गोवा, 23 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘द एपिक जॉनर्स -मायथॉलॉजीज, सुपरहिरोज अँड न्यू वर्ल्डस’ नामक मनोरंजक आंतर-संवादात्मक सत्रामध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामध्ये रुजलेल्या पौराणिक कथांमधील अमर्याद शक्यता, सुपरहिरोज आणि कल्पनिक विश्वे यांनी लक्ष वेधून घेतले. चित्रपटनिर्माते अयान मुखर्जी आणि बेसिल जोसेफ यांच्याशी सूत्रसंचालक पूजा तलवार यांनी संवाद साधत सुपरहिरोज आणि पौराणिक कथांना पडद्यावर सादर करण्यातील सर्जनात्मक आव्हाने, भारतीय लोककथांचा तसेच आध्यात्मिक बाबींचा प्रभाव आणि चित्रपटीय कथाकथनात तंत्रज्ञानाची विकसित होत जाणारी भूमिका यांचा मागोवा घेतला.
_20261123190519_c1890c.jpeg)
भारतात सुपरहिरोंवर आधारित चित्रपट निर्मितीच्या आव्हानाविषयी बोलताना, भारतीय चित्रपटांमध्ये प्रमुख नायकांचे चित्रण पारंपारिकरीत्या वास्तविकतेपेक्षा मोठी व्यक्तिमत्वे म्हणून केले जाते आणि बहुतेकदा त्यांच्यामध्ये सुपरहिरोचे गुण असतात, असे निरीक्षण बेसिल जोसेफ यांनी नोंदवले. त्यामुळे सुपरहिरोचा समावेश असलेले वेगळे विश्व निर्माण करणे हे विशेष करून आव्हानात्मक असते,असे ते म्हणाले.
मिन्नल मुरली या त्यांच्या चित्रपटाविषयी बोलताना जोसेफ यांनी सर्जनात्मक आव्हाने आणि खर्चावरील मर्यादा देखील, सर्जनशील कथाकथनाला कशा प्रकारे प्रेरित करू शकतात हे स्पष्ट केले. मिन्नल मुरली या चित्रपटात लुंगी घातलेला आणि चेहेरा झाकून धावणारा तसेच चप्पल वापरणारा सुपरहिरो असलेली दृश्ये अशाच विचारांतून जन्माला आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्माते अयान मुखर्जी यांनी सांगितले की, सामान्य लोकांमध्ये असलेल्या असामान्य शक्तींच्या संकल्पनेने त्यांना सुरुवातीला सुपरहिरो या प्रकाराकडे आकर्षित केले. आपल्या चित्रपटांसाठी पश्चिमेकडील चित्रपटांमधून प्रेरणा घेणाऱ्या भारतीय व्यक्तिमत्त्वांच्या निर्मितीच्या आव्हानाची चर्चा करताना त्यांनी काबुल केले की, हॅरी पॉटरसारख्या कथांची आवड असल्यामुळे, ब्रह्मास्त्र या त्यांच्या चित्रपटात सुरुवातीला काही अंशी पश्चिमेचा प्रभाव जाणवतो. मात्र, कथा लेखनात आध्यात्मिकतेच्या घटकांच्या समावेशामुळे या चित्रपटाला विशिष्ट भारतीय ओळख मिळवून देण्यात मदत झाली असे ते म्हणाले.
_20261123190553_2cb5cb.jpeg)
चित्रपटनिर्मितीमध्ये अस्सलपणाला असलेल्या महत्त्वावर अधिक भर देत, बेसिल जोसेफ म्हणाले की चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांना कृत्रिमतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांमधील पात्रांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे. यासाठी साधेपणा आणि सर्जनशील प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे, हे सांगण्यावर भर देत ते पुढे म्हणाले की, निर्मात्याने चित्रपट आकर्षक किंवा कूल दिसावा या ध्यासापोटी स्वतःची ओळख कधीच पणाला लावता कामा नये.
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा देताना अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचे वर्णन व्यावहारिक आणि व्यवस्थापकीय आव्हानात्मक प्रकल्प असे केले. त्यांच्या मते, मर्यादांच्या चौकटीत काम करताना चित्रपट निर्मात्यांना अनेकदा पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो आणि अधिक कल्पक उपाय शोधावे लागतात. सर्जनशीलतेसमोरील आव्हाने ही अडथळे ठरण्याऐवजी नवोन्मेषाला चालना देणारी ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
या चर्चेत भारताचे पौराणिक कथा आणि लोककथांशी असलेले खोलवर रुजलेले नाते यावरही विचारमंथन झाले. बासिल जोसेफ यांनी निरीक्षण नोंदवले की, भारतीय प्रेक्षक लहानपणापासूनच दैवी शक्ती असलेल्या व्यक्तींच्या आणि असामान्य सामर्थ्याच्या कथा ऐकत मोठे झाले आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये लोकप्रिय कथन परंपरेत पौराणिक सुपरहिरोंचा प्रभाव तुलनेने कमी दिसतो; याउलट, भारतात संकटाच्या काळात लोकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना संकटमुक्त करण्यासाठी अवतरलेल्या दैवी व्यक्तिमत्त्वांची समृद्ध परंपरा आहे. पौराणिक कथा आणि लोककथांच्या संदर्भांचा प्रचंड ठेवा उपलब्ध असल्यामुळे, चित्रपट निर्माते साहजिकच बालपणी ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या कथांचा आधार घेतात.

अयान मुखर्जी यांनी अधोरेखित केले की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे दृश्यात्मक कथनाच्या शक्यता विस्तारल्या आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना महत्त्वाकांक्षी कथानके आणि कल्पनारम्य विश्वे प्रत्यक्ष पडद्यावर साकारता येऊ लागली आहेत. भारतीय कथन परंपरेत पौराणिक कथांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. आता तंत्रज्ञानामुळे या पौराणिक कथांना समकालीन प्रेक्षकांसमोर नव्या पद्धतीने सादर करण्याचे मार्ग उपलब्ध झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातील चित्रपट निर्मितीच्या भविष्याबाबत आपले विचार मांडताना बासिल जोसेफ यांनी निरीक्षण नोंदवले की, एआय खऱ्या अर्थाने काहीही मूल्यवान निर्माण करण्याऐवजी आधीपासून अस्तित्वात असलेल्या सामग्रीची पुनर्निर्मिती करते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्जनशील सामग्रीची सहज नक्कल करता येऊ लागलेल्या काळात सर्जनशीलतेचे मूल्य अधिकाधिक वाढत जाईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

ओटीटी मंचांच्या वाढीमुळे भारतीय चित्रपटांची पोहोच कशा प्रकारे विस्तारली आहे, यावरही वक्त्यांनी चर्चा केली. बासिल जोसेफ यांनी नमूद केले की, आता कोणत्याही एका भाषेत तयार झालेले चित्रपट देशाच्या विविध भागांमध्ये लोकप्रिय होत आहेत आणि प्रेक्षकांना ते आपापल्या भाषांमध्ये पाहता येत आहेत. या वाढत्या सुलभ उपलब्धतेमुळे प्रादेशिक चित्रपटांना भाषेच्या सीमा ओलांडून इतर प्रदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
या चर्चेतून भारतीय चित्रपटांचे बदलते स्वरूप आणि त्यांचे विविध पैलू उलगडले. तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या शक्यता, सर्जनशीलता आणि भारतीय स्थानिक पौराणिक परंपरांशी असलेले चिरंतन नाते या सर्वांचा एकत्रित उपयोग करून कल्पनारम्य, तरीही अस्सल भारतीयत्व जपणारी चित्रपटसृष्टीतील विश्वे कशा प्रकारे साकारता येतात, याविषयी या चर्चेतून मोलाचे दृष्टिकोन समोर आले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे