राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये सर्वोच्च न्यायालयातर्फे संविधान दिन कार्यक्रम


न्यायिक स्वातंत्र्य आणि न्यायिक उत्तरदायित्व यांच्यामधील समन्‍वय न्यायव्यवस्थेच्या भूमिकेला बळ मिळते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योग्य वेळी न्याय मिळणे हा ‘न्याय’ या संकल्पनेचाच एक अत्यावश्यक घटक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 26 NOV 2026 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

सर्वोच्च न्यायालयातर्फे नवी दिल्ली येथे आज, दिनांक 26 नोव्हेंबर, 2026 रोजी आयोजित संविधान दिन सोहोळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या.  

याप्रसंगी बोलताना, राष्ट्रपतींनी सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतवासीयांनी आपल्या  संविधानाचा स्वीकार केला. त्यांनी सांगितले की, वर्ष 2015 मध्ये, संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीदिनी , 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या म्हणाल्या की, संविधानाच्या महान शिल्पकाराला आणि संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की सर्वोच्च न्यायालय, उच्च नायालये आणि जिल्हा तसेच कनिष्‍ठ पातळीवरील न्यायालये यांनी आपल्या लोकशाहीच्या वैभवशाली प्रवासामध्ये अनमोल योगदान दिले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी न्यायिक उत्तरदायित्वावर विशेष भर देऊन संविधानाच्या रचनाकारांनी कल्पिलेल्या आदर्शांची अंमलबजावणी केली आहे. न्यायिक स्वातंत्र्य आणि न्यायिक उत्तरदायित्व यांच्यामधील एकतानता -समन्‍वयता यामुळे न्यायव्यवस्थेच्या भूमिकेला बळ मिळत असते, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रपती म्हणाल्या की योग्य वेळी न्याय दिला जाणे- तो मिळणे हा ‘न्याय’ या संकल्पनेचाच एक अत्यावश्यक घटक आहे. वेळेवर न्याय मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी, आपली न्यायव्यवस्था, प्रक्रियांचे सरलीकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग तसेच विशेष न्यायालयांची स्थापना; असे विविध उपक्रम हाती घेत असते. असे प्रयत्न करुनही, प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याचा प्रचंड डोंगर हे आपल्या न्यायदानाच्या प्रणालीसमोरचे मोठे आव्हान आहे, याची त्यांनी नोंद घेतली. न्याय व्यवस्थेच्या प्रत्येक पातळीवर करण्यात येत असलेल्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून या आव्हानावर मात करता येईल असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी आवश्यक साधने प्रत्येकाकडे उपलब्ध असतीलच असे नाही. समान संधीच्या तत्त्वावर प्रत्येकाला न्याय मिळावा, अशी तरतूद आपल्या संविधानात आहे. यामध्ये मोफत कायदेशीर मदतीचाही समावेश आहे. आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणत्याही संकटामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागू नये, हा त्यामागील उद्देश आहे. प्रत्येक नागरिकाला प्रगती करण्याची आणि यशस्वी होण्याची समान संधी मिळेल, हे सुनिश्चित करण्यातच राष्ट्राची खरी प्रगती आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, समाजातील गरीब आणि वंचित घटकांना मिळणाऱ्या कायदेशीर मदतीचा दर्जा आणि तिची विश्वासार्हता याकडेही विशेष लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, देशातील कायदेविषयक शिक्षणात कायद्यांच्या अभ्यासाइतकेच संवेदनशीलता आणि नैतिक मूल्यांनाही महत्त्व दिले गेले पाहिजे.

न्यायाधीश आणि वकील या दोन्ही क्षेत्रांत महिलांचा अधिकाधिक आणि सक्रिय सहभाग वाढल्यास समाज अधिक नि:पक्ष, न्याय्य, समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, असे राष्ट्रपतींनी सांगितले. न्यायदानाच्या प्रक्रियेत समावेशकता, विविधता आणि समतोल राखण्यासाठी महिलांचा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे न्यायाधीश आणि वकील म्हणून महिलांच्या सहभागाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्वसमावेशकता आणि गुणवत्तेला अधिक महत्त्व दिल्यास देशाची न्यायव्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिव्यांग व्यक्ती, ॲसिड हल्ल्यातील पीडित, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींशी संबंधित प्रकरणांना प्राधान्य देऊन, सर्वोच्च न्यायालयाने न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. प्रकरणांची सुनावणी आणि सुनावणीसाठी त्यांची यादी निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, डिजिटल परिवर्तनाला दिलेले प्रोत्साहन आणि वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यांचेही त्यांनी कौतुक केले. घटना समितीच्या सदस्यांनी न्यायव्यवस्थेच्या तरतुदी तयार करताना ज्या उदात्त आदर्शांचा विचार केला होता, ते आदर्श आपली न्यायव्यवस्था भविष्यातही जपेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

 

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342298) अभ्यागत कक्ष : 4