Posted On:
24 NOV 2026 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2026
केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरसंचार स्टार्टअप्स आणि एमएसएमई परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले.केंद्रीय दळणवळण मंत्रालयातील (डीओटी) दूरसंचार विभागातर्फे नवी दिल्लीत भारत मंडपम येथील लीडर्स लाऊंजमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेने स्वदेशी दूरसंचार नवोन्मेष बळकट करण्याप्रति, उद्योजकतेला चालना देण्याप्रति तसेच स्वदेशी तंत्रज्ञानांचे विकसन आणि व्यावसायिकीकरण करण्यात सुलभता आणण्याप्रति सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली.

या कार्यक्रमातून दूरसंचार स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमईज), उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, गुंतवणूकदार, शिक्षण क्षेत्रातील नामवंत तसेच सरकारचे प्रतिनिधी, यांना स्वदेशी उत्पादने आणि उपाययोजना यांचे प्रदर्शन करण्यासाठी, देशांतर्गत नवोन्मेषकर्त्यांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि भारतीय दूरसंचार तंत्रज्ञानांचा विस्तार करण्यासाठीच्या संधींचा शोध घेण्यासाठी सामायिक मंचावर एकत्र आणले.
या परिषदेमध्ये स्टार्ट अप्स आणि एमएसएमईज यांनी 11 प्रदर्शन स्टॉल्स देखील उभारले होते. यातून त्यांना उपस्थित धोरणकर्ते, उद्योगक्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांसमोर त्यांची नाविन्यपूर्ण स्वदेशी उत्पादने, तंत्रज्ञाने आणि उपाययोजना सादर करण्याची संधी मिळाली.


याप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते टीसीओई, इंडिया तर्फे आयोजित उदयोन्मुख तंत्रज्ञाने हॅकेथॉन 2026 (ईटीएच2026)च्या विजेत्यांचा गौरव देखील करण्यात आला.या हॅकेथॉनसाठी 2,870 हून अधिक इच्छुकांनी नोंदणी केली होती आणि विद्यार्थी, स्टार्ट अप्स, कंपन्या तसेच शैक्षणिक संस्थांकडून नऊ तंत्रज्ञान विभागांमध्ये 620 अर्ज आले होते.

या परिषदेत बोलताना, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया म्हणाले, “गेल्या दशकात ज्या प्रकारे भारताच्या उद्योजकीय सामर्थ्याचा पुन्हा उदय झालेला आहे त्या संदर्भात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला देश नेहमीच नवोन्मेष, तंत्रज्ञान, विज्ञान आणि उद्योजकता यांचे माहेरघर राहिला आहे.” ते पुढे म्हणाले, “तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सुविधांमुळे, दूरसंचार क्षेत्र हे भारत तंत्रज्ञानाचा निर्माता बनत असल्याचे सर्वात ठळक उदाहरण होय.”
सदर परिषदेने विकसित भारत@2047 च्या संकल्पनेला अनुसरून, स्टार्ट अप्स, एमएसएमईज, शिक्षण क्षेत्र, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहयोगाची जोपासना करण्यात, स्वदेशी तंत्रज्ञान क्षमता बळकट करण्यात आणि नवोन्मेष तसेच उद्योजकता यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात डीओटीच्या बांधिलकीची पुष्टी केली आहे.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai