इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान क्षमता अधिक बळकट करण्यासाठी 'चॅरिएट-1' फाउंडेशन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले


भारतात स्वदेशी संशोधनातून विकसित केलेल्या चॅरिएट-1 मध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील विविध भाषांच्या अनुषंगाने बहुभाषिक भाषा प्रक्रिया आणि वाणी निर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साध्य केली आहे.

भारतात स्वदेशी संशोधनाच्या माध्यमातून विकसित झालेल्या ‘चॅरिएट -1’ ने भारताच्या भाषिक विविधतेला अनुरूप नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने बहुभाषिक भाषा प्रक्रिया आणि वाणी निर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे

Posted On: 26 NOV 2026 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

भारतातील स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान परिसंस्था अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात एक उल्लेखनीय टप्पा  गाठत  इंडिया एआय मिशन अंतर्गत चॅरिएट आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्राइवेट लिमिटेडने भारतात विकसित केलेले  'चॅरिएट -1' फाउंडेशन मॉडेल्स  लॉन्च करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस.कृष्णन यांनीमॉडेल्सचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे या मॉडेलचे उदघाटन आणि अनावरण झाले. स्वदेशी संशोधन आणि नवोन्मेषाच्या आविष्कारातून एक स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याची भारताची वाढती क्षमता यातून दिसून येते.

सार्वभौम पायाभूत मॉडेल विकसित करण्यासाठी इंडिया एआय मिशन अंतर्गत निवड झालेल्या पहिल्या चार संघांमध्ये चॅरिएट आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रा. लि. चा समावेश आहे. भारतातच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक क्षमतांना सामर्थ्य प्रदान करणे, प्रगत संशोधनाला पाठिंबा देणे आणि भारतातील विशिष्ट तांत्रिक, भाषिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण एआय मॉडेल विकसित करण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते.

चॅरिएट-1 मॉडेल संचामध्ये चॅरिएट-1 लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) आणि चॅरिएट-1 टेक्स्ट-टू-स्पीच (TTS) यांचा समावेश आहे. ही दोन्ही मॉडेल्स भारतातच मूलभूत स्तरापासून प्रशिक्षण देऊन विकसित करण्यात आली आहेत. भाषा समजून घेण्याची क्षमता आणि वाणी निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने ही मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत. यामध्ये संगणकीय कार्यक्षमता सुधारणे, बहुभाषिक क्षमता वाढवणे आणि विविध तांत्रिक वातावरणांमध्ये सहजपणे वापरता येण्याची अनुकूलता विकसित करणे यासाठी संशोधनावर आधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

स्वदेशी संशोधनातून प्रगत बहुभाषिक एआय ला चालना देणे

या उद्घाटनांचे मुख्य आकर्षण म्हणजे चॅरिएट टीम ने विकसित केलेल्या आणि चॅरिएट 1 च्या प्रशिक्षणात  समावेश केलेल्या तीन संशोधन नवोन्मेष आविष्कारांचे सादरीकरण होय. या नवकल्पनांच्या माध्यमातून भाषिक प्रक्रियेमधील आणि मॉडेल प्रशिक्षणात येणाऱ्या मूलभूत आव्हानांवर उपाययोजना केली जाते विशेषतः भारताच्या वैविध्यपूर्ण भाषिक परिदृश्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात.

IndicShift हा एक ओपन-सोर्स उपक्रम आहे, जो भारतीय लिपींसाठी एक सामायिक वर्णमाला सादर करतो; यामुळे प्रत्येक लिपीचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी एआय मॉडेल्सना विविध भाषांमधील साम्याचा लाभ घेणे शक्य होते. 12 भारतीय लिप्यांमधील 1,012 वर्ण 350 अक्षरांच्या माध्यमातून सामावून घेत, ही पद्धत OpenAI च्या GPT टोकनायझरच्या तुलनेत भारतीय मजकुरावर 2.5 पट कमी टोकन्सचा वापर करते. या संशोधनात असेही नमूद करण्यात आले आहे की, तितक्याच संगणकीय क्षमतेवर भारतीय भाषांमधील मॉडेलच्या कार्यक्षमतेत 5% ते 8% सुधारणा होते, तर इंग्रजी आणि कोडिंगमधील कार्यक्षमता कायम राहते.

अंतर्गत प्रशिक्षण पद्धतीमुळे एकाच प्रशिक्षण प्रक्रियेत आणि वेट्सच्या एकाच संचातून तीन वेगवेगळ्या आकारांची संपूर्ण मॉडेल्स एकाचवेळी तयार करता येतात. हा नावीन्यपूर्ण शोध वेगवेगळ्या संगणकीय वातावरणासाठी स्वतंत्र मॉडेल्स विकसित करण्याच्या आव्हानावर मात करतो, ज्यामुळे डेटा सेंटर्स, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि एज डिव्हाइसेसवर त्याचा वापर करणे शक्य होते. या प्रकारच्या प्रक्रियेमुळे तीन मॉडेल्सना स्वतंत्रपणे प्रशिक्षित करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत सुमारे 62 टक्के सुधारणा झाल्याचा अहवाल आहे.

तिसरे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान म्हणजे, 'मिक्सचर ऑफ व्होकॅब्युलरी' (Mixture of Vocabulary), या तंत्रज्ञानामुळे मॉडेलच्या शब्दसंग्रहाची स्वतंत्र 11 गटांमध्ये विभागणी करून आणि एकावेळी केवळ संबंधित गटाचेच मूल्यांकन (scoring) केले जाते. या पद्धतीमुळे प्रति शब्द तपासल्या जाणाऱ्या शब्दसंग्रह नोंदींची संख्या 5.7 पटीने कमी होते आणि तसेच, समान GPU हार्डवेअरचा वापर करून प्रशिक्षणाचा वेग 38 टक्क्यांनी वाढतो. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमुळे मॉडेलच्या लॉसमध्ये  अत्यंत नगण्य बदल होतो. म्हणजेच संपूर्ण शब्दसंग्रह तपासण्याऐवजी आवश्यकतेनुसार संबंधित शब्दगट तपासल्यामुळे संगणकीय प्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते आणि मॉडेलच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.

'चॅरिएट-1'-भारतातील विविध भाषांच्या अनुरुप कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती

चॅरिएट-1 LLM हे 11 अब्ज पॅरामीटर्स असलेले Mixture-of-Experts (MoE) प्रकारातील लार्ज लँग्वेज मॉडेल आहे. प्रत्येक टोकनच्या प्रक्रियेदरम्यान यातील 4 अब्ज पॅरामीटर्स सक्रिय असतात. भारतातच मूलभूत स्तरापासून प्रशिक्षण देऊन विकसित करण्यात आलेले हे मॉडेल 10.7 अब्ज, 1.7 अब्ज आणि 745 दशलक्ष पॅरामीटर्स अशा तीन वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहे. विविध संगणकीय क्षमता, तांत्रिक गरजा आणि विविध प्रकारच्या संगणकीय प्रणालींवर त्यांचा वापर करता यावा, या उद्देशाने हे तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या भाषिक मॉडेलप्रमाणेच चॅरिएट TTS देखील विकसित करण्यात आले असून यामाध्यमातून इंग्रजी आणि हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि ओडिया या दहा भारतीय भाषांमधून भाषण निर्मिती होते.

या स्पीच मॉडेलची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता म्हणजे संदर्भ समजून घेणे आणि संख्या, तारखा, चलन, एकक, यूआरएल आणि संक्षेप कसे उच्चारले पाहिजेत हे निश्चित करणे. यामुळे अधिक नैसर्गिक आणि संदर्भानुसार भाषण निर्मिती करणे शक्य होते आणि प्रत्यक्ष वापरासाठी स्पीच तंत्रज्ञान विकसित करण्यातील महत्त्वाच्या आव्हानांवर मात करणे शक्य होते.

या मॉडेलने Async TTS Pronunciation Benchmark या उच्चार अचूकता तपासणी चाचणीत 97 टक्क्यांहून अधिक अचूकता नोंदवली आहे. या चाचणीमध्ये प्रत्यक्ष वापरातील 1,029 वाक्ये आणि 42 विविध श्रेणींमधील प्रमाणित लेखनपद्धतीपेक्षा वेगळ्या स्वरूपातील मजकुराची 2,251 उदाहरणे समाविष्ट होती. याशिवाय, मॉडेलने हिंदी भाषेसाठी 7.60bटक्के अक्षर त्रुटी दर  (CER), तर इतर नऊ भारतीय भाषांसाठी सरासरी 6.47 टक्के अक्षर त्रुटी दर नोंदवला. अहवालात नमूद केलेल्या चाचण्यांमध्ये मूल्यमापन करण्यात आलेल्या सर्व प्रणालींच्या तुलनेत हा त्रुटी दर सर्वात कमी होता.

भारतीय भाषांच्या बहुविविधतेमुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीसाठी भाषिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व यातून दिसून येते. यामुळे भारतातील विविध भाषिक समुदायांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेलाअधिक सुलभ आणि समर्पक बनवण्याच्या व्यापक उद्दिष्टाला पाठिंबा मिळतो.

नेतृत्वाचे दृष्टिकोन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  सचिव एस. कृष्णन यांनी ‘चॅरिएट One’ च्या लोकार्पणाबद्दल चॅरिएटच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारताच्या तत्रंज्ञान परिसंस्थेची ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. या टीमचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, भारतीय भाषांच्या सादरीकरणाचा  कार्यक्षम उपयोग आणि स्वदेशी एआय क्षमता विकसित करण्यात दिलेले योगदान यांचा त्यांनी उल्लेख केला. इंडियाएआय  मिशनची रचना अशा प्रतिभेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठीच करण्यात आली आहे असे सांगून प्रगत एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतलेल्या स्टॅनफोर्डच्या दोन पदवीधरांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. चॅरिएट One ने देशाच्या युवा नवोन्मेषकांच्या क्षमता दाखवून दिल्या तसेच अत्याधुनिक आणि स्पर्धाक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याची देशाची वाढती क्षमता देखील  सिद्ध केली, असे ते म्हणाले.

चॅरिएट One च्या उदघाटनामुळे स्वदेशी फाउंडेशन मॉडेल विकसित करण्यात अधिकाधिक प्रगती करण्याची भारतीय ए आय उद्योगांची वाढती क्षमता अधोरेखित होते. इंडिया एआय मिशन च्या माध्यमातून केंद्र सरकार एआय संशोधन, नवोन्मेष आणि विकास यांना चालना देणारी चैतन्यशील परिसंस्था विकसित करत आहे. या माध्यमातून देशांतर्गत क्षमता उभारणी करुन परदेशात विकसित केलेल्या तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करायला सरकारचे प्राधान्य आहे.

सार्वभौम पायाभूत मॉडेल विकसित करणाऱ्या संघांना पाठिंबा देऊन, इंडियाएआय मिशन संशोधक, नवप्रवर्तक आणि उद्योगांना महत्त्वाकांक्षी एआय संशोधन करण्यास आणि त्याचे स्वदेशी तांत्रिक उपायांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करत आहे. असे उपक्रम भारताच्या सर्वसमावेशक, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक एआय परिसंस्था उभारण्याच्या दूरदृष्टीचा केंद्रबिंदू आहेत.

या कार्यक्रमात एनव्हिडियाचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक  विशाल धुपार आणि चॅरियटचे सह-संस्थापक सुव्रत भूषण यांच्यात एआय संशोधनातील उदयोन्मुख घडामोडी आणि विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा एक अनौपचारिक संवादही झाला.

 

नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


  


(Release ID: 2341887) अभ्यागत कक्ष : 6