संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येणार

Posted On: 25 NOV 2026 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर 2026 रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानुसार, 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीने मायगव्ह पोर्टलच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आयोजित करण्यात आले आहे. हे वाचन 22 अनुसूचित भाषा आणि इंग्रजी अशा एकूण 23 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देशभरातील नागरिकांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याची, तसेच संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्श आणि मूल्यांप्रती आपली बांधिलकी पुन्हा व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमात सर्वसामान्य नागरिक, केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच इतर संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी मायगव्हच्या https://pledge.mygov.in/constitution-day-2026/ या पोर्टलवर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. हे प्रमाणपत्र समाजमाध्यमांवरही सामायिक करता येणार आहे.

युवकांचा सहभाग आणि सक्रिय संलग्नता वाढवण्यासाठी 18 ते 26 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मायगव्ह आणि मायभारत पोर्टलच्या माध्यमातून संविधानविषयक प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, 24 ते 26 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 786 जिल्ह्यांमध्ये विकसित भारत युवा संवाद आयोजित करण्यात येत आहे.

संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सरकारे, तसेच त्यांची क्षेत्रीय कार्यालये, संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये, स्वायत्त संस्था आणि आस्थापना यांच्या वतीने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी, विशेषतः युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे आणि भारतीय संविधानाप्रती आपली बांधिलकी पुन्हा दृढ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341623) अभ्यागत कक्ष : 5