कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिवराज सिंह चौहान 20 नोव्हेंबर रोजी भारताची पहिली स्वदेशी एच5एन1 (क्लेड 2.3.2.1अ) कोंबड्यांसाठीची लस देशाला समर्पित करणार


पोल्ट्री क्षेत्रातील रोगनियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी आयसीएआर-एनआयएचएसएडीने विकसित केली स्वदेशी एच5एन1 लस

Posted On: 18 NOV 2026 11:07AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2026

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान 20 नोव्हेंबर 2026 रोजी भोपाळ येथील आयसीएआर-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था (आयसीएआर-एनआयएचएसएडी) येथे कोंबड्यांसाठी विकसित करण्यात आलेली भारताची पहिली स्वदेशी निष्क्रिय एच5एन1 (क्लेड 2.3.2.1अ) अत्यंत रोगकारक पक्षी इन्फ्लूएंझा (एचपीएआय) लस देशाला समर्पित करणार आहेत. भोपाळ येथील आयसीएआर-एनआयएचएसएडीने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली ही लस भारतात क्लेड 2.3.2.1अ या प्रकारच्या एच5एन1 एचपीएआय विषाणूविरुद्धची अशा प्रकारची पहिली लस आहे.

पार्श्वभूमी

अत्यंत संसर्गजन्य पक्षी इन्फ्लूएंझा (एचपीएआय) हा सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून ओळखला जाणारा आजार कुक्कुटपालन क्षेत्राला प्रभावित करणारा गंभीर रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संक्रमित पक्ष्यांपैकी जवळपास 100 टक्के पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर पक्षी मारावे लागणे आणि व्यापारावर निर्बंध येणे यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या आजाराचा परिणाम केवळ कुक्कुटपालन केंद्रांपुरता मर्यादित नसून, जागतिक व्यापार, कुक्कुट उत्पादनांच्या किमती आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही होऊ शकतो. 2006 मध्ये भारतात या रोगाचा पहिला प्रादुर्भाव आढळल्यापासून देशात एच5एन1 आणि एच5एन8 या उपप्रकारांचे मिळून 500 हून अधिक प्रादुर्भाव नोंदवले गेले आहेत.

बर्ड फ्लूच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीत 1.5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. तसेच, या रोगाचा प्रसार नियंत्रणाविना झाल्यास देशातील 20 टक्क्यांहून अधिक कुक्कुट पक्षी धोक्यात येऊ शकतात. 2006 मधील बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अंदाजे 2,200 ते 3,000 कोटी रुपयांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसान झाले होते. मणिपूरमधील एका प्रादुर्भावामुळे राज्याच्या जीडीपीच्या 0.5 टक्क्याइतके नुकसान झाले होते. हा रोग सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, 2003 पासून भारतासह 25 देशांमध्ये एच5एन1 पक्षी इन्फ्लूएंझाचे 1,003 मानवी रुग्ण आढळले असून, त्यापैकी 479 जणांचा मृत्यू झाला आहे.

विषाणूच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, क्लेड 2.3.2.1अ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एच5एन1 प्रकारामुळे कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचे बहुतांश प्रादुर्भाव झाले आहेत. अलीकडच्या काळात या प्रकारामुळे सस्तन प्राण्यांसह विविध प्राणी प्रजातींमध्येही संसर्ग आढळून आला आहे. याशिवाय, या विषाणूच्या संसर्गाचे तीन मानवी रुग्णही आढळले आहेत. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी तसेच कोंबड्यांमधून इतर प्राणी आणि मानवांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्याचा प्रसार नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे.

सध्या क्लेड 2.3.2.1अ प्रकारच्या एच5एन1 विषाणूविरुद्ध कोणतीही विशिष्ट व्यावसायिक लस उपलब्ध नाही. त्यामुळे भारतासाठी स्वदेशी लस विकसित करणे महत्त्वाचे आहे. आयसीएआर-एनआयएचएसएडीने विकसित केलेली ही लस देशात प्रसारित होत असलेल्या क्लेड 2.3.2.1अ प्रकारच्या एच5एन1 विषाणूच्या प्रजातींपासून संरक्षण देऊन ही गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337745) अभ्यागत कक्ष : 11