Posted On:
13 NOV 2026 2:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात बंगळुरू इथे प्रशांती कुटिरमच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी कन्नड भाषेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. बंगळुरूमधली योगाची विलक्षण ऊर्जा अनुभवता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटक हे शतकानुशतके योगाचे केंद्र राहिले आहे आणि योगपरंपरा समृद्ध करणारे अनेक आचार्य व विद्वान या भूमीत जन्माला आले आहेत, असे त्यांनी सांगितले. कन्नड चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या योगदानाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. “कला क्षेत्रात योगदान देण्याबरोबरच योगाची सेवाही करणारे योगसाधक या भूमीत होऊन गेले आहेत,” असे मोदी म्हणाले.
कर्नाटकाच्या समृद्ध वारशाच्या पार्श्वभूमीवर प्रशांती कुटिरमचा 50 वर्षांचा प्रवास ही सेवा आणि समर्पणाची एक अभूतपूर्व गाथा आहे. प्रत्येक नागरिकाला या प्रवासाची माहिती असायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. एका छोट्या योग केंद्राचे रूपांतर एका मोठ्या चळवळीत कसे झाले, याचा उल्लेख करताना, “एका सामान्य योग केंद्राचे इतक्या मोठ्या चळवळीत झालेले रूपांतर हीच प्रेरणादायी गोष्ट आहे.” असे ते म्हणाले.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यानिमित्त परिसरात अनेक नव्या सुविधांचे उद्घाटन करण्यात आल्याची नोंद घेत पंतप्रधानांनी एस-व्यासा परिवाराच्या सुरू असलेल्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. “प्रशांती कुटिरमशी जोडलेल्या तुम्हा सर्वांचे आणि लाखो साधकांचे सुवर्णमहोत्सवानिमित्त मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.
यंदा प्रशांती कुटिरमच्या सुवर्णमहोत्सवाबरोबरच हो.वे. शेषाद्री यांची जन्मशताब्दीही साजरी होत आहे. त्यांना आदरपूर्वक अभिवादन करताना शेषाद्रीजी यांनी “चरित्रनिर्माणातून राष्ट्रनिर्माण” हे ध्येय पुढे नेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे पंतप्रधान म्हणाले. देशाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी समर्पित, सक्षम आणि शिस्तप्रिय नागरिकांची आवश्यकता असते हे शेषाद्री यांनी ओळखले होते, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
हो. वे. शेषाद्री यांचा साधेपणा, उत्तुंग व्यक्तिमत्व, अफाट अनुभव आणि इतरांना घडवण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी व त्यांना राष्ट्रसेवेसाठी सज्ज करण्यासाठी पडद्यामागे राहून काम करण्याची त्यांची असीम नम्रता यांचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी एका आईचे उदाहरण दिले जे शेषाद्रीजी अनेकदा सांगत असत. अशी आई, जी आपल्या बाळाच्या संगोपनासाठी आणि सेवेसाठी रात्रभर जागते. पंतप्रधान म्हणाले, जर आपण हीच भावना समाजासाठी विस्तारली, तर समाजाचे किती मोठे कल्याण होईल!
हो. वे. शेषाद्री यांनी एका आईच्या शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा केली, असे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांना शेषाद्रींचे प्रेम आणि मार्गदर्शन सतत मिळत राहिले, हे त्यांचे भाग्यच आहे. पंतप्रधान म्हणाले, त्यांच्यासोबत घालवलेल्या काळाच्या आठवणी आणि त्यांचे शब्द आजही माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत.
हो. वे. शेषाद्री यांची आणखी एक अविस्मरणीय शिकवण आठवताना पंतप्रधानांनी सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती समाजाला दोन्ही हातांनी देते, तेव्हा समाज त्याला लाखो हातांनी परत देतो. पंतप्रधानांनी म्हणाले की, त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनेकदा हे सत्य प्रत्यक्षात उतरताना पाहिले आहे. जनतेची सेवा करताना मला नेहमीच त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.
हो. वे. शेषाद्री यांच्या संपूर्ण कुटुंबात हीच निस्वार्थ सेवेची भावना दिसून येते, असे सांगत पंतप्रधानांनी डॉ. एच. आर. नागेंद्र आणि डॉ. आर. नागरत्ना यांचेही कौतुक केले, जे त्यांच्या समर्पित कार्याद्वारे शेषाद्रीजींचे ध्येय पुढे नेत आहेत. पंतप्रधान म्हणाले, मी त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाचे कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
भारत जेव्हा वसाहतवादी राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता आणि लाखो स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यासाठी लढा देत होते, त्या काळाची आठवण करून देत पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रभक्त संन्यासांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, ज्यांनी राष्ट्राची आध्यात्मिक चेतना जागृत केली. त्यांनी भारतातील तरुणांना योगाचा मार्ग दाखवला. स्वामी विवेकानंदंसारख्या ऋषितुल्य संन्यासांच्या प्रेरणेतून प्रशांती कुटीरम आणि एस-व्यास सारख्या संस्थांचा जन्म झाला, असे नमूद करत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. या संस्थांनी केवळ सामान्य जनतेला योगाशी जोडले असे नाही, तर आधुनिक वैज्ञानिक संशोधनही केले; तसेच जगभरात सेवा देणारे साधक, शिक्षक, डॉक्टर आणि तत्त्वज्ञ घडवले. त्यांनी योग, आयुर्वेद, निसर्गोपचार आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा मेळ घालून एक सर्वांगीण आरोग्य व्यवस्था निर्माण केली आहे. विशेषतः तणाव आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांवर त्यांनी केलेल्या संशोधनाचे पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, या दिशेने केलेले संशोधन कार्य संपूर्ण जगाच्या उपयोगाला आले आहे आणि या प्रयत्नांसाठी मी 'प्रशांती कुटीरम'चे अभिनंदन करतो.
गेल्या 12 वर्षांत भारताने आपली संस्कृती, ओळख आणि वैज्ञानिक वारसा पूर्ण आत्मविश्वासाने जगासमोर मांडला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. याचा परिणाम म्हणून आज ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिकेसह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, ज्यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. योग आता जगभरातील शाळा, संस्था आणि कामाच्या ठिकाणी पोहोचला आहे. सौदी अरेबियाने योगाला एक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली असून, त्यांच्या क्रीडा मंत्रालयाने भारताच्या आयुष मंत्रालयासोबत एक करारही केला आहे. मोदी म्हणाले, परदेशी नागरिक योगाचा प्रसार करत असल्याची उदाहरणे वारंवार समोर येत आहेत आणि भारत सरकार अशा व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरवही करत आहे.
योगाभ्यासाबाबत जगभरात वाढती जागरूकता निर्माण होत असल्यामुळे भारताविषयीचे कुतूहल वाढत आहे. तसेच भारतीय संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाबद्दलही आकर्षण निर्माण होत आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे जागतिक संवादाचे नवे मार्ग खुले होत असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी आयुर्वेदाचाही जगभरात होत असलेल्या विस्ताराचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जगातील विविध देशांमध्ये आयुर्वेदाच्या 150 हून अधिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. तसेच आयुर्वेदाच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने 28 देशांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.”
योग आणि आयुर्वेदाचे लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावेत, यासाठी सरकार योगाचा प्रसार करण्याबरोबरच विविध नियमांमध्येही सुधारणा करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात योगासनांना स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता देण्यात आली असून, ‘खेलो इंडिया’ आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. “हा बदल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे योगाशी संबंधित व्यक्तींना स्पर्धात्मक स्तरावर सहभागी होण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना, तसेच आयुर्वेद संशोधन आणि स्वामित्व हक्काला प्रोत्साहन देऊन सरकारने आयुर्वेदाचा सातत्याने प्रसार केला आहे. त्यामुळे आयुष क्षेत्राची अर्थव्यवस्था लाखो कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. औषधी वनस्पतींची निर्यात आणि पिढ्यानपिढ्या भारतीय घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हळदीची जागतिक मागणीही वाढली आहे. हळद निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेल्या संस्थात्मक पावलांची माहितीही पंतप्रधानांनी दिली. “हळदीचे उत्पादन, गुणवत्ता आणि निर्यात यांना नवी चालना देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय हळद मंडळाची ( नॅशनल टर्मरिक बोर्ड) स्थापना केली आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याबरोबरच भारताचे प्राचीन विज्ञान आणि आधुनिक संशोधनाचे लाभ संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. परदेशी वैद्यकीय पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘ई-आयुष व्हिसा’ सुविधा आणि जामनगर येथे स्थापन करण्यात आलेले ‘जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषधोपचार केंद्र’ (डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर) यांचाही त्यांनी उल्लेख केला. “या उपक्रमांमुळे पारंपरिक औषधोपचार क्षेत्रातील संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गेल्या 12 ते 13 वर्षांत सुमारे 50 कोटी भारतीय हलाखीच्या गरिबीतून बाहेर पडल्याचे जागतिक बँकेच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या यशातून प्रेरणा घेऊन 140 कोटी भारतीय, ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘प्रशांती कुटीरम’मुळे कुटुंबांना योगाच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या संस्थेने भविष्यातील नव्या उद्दिष्टांसाठी कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. “या युवा ऊर्जेचा लाभ प्रशांती कुटीरम् ला होईल आणि देशालाही होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
***
Radhika Aghor /Nikhilesh Chitre / Rajesh Shirbhate / Ashutosh Save / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai