57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या इफ्फीत सादर झालेले ‘पगला घोडा’ आणि ‘ओह माय डॉग’ माणसाची सदसदविवेकबुद्धी आणि निःस्वार्थ प्रेमाच्या सखोल आयामांचा मागोवा घेतात


कलेला कोणत्याही सीमा नसतात, फक्त मुळे असतात: ‘पगला घोडा’ च्या सार्वत्रिक आकर्षणासंदर्भात शेखर दास यांची टिप्पणी

प्राणी पूर्वग्रहांचे ओझे बाळगत नाहीत; त्यांची निष्ठा निरपेक्ष असते: ओह माय डॉग’चे दिग्दर्शक अमित राय यांचे प्रतिपादन

Posted On: 23 NOV 2026 8:10PMby PIB MumbaiRelease ID: 2340668Views: 6

गोवा, 23 नोव्‍हेंबर 2026

 

एक कथा भूतकाळातील सावल्यांना अस्वस्थ सदसदविवेकबुद्धीसमोर उभी करते तर दुसरी कथा अशा प्रेमाचा उत्सव साजरा करते जे कोणतेही अंतर अथवा अडचणी यांमुळे कमी होऊ शकत नाही. मानवी अनुभवांच्या दोन अगदी परस्परविरोधी पण तरीही खोलवर हलवून सोडणाऱ्या आयामांचा मागोवा घेत, ‘पगला घोडा’ आणि ‘ओह माय डॉग’ या अनुक्रमे बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपटांची भारतीय पॅनोरमामधील प्रदर्शनासाठी झालेली निवड, आज गोव्यात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेच्या केंद्रस्थानी राहिली.

चित्रपट निर्माते शेखर दास आणि अमित राय यांच्यासह सुप्रसिध्द बंगाली अभिनेत्री गार्गी रॉयचौधरी आणि निर्माते डॉ.प्रबीर भौमिक यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत, आपपल्या चित्रपटांविषयी तसेच अपराधीपणा, विश्वासघात, सहानुभूती तसेच बिनशर्त निष्ठेच्या त्यांच्या शोधाविषयी महत्त्वाची माहिती दिली. एकत्रितपणे, या कथा, मानवी भावनांच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून भाषिक तसेच सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे पोहोचण्याच्या चित्रपटांच्या सामर्थ्याचा गौरव करतात.

पगला घोडा: अपराधीपणा, पश्चात्ताप आणि सदसदविवेकबुद्धीच्या जगातील अस्वस्थतेचा प्रवास

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते शेखर दास यांनी मुख्य अभिनेत्री गार्गी रॉयचौधरी आणि निर्माते डॉ.प्रबीर भौमिक यांच्यासह, सुप्रसिध्द नाटककार बादल सरकार यांच्या ‘पगला घोडा’ या उत्तर वास्तववादी नाट्यकृतीचे चित्रपटामध्ये रुपांतर करण्यासंदर्भात महत्त्वाचे विचार मांडले. रात्रीच्या वेळी जंगलातील स्मशानभूमीच्या भयावह पार्श्वभूमीवर घडणारी चित्रपटाची कथा, आत्महत्येमुळे मरण पावलेल्या स्त्रीच्या अंतिम संस्कारांसाठी जमलेल्या चार माणसांची गोष्ट सांगते. तिचा आत्मा या चौघांच्या समोर येतो आणि त्यांची गाडलेली गुपिते उघड करतो, फसवणूक आणि विश्वासघात यांचा सामायिक इतिहास उघड करतो. यातून जे उघड होते तो पश्चात्ताप अनेकदा खूप उशिरा होतो हे वेदनादायी सत्य अधोरेखित करणारा अपराधीपणा, भावनिक परित्याग आणि माणसाची सदसदविवेकबुद्धी यांचा एक अस्वस्थ करणारा शोध असतो.

बादल सरकार यांच्या कार्याच्या चिरंतन समर्पकतेविषयी बोलताना, दिग्दर्शक शेखर दास यांनी अस्सल कथाकथनाचे भाषिक तसेच भौगोलिक सीमांच्या पलीकडे पोहोचण्याचे सामर्थ्य अधोरेखित केले. “कलेला कोणत्याही सीमा नसतात; तिची केवळ मुळे असतात. जेव्हा एखादी कथा मानवी सदसदविवेकबुद्धी आणि भावनिक सत्यामध्ये खोलवर रुजलेली असते, तेव्हा ती भाषेच्या पलीकडे जाऊन सगळीकडच्या प्रेक्षकांशी संवाद साधते,” ते म्हणाले.

चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या भावनिक गुंतागुंतीविषयी बोलताना अभिनेत्री गार्गी रॉयचौधरी यांनी त्यांच्या भूमिकेचे वैशिष्ट्य स्पष्ट केले. ही व्यक्तिरेखा मानवी दुर्बलतांचे प्रतिबिंब दाखवणारी आणि नैतिक जाणीव जागृत करणारी ठरते, असे त्यांनी सांगितले. चित्रपटातील भावनांचे विविध स्तर आणि त्यातील गुंतागुंत लक्षात घेऊन ही भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने साकारावी लागल्याचेही त्यांनी नमूद केले.

निर्माते डॉ. प्रबीर भौमिक यांनी साहित्य आणि रंगभूमीवरील कलाकृतींवर आधारित चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताचा समृद्ध कलात्मक आणि नाट्यपरंपरेचा वारसा जतन करण्याबरोबरच कालातीत साहित्यकृती नव्या पिढीतील चित्रपटप्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात अशा चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ओह माय डॉग’ : निःस्वार्थ प्रेम आणि अतूट निष्ठेच्या असामान्य नात्याचा गौरव

मानवी नात्यांमधील गुंतागुंतीपासून माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याच्या निरागसतेकडे वळताना, ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक अमित राय यांनी ‘ओह माय डॉग’ हा हिंदी चित्रपट सादर केला. सहानुभूती, धैर्य, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि निःस्वार्थ प्रेम यांचा हृदयस्पर्शी, भावनाप्रधान आविष्कार या चित्रपटातून पाहायला मिळतो. 

‘रोड टू संगम’, ‘आय-पॅड’ आणि ‘ओएमजी 2’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी नावाजलेले  अमित राय यांनी या चित्रपटात भारतातील दोन समांतर प्रवासांची कथा मांडली आहे. आसाममध्ये 14 वर्षीय अपू आपल्या अपहरण झालेल्या मोमो या कुत्र्याची सुटका करण्यासाठी धडपडत असतो, तर बिहारमध्ये ऑस्कर नावाचा अत्यंत निष्ठावान कुत्रा आपल्या अपहरण झालेल्या 15 वर्षीय मालक प्रिन्सचा शोध घेण्यासाठी निघतो. भौगोलिकदृष्ट्या दूर असलेले हे दोन्ही प्रवास एका अतूट नात्याने जोडलेले आहेत. धैर्य, जिद्द आणि निःस्वार्थ प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी उलगडताना, निष्ठा आणि समर्पणाची भावना सर्व सीमा ओलांडू शकते, हे या चित्रपटातून प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.

चित्रपटाच्या या दुहेरी कथानकाची प्रेरणा सांगताना दिग्दर्शक अमित राय यांनी प्राण्यांमधील भावनांचा प्रामाणिकपणा आणि मानवी नात्यांमध्ये अनेकदा गुंतागुंत निर्माण करणारे पूर्वग्रह व अटीशर्ती यांच्यापलीकडे जाण्याची त्यांची क्षमता अधोरेखित केली.

प्राण्यांच्या प्रेमात पूर्वग्रहांना किंवा अटींवर आधारित आपुलकीला स्थान नसते; त्यांची निष्ठा पूर्णपणे निःस्वार्थ असते. या दोन समांतर प्रवासांतून सहानुभूती आणि समर्पण कोणतेही अंतर पार करू  शकते आणि प्रत्येक भीतीवर मात करू शकते, याची जाणीव प्रेक्षकांना करून द्यावी, हा आपला उद्देश होता, असे राय यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत महेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.

पत्रकार परिषद इथे पाहू शकता :

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/वैभवी जोशी/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340668
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026