57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या इफ्फी मध्ये ईशान्येकडील चित्रपटांतून सांस्कृतिक वारसा, ओळख तसेच सामाजिक वास्तवांच्या कथांची मांडणी


दिग्दर्शक एमी बरुआ आणि दुयू ताब्यो यांनी ईशान्य भारताचा स्वदेशी वारसा, भाषा आणि अकथित कथा जतन करण्यात चित्रपटांची भूमिका अधोरेखित केली

Posted On: 22 NOV 2026 4:26PMby PIB MumbaiRelease ID: 2340011Views: 6

गोवा, 22 नोव्‍हेंबर 2026

 

ईशान्य भारतातील दोन चित्रपटांनी 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आसाम मधील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी धडपडणाऱ्या पारंपरिक हातमाग विणकर समुदायापासून अरुणाचल प्रदेशातील डोंगराळ भागात राहणाऱ्या दुःखी पित्याच्या मानसिक प्रवासापर्यंत, ओळख, लवचिकता आणि मानवी भावनांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा सादर केल्या. 

भारतीय पॅनोरमामध्ये ईशान्येकडील चित्रपटांपैकी रेड कार्पेट हा आसामी माहितीपट नॉन-फिचर विभागात तर उरुम हा चित्रपट फिचर-फिल्म विभागातून सादर झाला.

गोव्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत एमी बरुआ यांनी दिग्दर्शित केलेला ‘रेड कार्पेट’ हा आसामी चित्रपट आणि दुयू ताब्यो यांनी दिग्दर्शित केलेला उरुम या दोन चित्रपटांवर अधिक भर देण्यात आला आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्यांचे चित्रपट आणि चित्रपट निर्मितीचा प्रवास याविषयी सखोल माहिती सामायिक केली.

रेड कार्पेट हा चित्रपट आसाममधील कार्बी अँगलाँगमध्ये राहणाऱ्या कार्बी समुदायाच्या पारंपरिक हातमाग विणकामाच्या वारशाचे दर्शन घडवतो. या अनेक शतकांहून प्राचीन कलेला आता आधुनिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीशी संबंधित आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. एक हाती विणलेले वस्त्र कशा प्रकारे सांस्कृतिक ओळख, अभिमान आणि आशेचे प्रतीक बनते याचा मागोवा घेत हा माहितीपट एका पारंपरिक विणकराचा डोनकामोकम गावापासून कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटपर्यंतच्या प्रवासाचे दर्शन घडवतो.  

दिग्दर्शक, पुरस्कारप्राप्त भारतीय अभिनेत्री आणि पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या चित्रपट निर्मात्या एमी बरुआ यांनी चित्रपटाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन सामायिक केला. आसाममधील छोट्याश्या गावातून एका पारंपरिक, हाती विणलेल्या वस्त्राला प्रतिष्ठित कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेट पर्यंत घेऊन जाण्याच्या प्रवासाविषयी त्यांनी भाष्य केले.

या वस्त्रांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे या प्रदेशातील स्वदेशी वारशाची दृश्यमानता वाढली, असे नमूद करत त्यांनी स्थानिक विणकरांची हस्तकला आणि त्यांच्या पारंपरिक वस्त्रांमधून प्रतीत होणारी त्यांची सांस्कृतिक ओळख अधोरेखित केली.  

पारंपरिक विणकाम पद्धतींचे जतन करण्याच्या गरजेवर अधिक भर देत, एमी बरुआ यांनी युवा पिढीला त्यांची भाषा, संस्कृती आणि परंपरांचा अभिमान बाळगण्याचे आणि हा वारसा पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.

उरुम हा दुसरा चित्रपट, दुयू ताब्यो यांनी दिग्दर्शित केला असून तो अरुणाचल प्रदेशातील दुर्गम डोंगराळ समुदायात राहणाऱ्या पित्याला पोटच्या लहान मुलीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाच्या कहाणीतून दुःख, स्मृती आणि स्थानिक श्रद्धांचा शोध घेतो. तो पिता अपराधीपणाची भावना आणि भयावह दृश्यांशी झुंजत असताना, हा चित्रपट गाडून टाकलेले वास्तव, मानसिक आघात आणि त्याच्या लोकांच्या जीवनांना आकार देणाऱ्या अदृश्य शक्ती यांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याला पूर्णविराम मिळवण्याच्या शोधाचे चित्रण करतो.

अरुणाचल प्रदेशातील स्वतंत्र लेखक-दिग्दर्शक आणि सांस्कृतिक अभ्यासक दुयू ताब्यो, ज्यांचे कार्य स्थानिक ओळख, स्मृती आणि सामाजिक वास्तवाचा शोध घेते, यांनी अरुणाचल प्रदेशातील झिरो येथे बालपणी पाहिलेल्या एका घटनेची आठवण सांगितली. या घटनेत एका वडिलांना आपल्या मुलीच्या निधनाच्या दुःखाशी झुंजताना त्यांनी पाहिले होते. ही आठवण अनेक वर्षे त्यांच्या मनात घर करून राहिली आणि अखेर ती या चित्रपटाचा पाया बनली. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाद्वारे कोणताही विशिष्ट नैतिक संदेश देण्याऐवजी एका शोकाकुल वडिलांची मानसिक आणि भावनिक अवस्था उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ताब्यो यांनी इफ्फीचे  आभार मानले आणि इफ्फीमध्ये आपल्या चित्रपटाची निवड होणे ही अरुणाचल प्रदेशातील उदयोन्मुख चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे नमुद केले. यामुळे राज्यातील अधिक तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कथा सांगण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भाषिक आणि सांस्कृतिक संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना ताब्यो म्हणाले की, हा चित्रपट स्थानिक निशी भाषेत बनवणे हा भाषेचा अस्सलपणा जपण्यासाठी आणि या भाषेला अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी घेतलेला एक जाणीवपूर्वक निर्णय होता. तरुण पिढीचा त्यांच्या स्थानिक भाषांशी असलेला संपर्क दिवसेंदिवस कमी होत चालला आहे असे नमूद करत, त्यांनी या चित्रपटाचे वर्णन निशी समुदायाचा भाषिक वारसा जपण्याचा एक प्रयत्न असे केले.

ईशान्य भारतातील चित्रपटसृष्टीच्या वाढत्या क्षमतेबद्दल बोलताना ताब्यो यांनी निरीक्षण नोंदवले की, हा प्रदेश अद्याप समोर न आलेले चित्रपटसृष्टीचे एक क्षेत्र आहे, ज्याच्याकडे जगाला देण्यासारखे बरेच काही आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांचा या प्रदेशातील वाढता रस त्यांनी नमूद केला आणि चित्रपट हे मनोरंजनापलीकडे जाऊन सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करू शकते यावर भर दिला. स्थानिक कथा, भाषा आणि जीवनपद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व त्यांनी पुढे अधोरेखित केले आणि असे प्रयत्न तरुण पिढीला त्यांच्या मुळांशी पुन्हा जोडण्यास आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीची समृद्धी जाणून घेण्यास मदत करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

हे दोन्ही चित्रपट ईशान्य भारतातील वेगवेगळ्या कथा राष्ट्रीय चित्रपट मंचावर आणतात. यातून या प्रदेशातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव, स्थानिक परंपरा आणि समकालीन वास्तव प्रतिबिंबित होते. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील त्यांचा समावेश यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या चित्रपट विषयक विविधतेत भर घालतो. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन स्मिता सैकिया यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/नितीन गायकवाड//दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340011
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026