57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

"प्रामाणिक राहा, संयम बाळगा आणि आपल्या कलेशी एकनिष्ठ राहा": इफ्फी 2026 मास्टरक्लासमध्ये मुकेश छाब्रा यांनी उलगडली कास्टिंग आणि अभिनयाची गुपिते


"देशासाठी ऑस्कर पुरस्कार हेच माझे ध्येय आहे" : मुकेश छाब्रा

अभिनयाला वयाचे बंधन नाही: चित्रपटसृष्टीला 40, 50 आणि 60 च्या दशकातील कलाकारांची गरज असल्याचे मुकेश छाब्रा यांचे प्रतिपादन

Posted On: 26 NOV 2026 4:45PMby PIB MumbaiRelease ID: 2342185Views: 12

गोवा, 26 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज आयोजित करण्यात आलेल्या 'द कास्टिंग मॅजिक: ऑडिशन्स अनप्लग्ड' या हाऊसफुल्ल मास्टरक्लासदरम्यान प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी नवोदित कलाकारांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले आणि व्यावहारिक टिप्स दिल्या. या सत्राला नवोदित कलाकार, करिअरच्या मध्यावर अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणारे व्यावसायिक, लेखक, उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि माध्यम प्रतिनिधींचा उत्स्फूर्त आणि वैविध्यपूर्ण प्रतिसाद लाभला. देशभरातून आलेल्या अभ्यागतांसह गोव्यातील स्थानिक रसिकही या सत्रात मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगला अभिनेता कसे बनावे, ऑडिशन कशी यशस्वी करावी आणि कास्टिंगच्या जगातील बारकावे कसे समजून घ्यावेत, यावर उपस्थितांनी छाब्रा यांना विविध प्रश्न विचारून उत्स्फूर्त संवाद साधला. 

छाब्रा यांच्याविषयी बोलताना महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर म्हणाले, "मुकेश यांच्यात पात्राची पारख करण्याची उत्तम दृष्टी आहे, आणि भूमिकेला साजेसा कलाकार शोधण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, त्यांची ही गोष्ट मला विशेष आवडते."

300 हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजचे कास्टिंग करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या छाब्रा यांनी कास्टिंगच्या या विस्तृत आणि अनेकदा अत्यंत कष्टाच्या प्रक्रियेची झलक उपस्थितांसमोर मांडली. योग्य कलाकाराचा शोध घेणे हे केवळ डेटाबेस किंवा परिचित चेहरे पाहण्यापलीकडचे काम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, "आपल्या देशात प्रचंड प्रतिभा आहे. पूर्वी जेव्हा कास्टिंग दिग्दर्शक नव्हते, तेव्हा कलाकार शोधणे कठीण असायचे. मी प्रतिभेचा शोध घेण्यासाठी माझी टीम सर्वत्र पाठवतो. तुम्हाला मुळाशी जावे लागते. आपल्या देशात अनेक सांस्कृतिक कला आणि उप-संस्कृती आहेत, जिथे अस्सल आणि नैसर्गिक प्रतिभा पाहायला मिळते."

कास्टिंगमधील आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना मुकेश छाब्रा यांनी सांगितले की, पटकथा  तयार झाल्यानंतर दिग्दर्शक सर्वप्रथम त्यांच्याशीच संपर्क साधतात. ते सर्वप्रथम पटकथेचे सखोल वाचन करतात आणि पात्रे व दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर चर्चा करतात. पुढील टप्प्यात त्या भूमिकेसाठी प्रस्थापित कलाकाराची गरज आहे की नवीन चेहऱ्याची, हे ठरवले जाते आणि त्यानंतर कथेच्या पार्श्वभूमीशी संबंधित प्रदेशात प्रवास करून स्थानिक समुदायांमधून प्रतिभावान कलाकारांचा शोध घेतला जातो. पात्र समजून घेणे, योग्य व्यक्तिमत्त्व ओळखणे आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला साजेसा कलाकार सुचवणे हे आपले काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःचे वर्णन अभिनेता आणि दिग्दर्शक यांतील दुवा असे करताना ते म्हणाले, "दिग्दर्शक मला माझ्या मतासाठी आणि कल्पनांच्या नाविन्यासाठी कामावर घेतात, माझ्याकडील डेटासाठी नाही."

या प्रक्रियेची व्याप्ती प्रचंड असू शकते. दंगल या चित्रपटाच्या पात्रयोजनेची आठवण काढत छाब्रा यांनी सांगितले की या चित्रपटासाठी अभिनेत्यांची निवड करण्यासाठी जवळजवळ दोन वर्षे लागली आणि मुलींच्या भूमिकांसाठी सुमारे 14,000 मुलींची ऑडीशन घ्यावी लागली. ते म्हणाले की, रामायण या चित्रपटातील भूमिकांसाठी कलाकार निवडण्याची प्रक्रिया सहा वर्षे चालली. त्यांच्या कारकिर्दीला महत्त्वाचे वळण देणाऱ्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी 384 जणांना भूमिका दिल्याची आठवण सांगत ते म्हणाले, “गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाने माझे आयुष बदलून टाकले.”

नामवंत चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याचा अनुभव प्रेक्षकांशी सामायिक करत मुकेश छाब्रा म्हणाले की प्रत्येक दिग्दर्शकाची एक विशिष्ट दृष्टी आणि दृष्टीकोन असतो. आणि चित्रपट निर्मात्याच्या कल्पनेतील पात्राला अनुरूप ठरेल असा कलाकार निवडणे ही माझी जबाबदारी आहे.कधीकधी कलाकार निवडीची प्रक्रिया लेखनाला देखील प्रभावित करते अशी माहिती त्यांनी दिली. ‘काय पो चे!’ या चित्रपटाचे उदाहरण घेऊन, त्यातील गट्टूची भूमिका अभिनेता राजकुमार राव यांना डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारे लिहिली गेली हे त्यांनी सांगितले. नवाझुद्दिन सिद्दिकी आणि मनोज बाजपेयी यांच्यासारखे प्रतिभावान अभिनेते स्वतःच्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर त्यांच्या भूमिका रंगवतात आणि दिग्दर्शकांना कशा प्रकारे पुनर्विचार करत भूमिका नव्याने घडवायची प्रेरणा देतात , हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

चित्रपटसृष्टीतील दोन दशकांहून अधिक कालावधीच्या स्वतःच्या प्रवासाबद्दल विचार व्यक्त करत, अभिनेते आमीर खान कशा प्रकारे त्यांच्या कामाची पहिल्यांदा दखल घेणाऱ्या काही व्यक्तींपैकी होता याबद्दल छाब्रा यांनी माहिती दिली. मुकेश म्हणाले की नवनव्या प्रतिभावंतांचा शोध लावण्याच्या चिरंतन आवडीमुळेच त्यांच्या या प्रवासाला प्रेरणा मिळाली. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये 100 पेक्षा जास्त चित्रपटांचे काम सुरु असताना, ते कलाकार निवडीच्या प्रक्रियेमध्ये खोलवर गुंतलेले असणार आहेत, असेही ते म्हणाले. 

पात्रयोजना दिग्दर्शकाची विस्तृत दृष्टी

पात्रयोजना करणे ही सतत विकसित होणारी प्रक्रिया असून प्रत्येक चित्रपट आणि पटकथेनुसार कलाकारांची गरज बदलत जाते असे छाब्रा यांनी नमूद केले. एखाद्या भूमिकेसाठी अधिक योग्य कलाकार सापडल्यास, अगदी शेवटच्या क्षणी देखील आधी निवडलेल्या कलाकाराला बदलले जाते. असे निर्णय हा सर्जनशील प्रक्रियेचा भाग असतात आणि चित्रपटाच्या गरजेनुसार ते घ्यावे लागतात असे मुकेश यांनी स्पष्ट केले.

छाब्रा यांच्यासाठी पात्रयोजना हा केवळ एक व्यवसाय नसून ती जगण्याची पद्धत आहे. “पात्रयोजना हे माझ्यासाठी केवळ एक काम नाही, मी जगण्यासाठी ते करतो, हेच माझे जीवन आहे. आपल्या देशासाठी ऑस्कर जिंकणे हे माझे लक्ष्य आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे करतो,” ते म्हणाले.

“नकार हा या प्रवासाचा एक भाग आहे”

होतकरु कलाकारांमध्ये असलेल्या सर्वात गंभीर चिंतांपैकी एका चिंतेबाबत मत व्यक्त करताना छाब्रा यांनी नकार मिळण्याबद्दल आणि लवचिकता धारण करण्याच्या महत्त्वाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. “नकार हा तुमच्या जीवनाचा एक भाग आहे, तुम्हाला ते पचवावे लागतील. आम्हाला एखाद्या भूमिकेसाठी योग्य प्रतिभावंत निवडायचा असतो. जर तुम्हाला सदासर्वदा नाकारलेले आणि दुःखी वाटत असेल, तर तुम्ही बऱ्याच संधी गमवाल,” ते म्हणाले.

स्वतःच्या अनुभवांवरून ते म्हणाले की, चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास कधीच सोपा नव्हता. त्यांनी सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, त्यावेळी देखील मुख्यतः पात्रयोजनेशी संबंधित कामे केली आणि स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी अनेक वर्षे व्यतीत केली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, अनेक दिग्दर्शकांनी त्यांना नकार दिला अशी आठवण सांगत छाब्रा पुढे म्हणाले की त्यापैकीच अनेक चित्रपट निर्माते आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. “प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. मला माझ्या दुःखी कथेबद्दल बोलायचं नाहीये, पण खरोखर खूप त्रास सहन करावा लागला,” ते म्हणाले.

आपल्या करिअरच्या संथ गतीमुळे निराश होण्याऐवजी संयम, सकारात्मकता आणि आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा कायम ठेवावी, असा सल्ला त्यांनी नवोदित कलाकारांना दिला. “तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अभिनय करू शकता, तर ते काम करा. आत्मविश्वासाने करत राहा,” असे ते म्हणाले. अभिनयाला वयाचे बंधन नसते, हे त्यांनी अधोरेखित केले. “अभिनयाचा वयाशी काहीही संबंध नाही, केवळ प्रतिभा महत्त्वाची असते.” असे ते म्हणाले. वयाची चाळीशी, पन्नाशी आणि साठी ओलांडलेल्या लोकांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. चित्रपटसृष्टीला प्रत्येक पिढ्यांमधील कलाकारांची गरज आहे, असे ते म्हणाले.

एखाद्या कलाकाराला वेगळे काय बनवते?

छाबरा यांच्या मते, एखाद्या भूमिकेसाठी योग्य कलाकाराची निवड करताना केवळ प्रतिभा हाच एकमेव विचार नसतो. व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि दिग्दर्शकाच्या सूचनांनुसार काम करण्याची क्षमता या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. “कलाकार दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनानुसार काम करू शकणारा असावा. दिग्दर्शकाच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणा आणि सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले. "जर तुम्हाला जीवन आणि मानवी भावना समजल्या, तर तुम्हाला अभिनयही समजतो," असेही ते म्हणाले.

एखाद्या भूमिकेसाठीच्या ऑडिशनमध्ये यशस्वी कसे व्हावे?

ऑडिशनला जाणाऱ्या सर्व नवोदित कलाकारांनी आपली व्यक्तिरेखा आणि तिची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे, असा सल्ला छाबरा यांनी दिला. "मनातल्या मनात दृश्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. कलाकाराची आकलन शक्ती जाणून घेणे आम्हाला अपेक्षित असते. त्यामुळे कृपया भूमिकेचा सखोल अभ्यास करूनच या”, असे ते म्हणाले.

सेल्फ-टीप्सबद्दल बोलताना, छाबरा यांनी पार्श्वभूमी स्वच्छ, साधी आणि नीटनेटकी ठेवण्याची, अनावश्यक मेकअप टाळण्याची आणि अभिनयावरच लक्ष केंद्रित राहील याची खात्री करण्याची शिफारस केली. अभिनेत्यासोबत संवाद वाचणाऱ्या व्यक्तीने योग्य वेळी समजासाठी संकेत द्यावेत. तसेच फ्रेमिंगमध्ये कलाकाराचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे टिपणारा क्लोज-अप शॉट असावा, असेही त्यांनी सांगितले.

तरुण कलाकारांनी समाज माध्यमांवर  सतत मिळणाऱ्या कौतुकाच्या किंवा मान्यतेच्या मागे लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला. त्याऐवजी कलाकारांनी आपली कला सुधारण्यावर, आत्मविश्वास वाढवण्यावर आणि अनुभव मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले. नाट्यक्षेत्र हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अभिनय कौशल्ये सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले. नवोदित कलाकारांनी त्यांचे वय किंवा पूर्वीच्या अनुभवाची अट विचारात न घेता, नाट्यगटांमध्ये सामील व्हावे आणि रंगमंचावरील सादरीकरणांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नवोदित कलाकारांनी आपली निरागसता आणि प्रामाणिकपणा जपावा, शिकण्यासाठी कटिबद्ध राहावे आणि अधीरता किंवा त्वरित प्रसिद्धीच्या हव्यासात आपला प्रवास भरकटू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. “हा सगळा संयम आणि सकारात्मकतेचा खेळ आहे. जर ते तुमच्यासाठी असेल, तर ते तुमच्याकडे नक्कीच येईल," असे ते म्हणाले. "नैसर्गिक आणि साधे राहा" - हा आणखी एक मंत्र त्यांनी नवोदित कलाकारांना दिला.

या मास्टरक्लासमधून एक महत्त्वाचा संदेश  नवोदितांना मिळाला - पडद्यावरील प्रत्येक अविस्मरणीय व्यक्तिरेखेमागे शोध, पूर्वतयारी आणि सामूहिक प्रयत्नांची एक कष्टदायक प्रक्रिया दडलेली असते. आणि प्रत्येक महत्त्वाकांक्षी कलाकाराचा हा प्रवास लोकांना समजून घेणे, कलेचा आदर करणे आणि योग्य भूमिकेची वाट पाहण्याचा संयम बाळगण्याने सुरू होतो.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/शैलेश पाटील/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342185
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026