गोवा, 19 नोव्हेंबर 2026
2007 मध्ये 18 देशांतील 204 प्रतिनिधींच्या एका लहानशा मेळाव्यापासून सुरू झालेल्या फिल्म बाजारने 2025 मध्ये 40 हून अधिक देशांतील 2,500 हून अधिक प्रतिनिधींचे स्वागत करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठ बनण्यापर्यंत मजल मारली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडणारे महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून फिल्म बाजार विकसित झाला आहे. यंदा 20वे वर्ष साजरे करणारा वेव्ह्ज फिल्म बाजार 2026 हा सर्जनशील सहयोगाला प्रोत्साहन देण्याच्या, नवीन कथा शोधण्याच्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी जागतिक संधी निर्माण करण्याच्या दोन दशकांच्या वाटचालीचा उत्सव साजरा करत आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) चा एक भाग म्हणून आयोजित, वेव्ह्ज फिल्म बाजार हा व्यापक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्ह्ज) उपक्रमाचा एक भाग आहे. ‘भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा’ या संकल्पनेने प्रेरित होऊन, हे व्यासपीठ सह-निर्मिती, वित्तपुरवठा, वितरण आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे भारताच्या सर्जनशील क्षमतेला जागतिक संधींमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करते.
वेव्ह्ज फिल्म बाजारच्या 20व्या आवृत्तीचे उद्घाटन 20 नोव्हेंबर 2026 रोजी गोव्यातील ‘ताज सिदादे दे गोवा होरायझन’ येथील द बॉलरूममध्ये होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार स्वागतपर भाषण करतील, त्यानंतर महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करतील. एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार उद्घाटनपर भाषण करतील, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार आभार प्रदर्शन करतील. एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग हे देखील यावेळी उपस्थित असतील. औपचारिक कार्यक्रमानंतर फिल्म बाजारच्या पथकाकडून ‘नेव्हिगेटिंग वेव्ह्ज फिल्म बाजार’ या विषयावर सादरीकरण केले जाणार आहे.

कथा आणि संधींची बाजारपेठ
गेल्या दोन दशकांत, फिल्म बाजार केवळ एक संपर्क आणि संवादाचे व्यासपीठ न राहता चित्रपट निर्माते, निर्माते, गुंतवणूकदार, वितरक, विक्री प्रतिनिधी आणि महोत्सव आयोजकांना जोडणाऱ्या एका संरचित बाजारपेठेचे स्वरूप मिळवले आहे. एनएफडीसी स्क्रीनरायटर्स लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट आणि वर्क-इन-प्रोग्रेस लॅब यांसारख्या उपक्रमांद्वारे विकासाच्या विविध टप्प्यांवरील चित्रपटांना हे व्यासपीठ सहाय्य करते. याशिवाय व्ह्यूइंग रूम, मार्केट स्क्रीनिंग्ज, नियोजनबद्ध बी2बी बैठका आणि ज्ञान मालिका यासारख्या उपक्रमामुळे नवीन चित्रपट प्रकल्पांचा शोध, चित्रपट उद्योगातील घटकांची संवाद आणि संभाव्य सहकार्याच्या संधीना चालना मिळते.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीच्या 2025 च्या आवृत्तीमध्ये गोवा येथे 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजित फिल्म बाजार विभागात 40 हून अधिक देशांतील 2,500 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात एकूण 320 प्रकल्प सादर करण्यात आले. तसेच, 220 हून अधिक खरेदीदारांच्या सहभागातून 1,200 पेक्षा अधिक वैयक्तिक व्यावसायिक बैठका पार पडल्या. या बैठकांदरम्यान सुमारे 1,050 कोटी रुपयांच्या व्यावसायिक चर्चा आणि वाटाघाटी झाल्या. याशिवाय, कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुमारे 100 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची माहिती देण्यात आली.
वेव्ह्ज बाजार : भारतातील सर्जनशीलतेचा वार्षिक बाजारपेठेच्या पलीकडे विस्तार
जानेवारी 2025 मध्ये सुरु झालेल्या वेव्ह्ज या उपक्रमाने वेव्ह्ज बाजारच्या माध्यमातून वार्षिक फिल्म बाजारच्या पलीकडे एक वेगळे स्थान निर्माण करत संपूर्ण वर्षभरासाठी व्यवसाय ते व्यवसाय स्तरावर एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. चित्रपट, दूरचित्रवाणी, ओटीटी, ऍनिमेशन, गेमिंग, संगीत आणि इतर सर्जनशील क्षेत्रांचा समावेश असलेला हा उपक्रम क्रिएटर्स आणि व्यवसायांना संभाव्य खरेदीदार आणि सहकाऱ्यांशी जोडतो.
ऑक्टोबर 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका माहितीनुसार वेव्ह्ज बाजार मध्ये सुमारे 12,500 सक्रिय वापरकर्त्यांनी सहभाग घेतला, यामध्ये 5,000 पेक्षा अधिक खरेदीदार आणि सुमारे 6,500 विक्रेते होते आणि त्यात 2,800 सक्रिय प्रकल्पांचा समावेश होता. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सिमॅंटिक सर्च, योग्य व्यावसायिक भागीदारांची जुळवणी, व्हर्च्युअल पिचिंग आणि ऑनलाइन बी2बी बैठकांच्या सुविधांमुळे चित्रपट निर्माते, सर्जक आणि व्यावसायिकांना संभाव्य भागीदार शोधणे अधिक सुलभ झाले आहे. या डिजिटल सुविधांमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम संपल्यानंतरही चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांना संपर्क, सहकार्य आणि संवाद सातत्याने सुरू ठेवण्यास मदत होते.
तसेच ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, इटली, जर्मनी, कॅनडा, फ्रांस आणि स्पेन या देशांमधील विस्तारामुळे याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून भारतीय सर्जनशील उद्योगाला नवीन कवाडे खुली झाली आहेत. गेम्सकॉम, टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव आणि मिपकॉम यांसारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण व्यासपीठांवरील सहभागामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट व आणि उद्योगातील विविध घटकांशी संपर्क, सहकार्य आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.
या उपक्रमांमधून भारतातील प्रतिभेला कलाकृतीपासून ते उद्योगांपर्यंत नेण्याच्या एका व्यापक प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसून येते आणि त्यातूनच आशय निर्मिती, बौद्धिक संपदा आणि सर्जनशील उद्योगासाठीचे एक जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत केले जात आहे.
वेव्ह्ज फिल्म बाजार आपला दोन दशकांचा प्रवासाचा टप्पा पार करत असताना स्वतंत्र चित्रपट निर्माते, प्रादेशिक भाषांमधील चित्रपट आणि उदयोन्मुख सजर्नशील प्रतिभेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहे आणि नवनवीन भागीदारीमधून भारतीय कथांना जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे