57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

रोजच्या जगण्यातून अलौकिकतेकडे : 57 व्या इफ्फीत दिग्दर्शक अखिल सत्यन यांनी सांगितला ‘सर्वम् माया’ चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास

Posted On: 24 NOV 2026 6:10PMby PIB MumbaiRelease ID: 2340978Views: 4

गोवा, 24 नोव्‍हेंबर 2026

 

दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग आणि स्वतःच्या आयुष्यातील अनुभवापासून प्रेरणा घेत, मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अखिल सत्यन यांनी आज गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीत झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वम् माया’ या अलौकिक विषयावरील चित्रपटाच्या निर्मितीविषयी माहिती दिली. निविन पॉली आणि रिया शिबू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मल्याळम भाषेतील चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झाला आहे. इफ्फी 2026 मध्ये भारतीय पॅनोरमा विभागात या चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे.

सर्वम् माया’ हा चित्रपट अत्यंत वैयक्तिक अनुभवांवर आधारित असून, त्यात स्थानिक जीवनशैलीचे प्रतिबिंब उमटले आहे, असे दिग्दर्शक सत्यन यांनी सांगितले. त्यांना स्वतःला आणि त्यांचा मित्र तथा अभिनेता निविन पॉली याला भयपटांची भीती वाटत असल्यामुळे असा चित्रपट तयार करण्याबाबत सुरुवातीला दोघांच्याही मनात साशंकता होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. एका मंदिरात पूर्वी नास्तिक असलेल्या पुजाऱ्याशी झालेल्या भेटीतून या चित्रपटाची कल्पना सुचली. दैनंदिन जीवनातील या अनुभवातून एक वेगळीच कथा आकाराला आली. नास्तिक असलेला एक पुजारी भूतबाधा दूर करण्याचे काम करतो आणि त्याची एका जेन झी अर्थात तरुण पिढीतील भुताशी गाठ पडते, अशी या चित्रपटाची अनोखी संकल्पना असल्याचे सत्यन यांनी सांगितले.

अखिल सत्यन यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या सर्वम् माया’ या चित्रपटात प्रभेंदू या संगीतकाराची कथा मांडण्यात आली आहे. नास्तिक असलेल्या प्रभेंदूला कौटुंबिक परिस्थितीमुळे पारंपरिक हिंदू पुजारी म्हणून काम करावे लागते. त्याच्या आयुष्यात माया ऊर्फ डेलुलू या तरुणीच्या आत्म्याची अनपेक्षितपणे भेट होते. आपल्या भूतकाळातील घटनांचा स्वीकार करण्यासाठी धडपडणारी ही तरुणी असते. या दोघांमध्ये अनपेक्षितपणे मैत्री निर्माण होते आणि त्यातून त्यांचा आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो. श्रद्धा, प्रिय व्यक्तीला गमावल्याचे दुःख, प्रेम आणि मानवी नात्यांमधून मिळणारी भावनिक उभारी अशा विविध विषयांचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे.

कथाकथनातील विनोदाचे महत्त्व सांगताना अखिल सथ्यन म्हणाले की, प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवण्यासाठी कथेशी सुसंगत नसलेल्या हिंसा किंवा मारामारीच्या दृश्यांवर चित्रपट अवलंबून असणे योग्य नाही. कथेतील नाट्य किंवा थरार यांच्याइतकाच विनोददेखील चित्रपटाच्या व्यावसायिक यशामध्ये योगदान देऊ शकतो. विनोदामुळे त्या कथेला सौंदर्य व भावनिक खोली प्राप्त होते असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. निविन पौली यांची सहज विनोदबुद्धी या चित्रपटाला आणखी रंजक बनविते असेही ते म्हणाले. या चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, आधीच व्यावसायिक यश मिळविलेल्या या चित्रपटाची प्रवेशिका सादर करण्याबाबत मी सुरुवातीला साशंक होतो. मात्र या चित्रपटातील भावनिक पैलू व कथेचा आशय महोत्सवात दाद मिळवतील असा मला विश्वास होता.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, पिता सथ्यन अंथिकड यांचा तुमच्यावर कितपत प्रभाव आहे असे विचारले असता ते म्हणाले, “माझ्या चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक गोष्टी माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच आलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात माझ्यावर मणीरत्नम यांच्या चित्रपटांचा प्रभाव होता. विशेषतः बॉम्बे सारख्या चित्रपटाचा, हळूहळू माझ्या वडीलांच्या वरावेलपु या चित्रपटासह अन्य चित्रपटांमध्ये माझा रस वाढत गेला.” ज्येष्ठ अभिनेते, पटकथालेखक श्रीनिवासन यांचाही प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली कारकीर्द सोडून चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या अखिल सथ्यन यांनी उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांची प्रशंसा केली. विशेषतः चित्रपट क्षेत्राची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या आणि दोन मिनिटांच्या चित्रपटासाठी संकल्पना लिहिण्यापासून सुरुवात करुन त्याचे चित्रीकरण व संपादन करण्यापर्यंत काम करणाऱ्या नव्या दिग्दर्शकांचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “एक पेन्सिल व एक कागद चित्रपटाची सुरुवात करण्यासाठी पुरेसे आहेत आणि चांगल्या रितीने लिहीलेली संकल्पना एखाद्याचे भविष्य बदलवू शकते.”

एक नास्तिक धर्मगुरू आणि एक युवक यांच्यातील अनोख्या मैत्रीची कथा सांगणाऱ्या ‘सर्वम माया’ या चित्रपटामध्ये विनोद, हळूवार भावना आणि विश्वास व नुकसान यावरील प्रतिक्रिया असे सर्व काही आहे. इफ्फी 2026 च्या ‘सीमाबंधन नसलेल्या कथा’ या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या चित्रपटामधून गावांमधील अनुभवांची कथा सांगणाऱ्या चित्रपटाची वैश्विक मानवी भावनांद्वारे प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची क्षमता दिसून येते.

पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन ऍलन सिबी यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/सुरेखा जोशी/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340978
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026