Posted On:
14 NOV 2026 11:01AM by PIB Mumbai
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार येथे असलेल्या वेलस्पन वर्ल्डच्या अत्याधुनिक उत्पादन संकुलाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी सूत कताईपासून ते टॉवेल आणि बेडशीटच्या उत्पादनापर्यंतच्या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. एकाच परिसरात विकसित केलेली पूर्णपणे एकात्मिक मूल्य साखळी, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या मानकांशी सुसंगत असलेल्या उत्पादन सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कच्छसारख्या अतिशय कोरड्या प्रदेशात हरित उत्पादन, पाण्याचा पुनर्वापर आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाविषयीच्या वेलस्पनच्या बांधिलकीचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कौतुक केले. हिरवाईच्या सान्निध्यात विकसित झालेले हे औद्योगिक संकुल ‘ एका बागेतील उत्पादन केंद्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणते, असे ते म्हणाले. औद्योगिक प्रगती आणि पर्यावरण संरक्षण कशा प्रकारे परस्परांसोबत संतुलन साधू शकतात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी संकुलाच्या आवारात वृक्षारोपणही केले आणि पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि हरित भविष्य घडवण्याचा संदेश दिला. वृक्ष हा आपल्या पृथ्वीचा अमूल्य वारसा असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आधुनिक औद्योगिक विकासासोबतच पर्यावरणीय समतोल, शाश्वत उत्पादन आणि नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर तितकाच आवश्यक आहे, असे ते म्हणाले. वेलस्पनचे हे संकुल उद्योग, नवोपक्रम आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यातील प्रभावी समन्वयाचे एक प्रेरणादायी उदाहरण सादर करत आहे.
भारताचा वस्त्रोद्योग शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियांचा अवलंब करून विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करत असतानाच आपली जागतिक ओळख अधिक बळकट करत आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.
***
यश राणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com