इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
Posted On:
14 NOV 2026 12:41PM by PIB Mumbai
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण (DPDP) कायदा, 2023 अंतर्गत संमती व्यवस्थापकांसाठीचा (Consent Managers) नोंदणी आराखडा 13 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाला आहे. या अंमलबजावणीच्या टप्प्याचा भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांनी पात्र कंपन्यांना संमती व्यवस्थापक म्हणून नोंदणीसाठी अर्ज करता यावा यासाठी https://dpbi.gov.in या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ केला.
हा आराखडा डेटा प्रिन्सिपल्सना त्यांच्या वैयक्तिक डेटाशी संबंधित संमतीवर अधिक नियंत्रण ठेवता येईल, अशा प्रकारची प्रणाली कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. डीपीडीपी आराखड्याच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अंमलबजावणीचा हा भाग असून पात्र संस्थांना नोंदणी करण्यासाठी आणि संमती व्यवस्थापन सेवा देण्याची तयारी करण्यासाठी सक्षम करतो.
संमती व्यवस्थापकांची भूमिका आणि उत्तरदायित्व
संमती व्यवस्थापक ही भारतीय डेटा संरक्षण मंडळाकडे नोंदणीकृत असलेली अशी संस्था आहे, जी डेटा प्रिन्सिपल्सना सुलभ, पारदर्शक आणि आंतर-परिचालनक्षम प्लॅटफॉर्मद्वारे संमती देणे, व्यवस्थापित करणे, तिचे पुनरावलोकन करणे आणि ती मागे घेणे शक्य करते. डिजिटल परिसंस्थेत विश्वास आणि उत्तरदायित्व मजबूत करणे हा या आराखड्याचा उद्देश असून, संमती व्यवस्थापक हे डेटा प्रिन्सिपल्सना उत्तरदायी असतील.
पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया
भारतात स्थापन झालेल्या ज्या कंपन्यांकडे किमान ₹2 कोटींच्या निव्वळ संपत्तीसह पुरेशी तांत्रिक, परिचालन आणि आर्थिक क्षमता आहे, त्या कंपन्या संमती व्यवस्थापक म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. नोंदणीकृत संस्थांकडे सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि क्षमता असल्याची खात्री करणे, हा या अटींमागील हेतू आहे.
पात्र कंपन्या नव्याने सुरू केलेल्या पोर्टलद्वारे नोंदणीसाठी मंडळाकडे अर्ज करू शकतात. मंडळ लागू असलेल्या अटींनुसार अर्जांचे मूल्यांकन करेल आणि पात्र ठरणाऱ्या कंपन्यांची नोंदणी करेल. नोंदणीकृत संमती व्यवस्थापकांची यादी मंडळाच्या संकेतस्थळावर सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून दिली जाईल.
डेटा प्रिन्सिपल्सचे हक्क, डेटा विश्वस्तांची कर्तव्ये आणि मंडळाच्या चौकशी व दंड प्रक्रियेशी संबंधित इतर प्रमुख तरतुदी 13 मे 2027 पासून लागू होणार आहेत.
डीपीडीपी कायदा, 2023 आणि डीपीडीपी नियम, 2025 बाबत अधिक माहिती मंत्रालयाच्या https://www.meity.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीच्या शंकांसाठी secretary[at]dpbi[dot]gov[dot]in या ईमेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.
संमती व्यवस्थापक नोंदणी आराखड्याच्या अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा.
***
यश राणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai