संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे 66 व्या एनडीसी अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि समारोप समारंभाला संरक्षणमंत्र्यांनी केले संबोधित


बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ धोक्यांना प्रत्युत्तर देतानाच भविष्यातील सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज राहणे ही काळाची गरज : राजनाथ सिंह

Posted On: 26 NOV 2026 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे आणि युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या तात्काळ धोक्यांना प्रभावी प्रत्युत्तर देत असतानाच, भविष्यातील धोक्यांचा वेध घेणे, पर्यायी परिस्थितींचा अभ्यास करणे आणि भविष्यातील सुरक्षा वातावरणासाठी संस्थांना सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी केले आहे. 26 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे 66 व्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय (एनडीसी) अभ्यासक्रमाच्या दीक्षांत आणि समारोप समारंभाला ते आज संबोधित करत होते. जागतिक सत्तासंतुलनातील बदल, धोरणात्मक प्रभावाच्या नवीन केंद्रांचा उदय आणि पारंपरिक युतींची पुनर्रचना, तसेच संघर्षाचे बदलते स्वरूप यामुळे सुरक्षा वातावरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे, असे ते म्हणाले.

पारंपरिक लष्करी धोक्यांसोबतच सायबर हल्ले, चुकीची माहिती पसरवणे, आर्थिक दबाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि संमिश्र युद्धाचे (हायब्रीड वॉरफेअर) इतर प्रकार वाढत्या प्रमाणात एकत्र पाहायला मिळत आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी पुढे नमूद केले.  यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, तसेच शांतता आणि संघर्ष यांतील सीमारेषा धूसर होत आहेत. भारताचे भौगोलिक स्थान, विस्तीर्ण भूसीमा, सागरी हितसंबंध आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे भारत एका गुंतागुंतीच्या धोरणात्मक वातावरणात उभा असून त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेबाबत दूरदृष्टीचा दृष्टिकोन बाळगणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

धोरणात्मक शिक्षणाची राष्ट्रीय सुरक्षा धोरणनिर्मितीशी सांगड घालण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि  संरक्षण दले, नागरी सेवा आणि मित्र देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सामूहिक व्यावसायिक अनुभव आणि बौद्धिक क्षमता एकत्र आणण्यासाठी एनडीसी एक बहुमूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, असे सांगितले. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणनिर्मितीत थेट योगदान देण्यासाठी या बौद्धिक संपदेचा अधिक व्यापक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक अभ्यासक्रमादरम्यान सखोल अभ्यासासाठी काही महत्त्वाची समकालीन राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने निश्चित करण्यासाठी एनडीसीने संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून एक संस्थात्मक यंत्रणा उभारावी, अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी केली.

परस्परांशी अधिक जोडल्या गेलेल्या जगात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना  राजनाथ सिंह म्हणाले,  "सार्वभौमत्वाचा आदर, परस्पर विश्वास आणि सामायिक जबाबदाऱ्यांवर आधारित सहकार्याच्या दृष्टिकोनातून अशा आव्हानांना सामोरे जाण्यावर भारताचा विश्वास आहे."

66 व्या एनडीसी (NDC) अभ्यासक्रमाविषयी

हा अभ्यासक्रम दरवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 47 आठवडे चालवला जातो आणि तो सहा अभ्यासांमध्ये  विभागलेला असतो.

या अभ्यासक्रमात भारत आणि परदेशातील अधिकाऱ्यांसह एकूण 122 अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय संरक्षण दले, भारतीय नागरी सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि शासनाच्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341988) अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein: English , Urdu , Nepali , Assamese