गोवा, 26 नोव्हेंबर 2026
गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), महोत्सवाचा अनुभव रूपेरी पडद्याच्या पलीकडेही विस्तारला आहे. इफ्फी ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तो परिसर सर्जनशील संस्था, सांस्कृतिक उपक्रम, प्रादेशिक खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वस्तू आणि सहजपणे उपलब्ध होणाऱ्या उपक्रमांचे उत्साहाने ओसंडून वाहणारे एक संमेलन केंद्र बनला आहे. हे सर्व वैविध्यपूर्ण उपक्रम एकत्रितपणे प्रतिनिधी, चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि अभ्यागतांना भारताच्या समृद्ध सर्जनशील आणि सांस्कृतिक पैलूंचा शोध घेण्याची आणि त्यांच्याशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध करून देतात.

संचार सुलभता आणि समावेशकतेला प्रोत्साहन
सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा मर्यादित हालचाल क्षमता असलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांच्यासाठी सुलभता या क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'स्वयं' या संस्थेचा जनजागृती उपक्रम हे या परिसराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इफ्फीमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होत असलेली 'स्वयं' संस्था, सार्वजनिक ठिकाणांवर दिव्यांग व्यक्तींचा संचार सुलभ असण्याच्या आवश्यकतेकडे आणि सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या सहभागाकडे लक्ष वेधत आहे. हा उपक्रम महोत्सव स्थळावरील दिव्यांगाच्या संचार सुलभता व्यवस्थेला पूरक ठरत असून, सांस्कृतिक अनुभव सर्वांसाठी सुलभ आणि स्वागतार्ह बनवण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
भारताच्या सर्जनशील आणि शैक्षणिक परिसंस्थेचे सादरीकरण
महोत्सवाचा परिसर सर्जनशील तंत्रज्ञान, चित्रपट, सादरीकरण कला आणि डिझाइन या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संस्थांना त्यांचे उपक्रम सादर करण्यासाठी आणि अभ्यागतांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करत आहे.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) साठी भारताचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र असलेली मुंबईतील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' (IICT) ही संस्था देखील ॲनिमेशन कॅरेक्टर-मेकिंग स्पर्धेच्या माध्यमातून अभ्यागतांना सहभागी करून घेत आहे. या संस्थेच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन अभ्यागतांना सर्जनशील तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्यता आणि वाढत्या संधींची ओळख करून देत आहे.

प्रकाशन विभाग संचालनालय (DPD) भारतीय चित्रपटसृष्टीवरील प्रकाशनांच्या संग्रहासोबतच आपली प्रतिष्ठित गांधीवादी मालिका सादर करत आहे. निवडक पुस्तकांवर दिली जाणारी विशेष सवलत याचे आकर्षण अधिक वाढवत असून, अभ्यागतांना या साहित्यिक खजिन्याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
चेन्नई येथील एसए फिल्म अकादमी, रोहतक (हरियाणा) येथील दादा लक्ष्मी चंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ परफॉर्मिंग अँड व्हिज्युअल आर्ट्स आणि दृश्य कला विद्यापीठ, तसेच जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांचा सहभाग भारताच्या विस्तारत असलेल्या माध्यम, मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांमध्ये योगदान देणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक शाखांची व्याप्ती अधोरेखित करत आहे.
प्रादेशिक विविधतेची चव
खाद्यपदार्थांचे स्टॉल्स परिसरातील अनुभवाला एक वेगळीच जोड देत आहेत. यामध्ये पारंपरिक नागा खाद्यपदार्थ आणि बिर्याणीपासून ते डोसा, कॉफी आणि बेकरी उत्पादनांपर्यंत विविध प्रादेशिक आणि लोकप्रिय पदार्थांचा समावेश आहे. याला विशेषत्वाने गोव्याच्या प्रभावाची जोड देत, गोवा वन विकास महामंडळ मर्यादित स्थानिक पातळीवर उत्पादित काजूंचे प्रदर्शन करत असून, या प्रदेशातील देशी उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

स्मृतिचिन्हांच्या दालनांमध्ये अभ्यागतांसाठी महोत्सवाच्या आठवणी जपणारी विविध स्मृतिचिन्हे आणि सर्जनशील उत्पादने उपलब्ध आहेत. पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था वस्त्रप्रावरणे आणि शोभिवंत अलंकार प्रदर्शित करत आहे, तर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा देखील स्वतःचा विविध वस्तू आणि उत्पादनांचा संग्रह सादर करत आहे.
मोठ्या पडद्यापलीकडचे मनोरंजन
महोत्सवाचा अनुभव डिजिटल आणि प्रसारण क्षेत्रापर्यंत विस्तारत, प्राइम व्हिडिओ , स्टोरी टीव्ही ॲप आणि बिग एफएम देखील आपापल्या स्टॉल्सच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे अभ्यागतांना बदलत्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध स्वरूपे आणि व्यासपीठांशी जोडले जाण्याची संधी मिळत आहे.
स्टॉल चालकांनी त्यांचा सहभाग सुलभ केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
सर्जनशील संस्था, प्रादेशिक चवी, स्थानिक उत्पादने, मनोरंजन व्यासपीठे आणि सुलभता उपक्रमांच्या या सुरेख संगमामुळे, इफ्फी परिसर अभ्यागतांना भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील पैलूंचा शोध घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/दर्शना राणे