Posted On:
16 NOV 2026 9:37AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि इजिप्तचे गुंतवणूक तसेच परदेश व्यापार मंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांनी आज इजिप्तच्या नवीन प्रशासकीय राजधानीत भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीच्या (जेटीसी) 7व्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवले. ही मंत्री स्तरावर आयोजित करण्यात आलेली पहिलीच द्विपक्षीय संस्थात्मक बैठक होती. भारत-इजिप्त यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या आर्थिक पैलूला बळकट करण्याला दोन्ही सरकारांनी दिलेले प्राधान्य या बैठकीतून अधोरेखित होते.
दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार वाढवून 12 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टाप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. व्यापारात विविधता आणणे, मूल्यवर्धित निर्यातीला प्रोत्साहन देणे तसेच व्यापार-संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याच्या गरजेवर दोन्ही देशांनी भर दिला. 7व्या संयुक्त व्यापार समितीच्या बैठकीचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणून, दोन्ही मंत्र्यांनी अधिक मजबूत द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी, दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील गुंतवणुकीच्या संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य व्यापार करार किंवा मुक्त व्यापार कराराच्या कार्यकक्षेचा शोध घेण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यावर सहमती दर्शवली.
या बैठकीपूर्वी दोन्ही मंत्र्यांमध्ये व्यापार वाढवणे, गुंतवणुकीला चालना देणे तसेच दीर्घकालीन औद्योगिक आणि व्यावसायिक संबंध विकसित करणे यावर द्विपक्षीय चर्चा झाली. संयुक्त व्यापार समितीच्या बैठकीने विद्यमान व्यापारी संबंधांचा आढावा घेण्याची, व्यवसायांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे मूल्यांकन करण्याची आणि अधिक जवळच्या सहकार्यासाठी नवीन क्षेत्रे ओळखण्याची संधी उपलब्ध करून दिली.
समितीने भारत-इजिप्त व्यापारातील वाढीचा आढावा घेतला. आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल 2025–मार्च 2026) मध्ये द्विपक्षीय व्यापार 35% वाढून 6.5 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला. एप्रिल-सप्टेंबर 2026 दरम्यानचा व्यापार देखील 65% वाढून 5.04 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला. 2025 मधील याच कालावधीतील हा व्यापार 3.08 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. ही वाढ व्यावसायिक देवाणघेवाणीतील वाढती गती तसेच व्यापार वस्तूंच्या अधिक विविधीकरणाची क्षमता दर्शवते. औद्योगिक वस्तू, ऊर्जा आणि खते, रसायने, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, वस्त्रोद्योग आणि कृषी उत्पादने यांच्या व्यापारात वाढ होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरकता आहे.
चर्चेत प्रामुख्याने व्यापाराचा विस्तार करणे, पुरवठा साखळी विकसित करणे आणि अंदाज बांधता येण्याजोगे व्यापारी मार्ग प्रस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. दोन्ही बाजूंनी बिगर-शुल्क अडथळ्यांवर उपाययोजना करणे, सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करणे, मानके आणि अनुरूपता मूल्यांकन मजबूत करणे, तसेच बाजारपेठेत प्रवेश सुधारणे या उपायांवर विचार केला. त्यांनी उत्पादन नोंदणी आणि व्यापार-संबंधित नियामक प्रक्रिया यांसारख्या व्यावसायिक कामकाजावर परिणाम करणाऱ्या व्यावहारिक मुद्द्यांवरही चर्चा केली.
चर्चेत व्यावसायिक देवाणघेवाण मजबूत करणे तसेच संयुक्त उत्पादन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे, अभियांत्रिकी आणि विद्युत उपकरणे, खते, वस्त्रोद्योग, नवीकरणीय ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले. इजिप्तच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीच्या संधी, तसेच भारताच्या विस्तारत असलेल्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये इजिप्तच्या गुंतवणुकीच्या संधी, हे देखील चर्चेच्या अजेंड्याचा एक महत्त्वाचा भाग होते.
इन्व्हेस्ट इंडिया आणि इजिप्तच्या जनरल अथॉरिटी फॉर इन्व्हेस्टमेंट अँड फ्री झोन्स यांच्यातील विद्यमान आराखडा करार मजबूत करण्यामध्ये दोन्ही देशांनी स्वारस्य दाखवले. गुंतवणुकीची माहिती सामायिक करण्यासाठी आणि व्यावसायिक संबंध सुलभ करण्यासाठी प्रस्तावित डिजिटल व्यासपिठाचाही त्यात समावेश आहे.
सुएझ कालव्याशी इजिप्तचे सान्निध्य तसेच आफ्रिकन, अरब आणि युरोपियन बाजारपेठांशी असलेली त्याची संपर्क क्षमता, यामुळे इजिप्त निर्यात-भिमुख उत्पादन आणि प्रादेशिक पुरवठा साखळ्यांसाठी एक मौल्यवान भागीदार ठरतो. त्या बदल्यात, भारत इजिप्शियन गुंतवणूकदार आणि निर्यातदारांना एक मोठी आणि गतिमान बाजारपेठ, अधिकाधिक स्पर्धात्मक पायाभूत सुविधा तसेच तंत्रज्ञान आणि उत्पादन भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देतो.
संयुक्त व्यापार समितीच्या बैठकीत बोलताना, पीयूष गोयल यांनी भारत आणि इजिप्त यांच्यातील मजबूत पूरकतेच्या पाच क्षेत्रांवर प्रकाश टाकला: औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा – परवडणारी औषधे, लसी आणि वैद्यकीय तंत्रज्ञान यांमधील भारताच्या सामर्थ्याचा उपयोग केला जाईल; अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल – यंत्रसामग्री, वाहनांचे सुटे भाग आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्र यांचा समावेश; कृषी आणि अन्न प्रक्रिया – अन्न सुरक्षा, खते, सिंचन आणि शीत-साखळी पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे; डिजिटल आणि फिनटेक – यूपीआय जोडणी, स्थानिक चलनातील व्यापार आणि भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे; संस्कृती आणि संग्रहालये ग्रँड इजिप्शियन म्युझियम आणि भारताचे प्रस्तावित युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय यांचे संवर्धन, संग्रहण आणि डिजिटायझेशनमधील प्रस्तावित सहकार्याचा समावेश आहे.
मंत्रालयीन स्तरावरील संयुक्त व्यापार समिती (जेटीसी) हे भारत-इजिप्त यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या आर्थिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सप्टेंबर 2026 मध्ये भारतात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या राजकीय गतीचे रूपांतर अधिक मजबूत व्यापार प्रवाह, नवीन गुंतवणूक, संयुक्त उत्पादन, अधिक बाजारपेठ उपलब्धता आणि भारत, इजिप्त आणि व्यापक प्रादेशिक बाजारपेठांना जोडणाऱ्या अधिक सक्षम पुरवठा साखळ्यांमध्ये करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे.
संयुक्त व्यापार समितीची पुढील बैठक 2028 मध्ये नवी दिल्लीत किंवा त्यापूर्वी परस्पर सोयीच्या तारखेला आयोजित करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.
भारत-इजिप्त व्यवसाय मंचाच्या बैठकीत आज भारत आणि इजिप्तमधील 300 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामुळे भारत-इजिप्त धोरणात्मक भागीदारी अंतर्गत व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि इजिप्तचे गुंतवणूक आणि परदेश व्यापार मंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांनी या मंचाला संबोधित केले. विविध क्षेत्रांतील उद्योगपती आणि वरिष्ठ व्यावसायिक प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.
15 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या इजिप्तच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने या मंचाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्राला इजिप्तच्या गुंतवणूक आणि मुक्त क्षेत्रविषयक सामान्य प्राधिकरणाचे (जीएएफआय) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मोहम्मद अवाद, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे (फिक्की) अध्यक्ष आणि सनमार समूहाचे अध्यक्ष विजय शंकर, तसेच इजिप्तच्या वाणिज्य मंडळ महासंघाचे अध्यक्ष अहमद अलवकील यांनी संबोधित केले.
या सत्राला संबोधित करताना पीयूष गोयल यांनी 2027 मध्ये भारत आणि इजिप्त यांच्यातील राजकीय संबंधांना 80 वर्षे पूर्ण होत असताना, द्विपक्षीय सहकार्याला गती देण्यासाठी चार मुद्द्यांचा कृती आराखडा मांडला. यामध्ये निश्चित केलेल्या व्यापारविषयक अडथळ्यांचे ठरावीक कालमर्यादेत निराकरण करणे, इजिप्तमधील गुंतवणूकदारांना भारतातील राज्ये आणि औद्योगिक समूहांमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया या संस्थेने मदत करणे, मोठ्या कंपन्यांच्या पुरवठादारांनाही या भागीदारीत सहभागी करून छोट्या उद्योगांसाठी संधी निर्माण करणे, तसेच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि व्यावसायिक चर्चांचे ठोस करारांमध्ये रूपांतर करण्यासाठी दरवर्षी आढावा बैठकांची संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, या बाबींचा समावेश होता.
काही वर्षांनंतर कोणी या दशकाचा अभ्यास केला, तर त्याला ‘भारताच्या सहकार्याने इजिप्तमध्ये निर्मित,’ आणि ‘इजिप्तच्या सहकार्याने भारतात निर्मित’ असे फलक असलेले कारखाने दिसावेत, असे गोयल यांनी या भागीदारीचे महत्व अधोरेखित करताना सांगितले.
इजिप्तमधल्या गुंतवणुकीच्या संधींवर आयोजित विशेष सत्रात जीएएफआय आणि सुएझ कालवा आर्थिक क्षेत्र (एससीझेडओएनई) यांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांनी इजिप्तमधल्या औद्योगिक आणि गुंतवणुकीच्या संधींची माहिती दिली. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारे इजिप्तचे मोक्याचे भौगोलिक स्थान, विस्तारत असलेली बंदरे आणि रसदविषयक पायाभूत सुविधा, तसेच आफ्रिका, अरब देश आणि युरोपमधल्या बाजारपेठांपर्यंत असलेला प्रसार यामुळे उत्पादन आणि निर्यातकेंद्रित उद्योग उभारू इच्छिणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
इजिप्तमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांच्या अनुभवांवरही या मंचात एक सत्र आयोजित करण्यात आले होते. टीसीआय सनमार, गॅलेक्सी केमिकल आणि अब्डोस या कंपन्यांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले. इजिप्तमधले औद्योगिक उत्पादन, रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान विकास, निर्यात आणि प्रादेशिक पुरवठा साखळ्यांशी एकात्मता वाढवण्यात भारतीय गुंतवणूक कशा प्रकारे योगदान देऊ शकते, हे या कंपन्यांच्या उपस्थितीतून स्पष्ट झाले. दोन्ही देशांच्या व्यावसायिक प्रतिनिधींनी अभियांत्रिकी आणि विद्युत उपकरणे, रसायने आणि खते, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, वाहनांचे सुटे भाग, नवीकरणीय ऊर्जा आणि रसदव्यवस्था या क्षेत्रांमधल्या सहकार्याच्या संधींची चर्चा केली.
डिजिटल अर्थव्यवस्थेवर आयोजित विशेष चर्चासत्रात इजिप्तमधील डिजिटल तंत्रज्ञान आणि परिवर्तन क्षेत्रातील भागधारकांसह भारतातील आघाडीच्या नवउद्यम आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. ग्लोबल फॉर स्मार्ट सोल्युशन्सचे अध्यक्ष अभियंता अयमान एल गोहारी यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. यात दोन्ही देशांमधले तज्ज्ञ आणि उद्योगक्षेत्रातल्या धुरिणांचा समावेश होता. इजिप्तच्या वतीने माहिती तंत्रज्ञान उद्योग विकास संस्थेचे (आयटीआयडीए) अभियंता महमूद सोफ्राटा, एजीएक्सचे फादी इस्माईल, नॅशनल सिस्टीमचे डॉ. करीम हमजा आणि इराम होल्डिंगचे डॉ. सिद्दीक अहमद सहभागी झाले. भारताच्या उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व झोहोचे राजेश रंगनाथन आणि डेटामॉर्फोसिसचे प्रदीप गिलबिले यांनी केले. उद्योगांसाठीचे तंत्रज्ञान, डिजिटल उपाययोजना, नवोन्मेष आणि औद्योगिक भागीदारीतल्या संधींवर या चर्चेत भर देण्यात आला.
याच दिवशी सकाळी नव्या प्रशासकीय राजधानीत भारत-इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषदेची (जेबीसी) सहावी बैठक झाली. पीयूष गोयल आणि इजिप्तचे मंत्री सालेह यांनी या परिषदेला संबोधित केले. भारतातर्फे टीसीआय सनमार केमिकल्स एसएईचे कार्यकारी उपाध्यक्ष गणेश कुमार, तर इजिप्तच्या बाजूने मकरम टेक्सचे खालिद अबुल मकरम यांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. फिक्कीचे अध्यक्ष विजय शंकर यांनीही परिषदेला संबोधित केले.
या संयुक्त व्यवसाय परिषदेत रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा, अन्नप्रक्रिया आणि कृषी व्यवसाय, नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा, बंदरे आणि रसदव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मिती अशा प्राधान्याच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा झाली. व्यावसायिक संघटनांमधील संस्थात्मक संबंध अधिक बळकट करण्याच्या पर्यायांचाही परिषदेने विचार केला. यामध्ये क्षेत्रनिहाय कार्यगट स्थापन करणे, सीमाशुल्क आणि व्यापार सुलभीकरण, व्यावसायिक व्हिसा आणि 2026-27 या वर्षासाठी परस्पर व्यापार प्रतिनिधीमंडळांच्या दौऱ्यांचे वेळापत्रक तयार करणे, या बाबींचा समावेश होता.
या दोन्ही बैठकांमधून भारत आणि इजिप्तच्या अर्थव्यवस्थांमधल्या परस्परपूरक क्षमता अधोरेखित झाल्या. भारताकडे मोठी आणि विस्तारत असलेली बाजारपेठ, स्पर्धात्मक उत्पादनक्षमता, अभियांत्रिकी आणि डिजिटल क्षेत्रातील क्षमता आहे. तर इजिप्तकडे प्रस्थापित औद्योगिक पाया, तत्पर संपर्कव्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि आफ्रिका तसेच व्यापक प्रादेशिक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार 6.5 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक आहे, तर इजिप्तमधली भारतीय गुंतवणूक 5.5 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. दोन्ही देशांना परस्पर गुंतवणूक वाढवणे, संयुक्त उत्पादन प्रकल्प उभारणे, तंत्रज्ञानविषयक भागीदारी विकसित करणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना सेवा देणाऱ्या पुरवठा साखळ्या निर्माण करणे यामध्ये मोठ्या संधी दिसत आहेत.
सप्टेंबर 2026 मध्ये भारतात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पीयूष गोयल यांचा हा दौरा झाला. या उच्चस्तरीय दौऱ्याचा भाग म्हणून 300 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असलेला भारत-इजिप्त व्यवसाय मंच आणि भारत-इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषदेच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. भारत-इजिप्त धोरणात्मक भागीदारीअंतर्गत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची दोन्ही देशांची सामायिक महत्त्वाकांक्षा या उपक्रमांतून स्पष्ट झाली.
पीयूष गोयल यांनी इजिप्तचे गुंतवणूक आणि परकीय व्यापारमंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंधांचा आढावा घेण्यात आला आणि आर्थिक सहकार्य अधिक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. व्यापारवाढ, बाजारपेठांमधील प्रवेश, गुंतवणुकीच्या संधी, औषधनिर्मिती, खते आणि इजिप्तमध्ये भारतीय व्यवसायांसमोर येणाऱ्या अडचणी, विशेषतः व्हिसाविषयक प्रश्न, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारतीय गुंतवणुकीला चालना देणे, द्विपक्षीय पुरवठा साखळ्या अधिक बळकट करणे आणि दोन्ही देशांमधल्या व्यावसायिक संस्थांमधील थेट संबंध वाढवणे यांचे महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केले.
पीयूष गोयल यांनी इजिप्तचे उद्योगमंत्री अभियंता खालिद हाशेम यांच्याशीही द्विपक्षीय बैठक घेतली. औद्योगिक सहकार्य अधिक बळकट करणे, उत्पादन क्षेत्रातल्या भागीदारीला प्रोत्साहन देणे आणि गुंतवणुकीचे परस्पर संबंध वाढवणे यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक विकास, तंत्रज्ञानविषयक भागीदारी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास, औद्योगिक स्वयंचलन आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमधल्या संभाव्य सहकार्याचाही दोन्ही बाजूंनी विचार करण्यात आला.
***
NitinFulluke / ShradhhaMukhedkar / NikhileshChitre / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai