गोवा, 25 नोव्हेंबर 2026
मांडवी नदीच्या किनारी सूर्य मावळतीला जात असताना पणजीतील रस्ते हळूहळू दिव्यांच्या रोषणाईने उजळू लागतात तेव्हा 57 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला एक वेगळीच लय प्राप्त होते. संपूर्ण दिवसभर चित्रपटांचे प्रदर्शन, मास्टरक्लासेस, रेड कार्पेट वरील उपस्थिती आणि चित्रपटांवरील संवाद यांसारखे भरगच्च कार्यक्रम होत असताना संध्याकाळच्या सुमाराला एक वेगळाच उत्साह पहावयास मिळतो. इफ्फी मध्ये सूर्यास्त म्हणजे महोत्सवाच्या दिवसाचा शेवट नसून, उत्सवाच्या आणखी एका नव्या पर्वाची सुरुवात असते.
_20261125185013_26f659.jpeg)
चित्रपटगृहांच्या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे इफ्फी 2026 प्रेक्षकांना मिरामार किनारा, मडगाव येथील रवींद्र भवन आणि वागातोर समुद्रकिनाऱ्यावरील हेलिपॅड परिसरात खुल्या आकाशाखाली चित्रपट प्रदर्शनाच्या माध्यमातून भव्य सिनेमॅटिक अनुभव देतो. संध्याकाळी सात ते दहा या वेळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये काही निवडक चित्रपट दाखवले जातात. गोव्यातील खुल्या नभाखाली, येथील नागरिक, अभ्यागत आणि चित्रपटरसिक एकत्र येऊन चित्रपट बघण्याचा आनंद लुटू शकतात आणि चित्रपटांना लोकांच्या अधिक जवळ नेण्याच्या या महोत्सवाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब यातून झळकते.
हे महोत्सवी वातावरण मांडवी नदीच्या किनाऱ्यावरील पदपथावरही अनुभवायला मिळते. येथे सादर होणाऱ्या रोमटामेळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गोव्याच्या समृद्ध कलात्मक परंपरांचे दर्शन घडते. 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळच्या समयी आयोजित केलेल्या सात सांस्कृतिक पथकांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक संस्कृतीच्या सादरीकरणाने या आंतरराष्ट्रीय महोत्सवाला एक वेगळाच रंग चढतो आहे. स्थानिक आणि पारंपरिक सांस्कृतिक कलाविष्कारांचा जागतिक चित्रपट परंपरांशी होणारा हा संगम, इफ्फी महोत्सवाला गोवा प्रदान करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळखीचे दर्शन घडवतो.
_20261125185053_f54ca6.jpeg)
या महोत्सवाच्या आनंदात आणखी भर घालत 25 नोव्हेंबर रोजी चित्रपटांच्या आनंदोत्सवाचा जल्लोष या संकल्पनेखाली इफ्फी परेड आयोजित करण्यात आली आहे. ही परेड पणजीतील एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा च्या परिसरातून कला अकादमीपर्यंत मार्गक्रमण करणार आहे. रंगीबेरंगी चित्ररथ, विविध सांस्कृतिक सादरीकरण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे या परेडला एक वेगळीच उत्सवी रंगत लाभणार आहे. तसेच ही परेड महोत्सवाच्या नियोजित स्थळांच्या व्यतिरिक्त असल्याने स्थानिक रहिवासी आणि अभ्यागतांना या सिनेमॅटिक अनुभवाचा भाग होता येणार आहे.
चित्रपट निर्माते, प्रतिनिधी आणि उदयोन्मुख कलाकारांसाठी महोत्सवाच्या संध्या वेळा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसतात. नियोजित चित्रपट प्रदर्शन आणि औपचारिक संवादांच्या पलीकडे, त्या अनौपचारिक चर्चा, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात. एखाद्या चित्रपटावरील चर्चेतून सांस्कृतिक दृष्टिकोनांची देवाणघेवाण होऊ शकते, तर चित्रपट निर्मात्यांची एक अनपेक्षित भेट भविष्यातील सहकार्याचा पाया ठरू शकते.

महोत्सवाच्या रोषणाई केलेल्या स्थळांमागे स्वयंसेवक, तांत्रिक कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि आयोजकांचे अथक प्रयत्नही दडलेले असतात. चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतरही महोत्सवाचे काम सुरळीत पार पडावे यासाठी हे सर्वजण कार्यरत असतात. त्यांचे योगदान इफ्फीच्या अनुभवाचा एक अविभाज्य मात्र अनेकदा पडद्यामागे राहणारा अदृश्य भाग आहे.
सूर्यास्तानंतर पणजीचे बदलणारे रूप हे स्वतःच एक नेत्रदीपक दृश्य असते. शहराच्या वृक्षांनी नटलेल्या रस्त्यांवर सोनेरी दिव्यांची रोषणाई केलेली असते, तर रोषणाई केलेल्या इमारती, रंगीबेरंगी कलाकृती आणि इफ्फीचे प्रतिष्ठित मोराचे प्रतीक रस्त्यांना उत्सवाचे स्वरूप देतात. शहराची वास्तुकला आणि सार्वजनिक ठिकाणे देखील या महोत्सवाचाच एक भाग बनतात. यातून गोव्याचे इफ्फिशी असलेले नाते एका वेगळ्याच उत्सवात रूपांतरित झाल्याचे दिसून येते. या उत्सवात यजमान राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक स्वरूप आणि चित्रपटांची वैश्विक लोकप्रियता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.

इफ्फी 2026 ची संकल्पना ‘सीमाविरहित कथा’ (Stories Without Borders) याला अनुसरून, महोत्सवाच्या रात्री चित्रपट केवळ भौगोलिक आणि भाषिक सीमाच नव्हे, तर चित्रपटगृहाच्या भौतिक सीमा ओलांडण्याची आपली क्षमता प्रत्यक्ष रूपात दाखवतात. चित्रपट महोत्सवाची जादू केवळ पडद्यावर उलगडणाऱ्या कथांमध्येच नाही, तर त्या कथांमुळे सुरू होणाऱ्या चर्चांमध्ये आणि निर्माण होणाऱ्या नव्या नात्यांमध्येही असते याची आठवण या रात्री करून देतात.
इफ्फीमध्ये, पडद्यावर श्रेयनामावली संपते, पडदे पडतो आणि चित्रपटगृहातील दिवे मंद होऊ शकतात, पण चित्रपटांचा उत्सव सुरूच राहतो. गोव्यात, महोत्सवाचे घड्याळ थांबण्याचे नावच घेत नाही.
_20261125185305_d5a2e2.jpeg)
_20261125185323_29a2f2.jpeg)
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे