वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची विकासगाथा मजबूत, लवचिक आणि विश्वासार्ह राहिली आहे: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल


गोयल यांनी अधिकाधिक दीर्घकालीन गुंतवणूक आणि एका व्यापक पतपुरवठा परिसंस्थेचे आवाहन केले

भारताच्या महत्त्वाकांक्षी वित्तीय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण वित्तीय साधनांची आवश्यकता आहे यावर गोयल यांनी भर दिला

गोयल यांनी गेल्या 12 वर्षातील आर्थिक सुधारणा, लवचिकता आणि बाजारपेठेच्या विस्ताराच्या अमाप संधी अधोरेखित केल्या

Posted On: 27 NOV 2026 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

जागतिक पटलावर अनिश्चिततेचे सावट असतानाही भारताची विकास गाथा सदैव सशक्त, लवचिक आणि विश्वासार्ह राहिली असून जगाने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज भारत कर्ज भांडवल बाजार शिखर परिषद 2026 ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भारताची आर्थिक कामगिरी, शाश्वत सुधारणा, विस्तारणाऱ्या व्यापारविषयक संधी आणि देशाच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेला पाठबळ देणाऱ्या कर्ज बाजारपेठेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.

भारताने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के विकास दराने प्रगती केली असून दुसऱ्या तिमाहीत देखील वृद्धीचा हा वेग कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सकल स्थायी भांडवल निर्मिती 12 टक्क्यांनी वाढली आहे तर या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये निर्यातीने 570 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठला आहे, असे ते म्हणाले. भारताने निश्चित केलेले 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे, यावर्षी मे महिन्यात ते निश्चित केले गेले तेव्हा ते अकल्पनीय आणि महत्त्वाकांक्षी वाटत होते. सुमारे 19 टक्क्यांची पतवाढ हा विशेषतः पत बाजारांसाठी आणखी एक सकारात्मक निर्देशक होता, असे गोयल यांनी सांगितले. जगात सुरु असलेली दोन युद्ध, तेलाच्या किंमतीतल्या दरवाढीचे धक्के, शुल्क आणि जागतिक व्यापार संधींमधील वारंवार उद्भवणारी अनिश्चितता, सागरी वाहतुकीत येणारे अडथळे आणि हल्ल्यांमुळे बाधित होणारी हवाई वाहतूक या सर्वांवर मात करुन भारताने कमालीची लवचिकता दाखवली आहे. या आव्हानांच्या स्थितीत देखील भारताच्या विकासगाथेवर असलेला जगाचा विश्वास कायम राहिला असून भारताने देखील तो सार्थ करुन दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताने सातत्याने सुधारणात्मक प्रक्रिया राबवल्या, नवीन धोरणे आखली, व्यवसाय सुलभ वातावरण तयार केले आणि उद्योगांशी तसेच इतर संबंधितांशी व्यवहार करण्यासाठी मुक्त द्वार धोरण ठेवले, असे गोयल म्हणाले. केंद्र सरकार पुढील 20 ते  25 वर्षांचे नियोजन करत असून आपल्या कार्यशैलीमध्ये विकसित भारत 2047 अगदी ठामपणे रुजण्याचा दृष्टिकोन आहे तर 30 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे ध्येय आहे. देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला उत्तम दर्जाचे जीवन, चांगले शिक्षण, आरोग्यसेवा आणि अधिक संधी मिळाव्यात, हे सुनिश्चित करणे हा सरकारचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताने अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केले आहेत आणि वस्तू आणि सेवा करप्रणालीला अधिक सुटसुटीत करतानाच कमी करआकारणी करुन नागरिकांची क्रयशक्ती आणि वस्तूंच्या वापराला चालना देत आहे.जीएसटी संकलन सातत्याने वाढत असून ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक महसुलाची नोंद झाली आहे. निर्यातीने देखील ऑक्टोबर महिन्यात विक्रमी कामगिरी केली असून केवळ एका महिन्यात 90 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार करार अद्याप प्रत्यक्षात आले नाहीत. भारत-युरोपिअन युनिअन मुक्त व्यापार करारावर यावर्षीच्या अखेरीस स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असून पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून तो लागू होईल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. भारत-अमेरिका व्यापार करार देखील अंतिम टप्प्यात असून त्याला पूर्णत्व देण्यासाठीची प्रक्रिया आणि त्या दिशेने कार्य सुरु आहे असेही वाणिज्यमंत्री म्हणाले. 

सर्व कर्ज भांडवल बाजारपेठ परिसंस्थेला एकाच व्यासपीठावर आणण्याची कामगिरी केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करताना गोयल म्हणाले की परिषदेची  ‘प्रेरक घटक, शिखर आणि पत' ही संकल्पना काळाशी सुसंगत असून भारताच्या विकासाच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रोखे बाजार आणि पत बाजार यांमध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या बाजारपेठांचे कार्य कर्जदारांच्या विश्वासार्हतेवर आणि आर्थिक व्यवहारांमधील परस्पर विश्वासावर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले.

जगभरातील देशांसोबत भारताची असलेली विश्वासार्ह भागीदारी हा भारताच्या प्राधान्यक्रमावरील तसेच द्विपक्षीय आणि मुक्त व्यापार करारांमधील सहभागाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे गोयल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, 4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सवरून 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेने उपलब्ध करून दिलेल्या संधी आणि भारताने आपल्या जागतिक भागीदारांना दिलेली विश्वासार्ह साथ हे देशाच्या विकासगाथेचे कारक घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी दोन ते तीन दशकांच्या दृष्टीने भारत आता एक पसंतीचा भागीदार, गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण आणि एक विश्वासार्ह सहकारी म्हणून उदयाला आला असल्याचे ते म्हणाले. देशाची विस्तारणारी उत्पादन आणि निर्यात क्षमता, मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेसोबत घडून आलेले एकात्मिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा वेगाने होत असलेला विकास या बाबीही त्यांनी अधोरेखित केल्या.

देशात सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या एकूण संख्येपेक्षा जास्त इमारती भारत आगामी 30 वर्षांत बांधेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यातून पायाभूत सुविधांच्या विकासाची व्याप्ती आणि विविध क्षेत्रांमध्ये निर्माण होत असलेल्या संधींची प्रचिती येते, असे ते म्हणाले.

तेलाच्या वाढत्या किमतींचा अर्थव्यवस्थेवर व्यापक स्वरूपाचा परिणाम होत असला तरी, भारताच्या दीर्घकालीन विकासावर होणारे त्याच्या परिणामांचे मूल्यमापन हे देशाच्या बदलत्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या संदर्भातून होणे गरजेचे आहे असे गोयल यांनी सांगितले. 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भारताकडे आज अधिक परकीय चलन साठा, परदेशात वसलेल्या भारतीय नागरिकांकडून देशात पाठवला जाणारा पैसा (Remittance) आणि थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशाची निर्यात ही 700 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त असून, देशाची एकूण निर्यात या वर्षी 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके असून, यामुळे भारताने जगातील पहिल्या पाच किंवा सहा अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. खरेदी क्षमतेच्या निकषावर भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन सुमारे 18 ते 19 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके आहे. यातून वस्तू आणि सेवा क्षेत्राला सामावून घेण्याची तसेच स्पर्धात्मक किमतीत उत्पादन करण्याची भारताची क्षमता यातून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या सध्याच्या आर्थिक व्याप्तीचा विचार करता, तेलाच्या किमतीतील काही डॉलरचे चढ उतार देशाचे दीर्घकालीन भविष्य ठरवू शकत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. जगातील सर्वात कमी राष्ट्रीय कर्ज असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असून, एकूण कर्जामध्ये बाह्य कर्जाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबींवरून देशाच्या विकासगाथेचे शाश्वत स्वरूप ठळकपणे अधोरेखित होते असे ते म्हणाले. कोविड 19 साथरोगाच्या काळासह प्रत्येकवेळी भारताने जगाप्रती असलेल्या आपल्या आर्थिक उत्तरदायित्वांच्या बाबतीत कधीही कमतरता ठेवलेली नाही, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

देशात व्याजदर अजूनही मध्यम पातळीवर कायम असल्याचे गोयल यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक भवितव्याबद्दलही त्यांनी विश्वास व्यक्त केला. परदेशी गुंतवणूकदार निधी काढून घेत असतानाच्या अस्थिरतेच्या काळातही देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारपेठेला आधार दिल्याचे त्यांनी नमूद केले. देशाची विकासगाथा सुरक्षित, भक्कम, लवचिक आणि विश्वासार्ह आहे असे ते म्हणाले.

देशात घडून आलेले आर्थिक परिवर्तन म्हणजे योगायोग किंवा नशिबाचा भाग नाही, तर विविध क्षेत्रांमध्ये 12 वर्षे सातत्याने केलेल्या सुधारणा आणि परिवर्तनकारी उपक्रमांचे हे यश आहे असे त्यांनी अधोरेखित केले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यसेवा, शिक्षण, उत्तम रस्ते, उत्तम वीज आणि डिजिटल संपर्क जोडणी यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यावर केंद्र सरकारने भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या प्रत्येक गावातील प्रत्येक घराला पाणी पुरवण्यासाठी जल जीवन अभियाना अंतर्गत केल्या जात असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. गेल्या 12 वर्षांत 50 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे हे एक मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पन्न वाढल्यामुळे आणि लोक नवमध्यमवर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गात आल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांचा विकास, वाढती खरेदी आणि आर्थिक विकास, तसेच मुक्त व्यापार करारांमुळे खुल्या होणाऱ्या नवीन बाजारपेठा अशा सर्व घटकांमुळे देशातील उत्पादक, कृषी निर्यातदार, सागरी खाद्य निर्यातदार आणि सेवा पुरवठादारांसाठी संधी निर्माण होतील, असे गोयल यांनी सांगितले. लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी देशात सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्थिर सुधारणा केल्या जात आहेत, यातून देशाच्या प्रगतीचा वेग कायम राखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाला निर्यातीच्या बाबतीत पुढचा टप्पा गाठून देण्याचे आणि मेक इन इंडिया या उपक्रमाला जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी असे आवाहनही गोयल यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला सहभागी होता यावे, यासाठी देशात अधिक मूल्यवर्धन आणि दर्जा सुधारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ तयार करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

भारत जागतिक भागीदार असल्याचे सांगून त्यांनी एफटीएच्या माध्यमातून भारताच्या प्राधान्यकृत बाजारपेठांच्या विस्ताराचा मुद्दा अधोरेखित केला. 2014 पर्यंत भारताने एफटीए केलेल्या देशांचा एकत्रित जीडीपी सुमारे 10 ट्रिलीयन युएसडी इतका होता तर जगाचा जीडीपी 115 ट्रिलियन युएसडी होता. 38 विकसित देशांचा समावेश असलेले नऊ एफटीए गेल्या साडेचार ते पाच वर्षांमध्ये करण्यात आले आणि त्यांचा जीडीपी 60 ट्रिलियन युएसडी इतका आहे असे त्यांनी सांगितले. आधीच्या करारांसह या करारांमुळे भारताकडे आता जागतिक जीडीपीमधील 70 ट्रिलियन युएसडी इतकी व्यापार संधी विविध अर्थव्यवस्थांच्या प्राधान्यकृत बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.

भारत सध्या आणखी आठ किंवा नऊ करारांसाठी वाटाघाटी करत असून बाजारपेठ उपलब्धतेत 15 ट्रिलियन युएसडी इतकी भर पडण्याची अपेक्षा आहे. 115 ते 120 ट्रिलियन युएसडी जीडीपी असलेल्या जागतिक  बाजारपेठेत भारताला एकंदर 85 ट्रिलियन युएसडी इतकी व्यापारसंधी उपलब्ध असेल असे मंत्री गोयल यांनी सांगितले.

या शिखर परिषदेच्या संकल्पनेचा संदर्भ देऊन गोयल म्हणाले की, केंद्र सरकार व खाजगी क्षेत्र उच्च भांडवली खर्चासाठी मान्यता देऊन एकत्रितपणे विकासाच्या नव्या संधींना प्रोत्साहन देत आहे. भारताची विकास गाथा आणि गुंतवणूकीच्या नवीकृत संधी किती आकर्षक आहेत हे पतहमी विकासाच्या चढत्या दिशेतून प्रतिबिंबित होते.

ते म्हणाले की, सेमीकंडक्टर निर्मिती सुविधा, वीजेची ग्रिडस, डेटा सेंटर्स आणि मुंबईजवळ वाढवण येथे सुरू होणारे बंदर या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेत कर्जाची आवश्यकता लक्षणीयरित्या वाढेल. कर्जाच्या बाजारपेठेची भारताच्या विकासासाठी अर्थसहाय्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल असे सांगून मंत्री गोयल यांनी देशातील वित्तपुरवठा यंत्रणेने ही वाढती मागणी, वैविध्य व पुढील दोन ते तीन दशकांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींचा मेळ साधण्याच्या दृष्टीने सज्ज राहावे असे आवाहन केले.

खाजगी भांडवलदार क्षेत्र येत्या काळात भांडवल उभारणीसाठीचा योग्य स्रोत ठरेल.  जागतिक रोखे निर्देशांकांमधील भारताचा समावेश कर्ज बाजारपेठांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असे ते म्हणाले.

भांडवली कर्ज बाजारपेठ परिसंस्थेसाठी पाच प्रमुख प्राधान्यक्रम मंत्री गोयल यांनी सांगितले.

पहिला प्राधान्यक्रम म्हणून त्यांनी मोठ्या भांडवली कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि पायाभूत सुविधा विकासक यांच्यासह रोखे विकणाऱ्या सर्वांना दीर्घ कालावधीच्या प्रकल्पांसह भांडवली खर्चासाठी सर्वात आधी रोखे बाजारपेठेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले. आपल्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण पर्याय त्यांनी विकसित करावेत असे ते म्हणाले.

दुसरा प्राधान्यक्रम सांगताना गुंतवणूकदारांनी दीर्घकालिन कर्ज व व्यापक कर्ज परिसंस्था यांना मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. ते म्हणाले की, विमा कंपन्या, निवृत्तीवेतन कंपन्या, निवृत्तीवेतन निधी, भविष्यनिर्वाह निधी व म्युच्युअल फंड वाढत्या प्रमाणात भांडवल साठवत आहेत. त्यांनी AAA दर्जाच्या साधनांपलिकडे लक्ष घालावे.

तिसरा प्राधान्यक्रम सांगताना बाजारपेठांनी रोख्यांचा व्यवहार सुलभ करावा आणि शेअर बाजाराप्रमाणे व्यवहार तत्काळ होतील यासाठी प्रयत्न कारवेत अशी विनंती त्यांनी केली.

चौथ्या प्राध्यान्यक्रमात त्यांनी निर्यातदार व त्यांचे वित्तपुरवठादार यांनी एफटीए मुळे मिळालेल्या संधींचे गुंतवणूक निर्णयात रुपांतर करावे आणि नव्याने खुल्या झालेल्या बाजारपेठांमध्ये काम करण्याची क्षमता विकसित करावी असे आवाहन केले.  

पाचव्या प्राधान्यक्रमात, सरकार सर्व संबंधितांसोबत काम करण्यास तयार आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि पुढील सुधारणांसाठी त्यांनी आपल्या शिफारसी व सूचना पाठवाव्यात असे सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना मंत्री गोयल यांनी भारताच्या सातत्यपूर्ण विकासाविषयी व लवचिकतेबाबत विश्वास व्यक्त केला. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.    

 


नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के /तुषार पवार /सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342535) अभ्यागत कक्ष : 12