नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2026
माहिती व प्रसारण मंत्रालयाने पात्र स्टार्टअप्सना, गोव्यातील 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत (IFFI) आयोजित होणाऱ्या 'वेव्ह्स बाजार'मधील 'वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियन'साठी आपली नोंदणी पूर्ण करून प्रदर्शन जागा (पॉड) आरक्षित करण्याकरिता अंतिम स्मरणपत्र जारी केले आहे. या नोंदणीची अंतिम मुदत उद्या, 13 नोव्हेंबर 2026 रोजी संपेल.
मंत्रालयाने आपल्या प्रमुख ‘स्टार्टअप ॲक्सिलरेटर’ उपक्रमाअंतर्गत, वेव्हएक्स (WaveX), चित्रपट, माध्यम आणि ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) यांसारख्या संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या DPIIT-नोंदणीकृत स्टार्टअप्सना या कार्यक्रमात त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
‘वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियन’ निवडक स्टार्टअप्सना वेव्ह्स बाजारमध्ये त्यांचे नवोपक्रम प्रदर्शित करण्याची संधी देईल. वेव्ह्स बाजार हे एक प्रमुख आदानप्रदान, (नेटवर्किंग) केंद्र असून, येथे जगभरातील माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील प्रमुख हितसंबंधितांची लक्षणीय गर्दी अपेक्षित आहे. स्टार्टअप्सना देश-विदेशातील चित्रपट निर्माते, निर्मिती संस्था, स्टुडिओ आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे सहयोग आणि व्यावसायिक भागीदारीसाठी मार्ग खुले होतील.
57वा इफ्फी सोहळा 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात आयोजित केला जाईल, तर वेव्ह्स बाजार स्टार्टअप प्रदर्शन (शोकेस) 20 ते 24 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित होईल.
नोंदणी आणि पात्रता
ही नोंदणी केवळ चित्रपट, माध्यम आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या DPIIT-नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठीच खुली आहे. वेव्हज एक्स द्वारे गठीत केलेल्या निवड समितीद्वारे अर्जांचे मूल्यांकन करून त्यातून निवडलेल्यांची यादी तयार केली जाईल.
इच्छुक स्टार्टअप्स 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत wavex.wavesbazaar.com या अधिकृत पोर्टलद्वारे त्यांची नोंदणी पूर्ण करू शकतात आणि प्रदर्शन पॉड्स बुक करू शकतात.
वेव्हएक्स विषयी माहिती
वेव्हएक्स हा माहिती व प्रसारण मंत्रालयाचा एक समर्पित ‘स्टार्टअप ॲक्सिलरेटर’ उपक्रम असून, त्याचा उद्देश भारतातील माध्यम आणि मनोरंजन तसेच एव्हीजीसी-एक्सआर इकोसिस्टम परिसंस्थेत नावीन्य, उद्योजकता आणि तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देणे असा आहे.
इफ्फी विषयी माहिती
दरवर्षी गोव्यात आयोजित केला जाणारा, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील चित्रपट निर्माते, चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी, तसेच सर्जनशील आदान-प्रदान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
* * *
नितीन फुल्लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai