गोवा, 22 नोव्हेंबर 2026
चित्रपट निर्मिती शिकवता येते की ती स्वतः अनुभवातून आत्मसात करावी लागते... या प्रश्नाने आज गोव्यात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आयोजित ‘द अनटीचेबल फ्रेम: कॅन सिनेमा बी टॉट ऑर मस्ट इट बी डिस्कव्हर्ड?’ या परिसंवादाची सुरुवात झाली. चित्रपटांच्या प्रदर्शनांसोबत आयोजित या चर्चेत सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, तांत्रिक कौशल्ये शिकवणे आणि चित्रपटसृष्टीच्या गरजांसाठी इच्छुक चित्रपट निर्मात्यांना तयार करणे यामध्ये चित्रपट प्रशिक्षण संस्थांची भूमिका काय असते, याचा ऊहापोह करण्यात आला.
या परिसंवादात अमला अक्किनेनी, अभिनेत्री आणि अन्नपूर्णा कॉलेज ऑफ फिल्म अँड मीडियाच्या संचालिका; अनुपम खेर, अभिनेते आणि अॅक्टर प्रिपेअर्सचे संस्थापक; आर्तुर डाबोर्स्की, सांस्कृतिक पत्रकार, वॉर्सा फिल्म स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचे उपकुलगुरू, समर फिल्म अकादमीचे कार्यक्रम संचालक, टोफिफेस्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यक्रम संयोजक आणि फिप्रेस्सीचे सदस्य; भूपेंद्र कैन्थोला, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) माजी संचालक; तसेच मनोज परमहम्सा, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील छायाचित्रण दिग्दर्शक, मार्गदर्शक आणि सिनेमा फॅक्टरी अकादमीचे संस्थापक सहभागी झाले होते. या सत्राचे सूत्रसंचालन सोनी पिक्चर्स इंडिया आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) नेतृत्वाची पदे भूषवलेले विक्रमजीत रॉय यांनी केले.

अमला अक्किनेनी यांनी चित्रपट निर्मितीचे सहकार्यात्मक स्वरूप अधोरेखित केले. चित्रपट शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्याची आणि चित्रपट निर्मितीतील विविध शाखा एकमेकांवर कशा अवलंबून असतात, हे समजून घेण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्यांनी प्रचलित रूढ कल्पनांना आव्हान द्यावे आणि अधिकाधिक महिलांना चित्रपट निर्मितीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या क्षेत्रातील बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करताना इच्छुक चित्रपट निर्मात्यांनी अपेक्षेपलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची तयारी विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.
आपला वैयक्तिक अनुभव सांगताना अनुपम खेर यांनी अभिनेत्याची क्षमता विकसित करण्यात औपचारिक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) आपल्या प्रारंभिक वर्षांची आठवण करून देताना ते म्हणाले, “मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेलो नसतो, तर आज येथे बसलेलो नसतो.”
आपल्या पहिल्या ‘सारांश’ या चित्रपटाचा संदर्भ देताना खेर यांनी सांगितले की, या चित्रपटात त्यांनी वयाच्या 28 व्या वर्षी 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. ही आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी एनएसडीमधील प्रशिक्षणाने आपल्याला सक्षम केले, असे त्यांनी नमूद केले. निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि भावनिक स्मृती हे अभिनेत्याचे 3 आवश्यक गुण असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्तीचे अनुभव स्मृतीमध्ये साठवले जातात आणि व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्यासाठी ते एक महत्त्वाचे साधन ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनय म्हणजे नवरसांशी जोडले जाणे, असे सांगताना त्यांनी नमूद केले की, एखाद्या दृश्याची, प्रसंगाची किंवा कथेची गरज लक्षात घेऊन अभिनेत्याला या 9 भावनांचे स्मरण करून त्या प्रभावीपणे व्यक्त करता आल्या पाहिजेत. इच्छुक अभिनेत्यांना या भावना समजून घेण्यासाठी, त्यांचा सराव करण्यासाठी आणि त्या प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी चित्रपट शिक्षण संस्था मदत करतात. तरुण अभिनेत्यांना दैनंदिन जीवनातून प्रेरणा घेण्याचा सल्ला देताना ते म्हणाले, “प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवतो. एक माणूस म्हणून तुम्ही जे शिकता, ते तुमच्या अभिनयात उपयोगी पडते.”

सक्षमता कधीकधी उत्कृष्टतेच्या मार्गातील अडथळा ठरू शकते असे निरीक्षण नोंदवत अनुपम खेर यांनी युवा अभिनेत्यांना आत्मसंतुष्टतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, कलाकारांनी त्यांची कौशल्ये आणि कला यामध्ये सुधारणा करत राहण्यासाठी सतत प्रयत्न करायला हवे.
चित्रपट निर्मितीसाठी सातत्यपूर्ण सराव, अनुभव आणि जगभरातील चित्रपटांची ओळख करून घेणे गरजेचे आहे यावर आर्तुर डबोर्स्की यांनी अधिक भर दिला.तरुण चित्रपट निर्मात्यांना वैविध्यपूर्ण चित्रपट परंपरांची ओळख करून देण्यात तसेच वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांसोबत आणि व्यावसायिकांसोबत सहभागी होणे त्यांना शक्य करून देण्यात चित्रपट महोत्सवांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. चित्रपटांच्या क्षेत्रात काहीतरी अस्सल निर्माण करण्याची इच्छा असलेल्या चित्रपट निर्मात्यांसाठी जागतिक चित्रपटविश्वातील घडामोडी समजून घेणे अत्यावश्यक आहे.
वॉर्सॉ फिल्म स्कूलने स्वीकारलेला दृष्टीकोन सामायिक करत डबोर्स्की म्हणाले की, तेथे विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची आणि चुकांपासून शिकण्याची परवानगी असलेल्या संस्थात्मक वातावरणात चित्रपटनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अशा संधी महत्त्वाच्या असतात कारण व्यावसायिक चित्रपटांच्या सेट्सवर झालेल्या चुकांमुळे मोठे आर्थिक आणि व्यावहारिक परिणाम भोगावे लागू शकतात असेही त्यांनी नमूद केले.
निर्मात्यांसमोर चित्रपट प्रकल्पांचे सादरीकरण करणे, निधी प्राप्त करणे आणि या क्षेत्राची व्यावसायिक परिसंस्था समजून घेणे या बाबींसह विद्यार्थ्यांना चित्रपटनिर्मितीच्या व्यावसायिक पैलुंसाठी तयार करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी अधिक भर दिला. चित्रपट महोत्सवांचा अनुभव मिळवणे हा या तयारीचा अविभाज्य भाग आहे असे त्यांनी सांगितले.

युरोपीय महोत्सव ज्या प्रकारच्या चित्रपटांच्या शोधात असतात त्यांच्याबद्दल बोलताना डबोर्स्की यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना अशा विषयांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले जे त्यांना अस्वस्थ करतात किंवा ज्या गोष्टींचा स्वीकार करणे त्यांना कठीण वाटते. चित्रपट महोत्सव अशाच चित्रपटांना महत्त्व देतात जे चित्रपट महत्त्वाच्या सामाजिक आणि मानवी समस्यांचा अर्थपूर्ण पद्धतीने उहापोह करतात.
भूपेंद्र कैंथोला यांनी कलात्मक अभिव्यक्ती आणि संस्थात्मक प्रशिक्षण यांच्यातील्न नातेसंबंध अधोरेखित केला. होतकरु चित्रपट व्यावसायिकांसाठी औपचारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “कला शोधता येते मात्र कौशल्य शिकवावे लागते.”
चित्रपटनिर्मितीमध्ये यश मिळवण्यासाठी सर्जनशीलतेला शिस्त, संरचित शिक्षण आणि व्यावसायिक प्रक्रियांचे काटेकोर पालन यांची जोड लाभणे आवश्यक असते असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमधून (एफटीआयआय) मिळालेल्या अनुभवांच्या आधारे कैंथोला यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमधून पारंपरिक कारकीर्दीच्या अपेक्षा व्यक्त होत असताना देखील ते चित्रपटविषयक शिक्षणाची निवड करतात. ते म्हणाले की, एफटीआयआयसारख्या सार्वजनिक संस्थांवर विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आकांक्षांची जोपासना करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असते.
व्यावसायिक चित्रपटांचे सेट्स बहुविध व्यावहारिक मर्यादांतर्गत काम करतात त्यामुळे होतकरु कलाकारांना प्रयोग करण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये होणाऱ्या चुकांतून शिकण्यासाठी मर्यादित वाव राहतो यावर मनोज परमहंस यांनी अधिक भर दिला.
म्हणूनच फिल्म स्कूल्स संरचित वातावरणात चित्रपटनिर्मितीची मुलभूत तत्वे शिकवून अत्यंत महत्त्वाचा पाया तयार करतात. तांत्रिक कौशल्यांच्या पलीकडे पोहोचून विद्यार्थ्यांना मनुष्यबळ संसाधनांचे व्यवस्थापन करणे, गटांमध्ये समन्वय साधणे आणि सहयोगातून काम करण्यासाठी तयार करतात. कोणत्याही चित्रपट निर्मिती प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी हे घटक अत्यावश्यक आहेत असे त्यांनी सांगितले.
उपस्थित पॅनेलने चित्रपटांचे शिक्षण आणि चित्रपट निमिती यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावाबाबत देखील चर्चा केली.
पुनःपुन्हा करावी लागणारी कामे सोपी करणे, प्राथमिक स्टोरीबोर्ड तयार करणे आणि उत्पादन प्रक्रियेच्या ओघात सुधारणा करणे यांसारख्या कार्यांसाठी एआयचा अधिकाधिक वापर होऊ लागला आहे असे निरीक्षण मनोज परमहंस यांनी नोंदवले. तांत्रिक प्रगतीने दृश्य निर्मितीमध्ये देखील परिवर्तन घडवून आणले असून चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही पार्श्वभूमीत सुधारणा करणे तसेच अत्याधुनिक दृश्य वातावरण निर्माण करणे शक्य झाले आहे.
तंत्रज्ञानातील प्रागतिक घडामोडींचा स्वीकार करण्याची गरज मान्य करत, अनुपम खेर यांनी मानवी भावना सर्जनशील अभिव्यक्तीच्या केंद्रस्थानी असतात यावर अधिक भर दिला. एआय च्या मदतीने तयार केलेल्या आभासी अवतारांचा संदर्भ देत ते म्हणाले की तंत्रज्ञानामुळे प्रतिमा आणि सादरीकरणे निर्माण करणे शक्य झाले असले तरीही माणसे अभिनयात जे मन आणि आत्मा ओततात तसे करणे तंत्रज्ञानाला शक्य नाही.
या कार्यक्रमात झालेल्या चर्चांनी संस्थात्मक प्रशिक्षण, व्यावहारिक अनुभव आणि प्रयोगशीलता यांचा मेळ घालून सर्जनशील प्रतिभेची जोपासना करण्यात फिल्म स्कूल्सचे निरंतर महत्त्व अधोरेखित केले. होतकरु चित्रपट निर्मात्यांनी बदलाभिमुख, तंत्रज्ञानदृष्ट्या जागरूक तसेच सातत्यपूर्ण शिक्षण आणि पुनर्निर्मितीप्रती कटिबद्ध राहण्याच्या गरजेवर देखील अधिक भर दिला.
गोव्यात दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी) देश आणि जगभरातील चित्रपट निर्माते , या उद्योगातील व्यावसायिक आणि चित्रपट रसिक यांना एकत्र आणले आहे. चित्रपटांची सादरीकरणे, मास्टरक्लासेस आणि आंतरसंवादात्मक चर्चा यांच्या माध्यमातून या महोत्सवाने चित्रपटविषयक देवाणघेवाण, शिक्षण आणि सहयोग यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/नितीन गायकवाड/संजना चिटणीस/दर्शना राणे