस) यांचा समावेश असून स्मार्ट मीटर बसविणे, फीडर वेगळे करणे, घरगुती विद्युतीकरण आणि आण्विक स्थळांशी संबंधित मुद्द्यांवर भर दिला जाईल.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी सहभागी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अंमलबजावणीतील समस्या, नियामक मुद्दे व केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची किंवा मदतीची आवश्यकता भासू शकेल अशा बाबींसह आपले अनुभव या परिषदेत सांगावेत अशी सूचना केली. धोरण निर्माण करण्यापासून परिणामकारक अंमलबजावणीपर्यंत, पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून उल्लेख करण्याजोगे यश मिळविण्यापर्यंत आणि व्यक्तीगत हस्तक्षेपापासून एकात्मिक व शाश्वत ऊर्जा क्षेत्रापर्यंत विकास करण्यावर आपला एकत्रित भर असला पाहिजे असे ते म्हणाले.
ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानुसार ऊर्जा सुरक्षेपलिकडे जाऊन आपण खऱ्या अर्थाने ऊर्जा आत्मनिर्भरता साध्य केली पाहिजे. गेल्या वर्षी विकासाचा विक्रम नोंदवला गेल्याचे सांगून ते म्हणाले की, भारताची उर्जानिर्मिती क्षमता आता सुमारे 563 गिगावॅट आहे आणि यातील 55 टक्क्यांपेक्षा अधिक अजीवाश्म आहे. गेल्या 12 महिन्यांमध्ये सुमारे 60 गिगावॅट क्षमतेची वृद्धी झाली आणि यातील 87 टक्क्यांपेक्षा जास्त अजीवाश्म आहे असे त्यांनी सांगितले.

28 नोव्हेंबर रोजी होणारा प्रमुख कार्यक्रम म्हणजे मंच नियामक व राज्य वीज नियामक आयोगांमध्ये होणारे (एसइआरसी) संयुक्त सत्र. यामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री एसइआरसींचे अध्यक्ष, राज्यांचे ऊर्जा सचिव आणि मंत्रालयातील अधिकारी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित मुद्य्यांवर सविस्तर चर्चा करतील.
सहभागी राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळम, तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, बिहार आणि झारखंड यांचा समावेश आहे.
दिल्ली, चंडीगड, जम्मू व काश्मीर, लडाख, पुदुचेरी, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि दादरा व नगर हवेली तसेच दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश परिषदेत सहभागी झाले आहेत.

ऊर्जा मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी आणि सहभागी राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीदेखील परिषदेत सहभागी झाले आहेत.
नितीन फुल्लुके/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai