गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमधील (IFFI - International Film Festival of India) इंडियन पॅनोरमा या कथाबाह्य चित्रपट निवड समितीने आज आयोजित पत्रकार परिषदेत आपले अनुभव मांडले. या संवादातून समितीच्या सदस्यांनी काटेकोर निवड प्रक्रिया, भारतीय सिनेमा जगतातील वैविध्य, कथात्मक मांडणीचे सामर्थ्य आणि चित्रपट निर्मितीतील तंत्रज्ञानाची बदलती भूमिका उलगडली. या विभागासाठी आलेल्या प्रभावी 358 प्रवेशिकांच्या संग्रहातून 20 चित्रपटांची निवड करण्यामागील विचारमंथनाची झलक या संवादातून उपस्थितांना अनुभवायला मिळाली.
_20261121193112_98e208.jpeg)
या पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ यांच्यासह निवड समितीचे सदस्य आरती पटेल, अभिजित अरविंद दळवी, रागिणी सोना, शिव सनी, शंखजित डे आणि धनेश यादव टी. आर. हे उपस्थित होते. पत्र सूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार यांनी या संवादाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
या विभागासाठीच्या निवड प्रक्रियेमागील तत्त्वज्ञानाविषयी खटुआ यांनी माहिती दिली. सिनेमाच्या माध्यमातून भारताचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व व्हायला हवे हा निवड समितीचा मुख्य प्रयत्न होता, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. यादृष्टीनेच यंदाच्या महोत्सवाच्या सीमाविरहित कथा या संकल्पनेचा संदर्भही त्यांनी दिला. या विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांमधून कथात्मक मांडणीतील वैश्विक भावना प्रतिबिंबित होते आणि त्यासोबतच आपल्या देशाची बहुआयामी ओळख, जगण्यातले अनुभव आणि सांस्कृतिक समृद्धी टिपण्याचा प्रयत्नही दिसतो असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

निवड प्रक्रियेबद्दलचा सविस्तर तपशील खटुआ यांनी मांडला. पारंपरिक सिनेमॅटिक चौकट आणि मुख्य प्रवाहातील संवेदनशीलतेच्या पलीकडे जात, निवड समितीने आलेल्या चित्रपटांचे अनेक फेऱ्यांअंतर्गत काटेकोर मूल्यमापन केले, असे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेतून देशाच्या विविध भागांमधील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आणि प्रभावी कथानकांची मांडणी करणाऱ्या चित्रपटांचा शोध घेण्यात आल्याचे ते म्हणाले. या विभागासाठी निवड झालेल्या कलाकृतींकडे एकत्रितपणे पाहिल्यास त्यातून देशातील वैविध्यपूर्ण चालीरीती, परंपरा आणि सांस्कृतिक अवकाशाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते, असे त्यांनी नमूद केले. निवड समितीने सर्वसमावेशक दृष्टिकोनातूनच ही निवड प्रक्रिया पार पाडल्याचे त्यांनी अधोरेखित केले. चित्रपटांचे मूल्यमापन हे केवळ त्यांची शैली किंवा कथात्मक मांडणी अशा स्वतंत्र घटकांवरून न करता, एक संपूर्ण कलाकृती म्हणून त्यांचा विचार केला गेल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता प्रभाव लक्षात घेत खटुआ यांनी मानवी कल्पनाशक्ती, संवेदनक्षमता आणि दृष्टीकोन नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि अनमोल राहतील हे अधोरेखित केले. सर्जकतेचे एक मौल्यवान साधन म्हणून एआयची क्षमता मान्य करत त्यांनी आवर्जून हेच सांगितले की, तंत्रज्ञानाने कलेच्या मागील मानवी बुद्धीची जागा घेण्याऐवजी कलात्मक अभिव्यक्तीला पूरक बनून समृध्द करायला हवे.

परीक्षक समिती सदस्य आरती पटेल यांनी त्यांचे अनुभव सामायिक करताना, विशेष करून सादरीकरणातील विषय, संकल्पना आणि दृष्टीकोनांची असामान्य श्रेणी लक्षात घेता, निवड प्रक्रियेचे वर्णन एकाच वेळी अत्यंत अवघड आणि अत्यंत समाधानकारक असे केले. चित्रपट हे भाषिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पल्याड पोहोचून लोक आणि समुदायांना एकमेकांजवळ आणणारी वैश्विक भाषा म्हणून काम करतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
अभिजित अरविंद दळवी म्हणाले की, महोत्सवासाठी सादर झालेल्या चित्रपटांनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटीय आविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या वैविध्यपूर्ण सामाजिक वास्तवांचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे चित्रण करत परिक्षकांना भारताचे विहंगम दृश्य दाखवले. या चित्रपटांनी देशाच्या चित्रपट निर्मिती परंपरांच्या समृद्धीचे तसेच चित्रपट निर्माते त्यांच्या आजूबाजूचा परिसराचा ज्या विविध प्रकारे अर्थ लावतात त्याचे प्रतिबिंब कशा प्रकारे दाखवले हे त्यांनी अधोरेखित केले.
परीक्षक मंडळातील समावेश आपल्यासाठी अनेक गोष्टी शिकण्याचा मौल्यवान अनुभव होता असे सांगत रागिणी सोना यांनी या महोत्सवाची ‘सीमाविरहित कथा’ ही संकल्पना सुंदर आणि अर्थपूर्ण आहे अशा शब्दात प्रशंसा केली. सीमा ओलांडून जाणाऱ्या आणि सामायिक मानवी अनुभवांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडल्या जाणाऱ्या कथांचे महत्व सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला.
अर्थपूर्ण कथाकथन मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन विचारांना प्रवृत्त करते, दृष्टीकोनांना आकार देते आणि सकारात्मक सामाजिक बदलांसाठी प्रेरित करते यावर अधिक भर देत शिव सनी यांनी चित्रपटांमध्ये असलेल्या परिवर्तनकारी सामर्थ्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
या पत्रकार परिषदेने चित्रपटांच्या निवडीविषयी परीक्षकांचा दृष्टीकोन समजून घेण्याची तसेच भारतीय पॅनोरमासाठी चित्रपट निश्चित करताना त्यांनी विचारात घेतलेल्या बाबी समजून घेण्याची संधी दिली. विविध भाग, संस्कृती आणि जिवंत अनुभव यांमध्ये रुजलेल्या कथांना एकत्र आणून, करण्यात आलेली चित्रपटांची निवड भारतीय चित्रपटविश्वाची समृद्धी आणि भौगोलिक तसेच सांस्कृतिक सीमारेषांच्या पलीकडे पोहोचून प्रेक्षकांशी जोडले जाण्याची या चित्रपटांची क्षमता यांचे दर्शन घडवण्यात भारतीय पॅनोरमाच्या भूमिकेला दुजोरा देते.
***
सुषमा काणे/तुषार पवार/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com