गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमापार अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मॉन्सून थंडर’च्या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एनसीबी आणि अमेरिकेच्या डीईएचे केले अभिनंदन

Posted On: 21 NOV 2026 5:55PM by PIB Mumbai

सीमापार अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मॉन्सून थंडर’च्या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन (डीईए) यांचे अभिनंदन केले आहे.

गृहमंत्र्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले, “सीमापार अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मॉन्सून थंडर’च्या उल्लेखनीय यशाबद्दल एनसीबी आणि अमेरिकेच्या डीईएचे हार्दिक अभिनंदन. या मोहिमेअंतर्गत भारत आणि अमेरिकेत करण्यात आलेल्या अटक आणि जप्ती कारवाया, अंमली पदार्थांच्या संकटाला आळा घालण्यासाठी भारत-अमेरिका भागीदारीच्या सामर्थ्याची साक्ष देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात एकही ग्रॅम अंमली पदार्थ येणार नाही किंवा इतर देशांमध्ये जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही एनसीबी आणि अमेरिकेच्या डीईएच्या संयुक्त यशाचे कौतुक करत ‘ऑपरेशन मॉन्सून थंडर’ची प्रशंसा केली.

अमेरिकेच्या राजदूतांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले, “अमेरिका-भारत भागीदारी प्रत्यक्ष कृतीतून दिसून येण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे! ‘ऑपरेशन मॉन्सून थंडर’ अंतर्गत भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमेरिकेच्या डीईएच्या निकट समन्वयाने अमेरिकेतील ग्राहकांना बेकायदेशीर अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कला खंडित केले आणि 6 व्यक्तींना अटक केली. आपल्या नेतृत्वाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे आभार.”

प्रमुख कारवाईचे परिणाम:

• भारतातील 4 शहरांमध्ये 6 व्यक्तींना अटक

• अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या जवळपास 5 लाख गोळ्यांचा समावेश असलेल्या सुमारे 3,000 पार्सलची ओळख पटवण्यात आली

• अमेरिकेतील 59,000 हून अधिक व्यक्तींशी संबंधित माहिती अमेरिकेच्या डीईएला सामायिक करण्यात आली

• अमेरिकेच्या डीईएने 2 प्रत्यक्ष अमली पदार्थांच्या खेपा अडवून जप्त केल्या

या कारवाईतून भारत-अमेरिका कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील सहकार्याचे सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी नेटवर्क नष्ट करण्यासाठी दोन्ही यंत्रणांची कटिबद्धता अधोरेखित होते. या तस्करीचे सूत्रधार, पार्सल पुढे पाठवणारे मध्यस्थ, आर्थिक व्यवहारांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा मागोवा घेणे आणि व्यापक आंतरराष्ट्रीय संबंध शोधून काढण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

***

माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2339733) अभ्यागत कक्ष : 18