आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी आयसीएमआर-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले

मलेरिया निर्मूलन साध्य करण्यासाठी राष्ट्रपतींनी सातत्यपूर्ण दक्षता, प्रभावी निगराणी आणि सामुदायिक सहभागाचे आवाहन केले

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी 2030 पर्यंत मलेरिया निर्मूलन साध्य करण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले

Posted On: 17 NOV 2026 6:55PM by PIB Mumbai

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले. गावांमध्ये मलेरियाचा प्रभाव प्रत्यक्ष अनुभवतानाचे आपले वैयक्तिक अनुभव सांगताना, या आजाराने लोकांच्या उपजीविकेवर, शिक्षणावर आणि भविष्यावर कसा परिणाम केला, यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यासाठी आणि आजाराचा पुन्हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषधांचा निर्धारित कोर्स पूर्ण करण्याविषयी जनजागृतीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपतींनी मलेरिया नियंत्रणातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आणि नमूद केले की 2015 ते 2025 दरम्यान मलेरियाची प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये जवळपास 80 टक्क्यांनी घट झाली आहे, तर जास्त प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 155 वरून 33 पर्यंत कमी झाली आहे.

सतत दक्षता आणि प्रभावी उपाययोजनांच्या गरजेवर भर देत, राष्ट्रपतींनी मलेरियाचे निदान, उपचार आणि देखरेख अधिक मजबूत करणे, डास नियंत्रण, नवीन औषधे आणि लसींचा विकास, तसेच अधिक जनजागृती आणि सामुदायिक सहभागाचे आवाहन केले. त्यांनी यावर जोर दिला की वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे निष्कर्ष ज्या गावांमध्ये आणि समुदायांमध्ये त्यांची सर्वाधिक गरज आहे, तिथे पोहोचले पाहिजेत. हवामान बदल, अनियोजित शहरीकरण आणि डासांमध्ये वाढणारी कीटकनाशक प्रतिकारशक्ती यांसारख्या उदयोन्मुख आव्हानांकडे लक्ष वेधत, त्यांनी पाणथळ जागा रोखणे, डासांच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट करणे आणि पर्यावरण व्यवस्थापन मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भुवनेश्वरमध्ये विकसित होत असलेल्या स्वदेशी मलेरिया लसीसाठी आयसीएमआर-एनआयएमआरच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि ही लस भारताच्या मलेरिया निर्मूलनाच्या प्रयत्नांना साहाय्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  जगत प्रकाश नड्डा यांनी आयसीएमआर-एनआयएमआरला (ICMR-NIMR) ५० वर्षांची समर्पित वैज्ञानिक सेवा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की गेल्या दशकात मलेरिया नियंत्रणात भारताने केलेली प्रगती ही डासांच्या वर्तनावरील आणि मलेरियाच्या परजीवींवरील संशोधन, सामुदायिक सहभाग, प्रभावी प्रतिबंध, लवकर निदान आणि योग्य उपचार यांचा समावेश असलेल्या एका व्यापक दृष्टिकोनाचा परिणाम आहे. आपल्या धोरणांमध्ये आणि कार्यनीतींमध्ये आवश्यक बदल घडवून आणून आपण २०३० पर्यंत मलेरियाचे निर्मूलन करू, असे सांगून त्यांनी आयसीएमआर-एनआयएमआरला नव्या वचनबद्धतेने काम करण्याचे आवाहन केले.

हा सुवर्ण महोत्सवी सोहळा, भारतातील मलेरिया संशोधन आणि सार्वजनिक आरोग्यासाठी आयसीएमआर-एनआयएमआरच्या योगदानाच्या पाच दशकांचे प्रतीक आहे.



 

***
 


Nilima Chitale / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337702) अभ्यागत कक्ष : 3