Posted On:
11 NOV 2026 5:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गुजरात राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान प्रशांती कुटीरमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांनाही संबोधितही करतील. दुपारी सुमारे 12 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान तवरेकेरे ते आयआयएम बंगळूरु मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रो प्रवासी सुविधेचा प्रारंभ करतील तसेच स्वतः मेट्रोने प्रवास करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 1 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधानांच्या हस्ते बंगळूरु इथे 15 हजार 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण होईल. या सोहळ्यातही पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान मैसुरूला जाणार आहेत. तिथे ते दुपारी सुमारे 3 वाजून 30 मिनिटांनी ते भारत वन इथे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी सुमारे 4 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते कॉस्मॉस-मैसुरू प्लॅनेटेरियमचे (तारांगण) उद्घाटन होणार आहे. यावेळीही ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबाजी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. अंबाजी मंदिर हे 51 पवित्र शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.
पंतप्रधानांचे बंगळूरु इथले कार्यक्रम:
पंतप्रधान स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानाचे निवासी मुख्यालय परिसर असलेल्या प्रशांती कुटीरमच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी त्यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केले जाईल, तसेच केरळमधील तिरुवनंतपुरम इथल्या एस-व्यासाच्या (S-VYASA) नवीन उप संकुलाचे (Off-Campus) उद्घाटन होणार आहे.
‘विकसित भारत 2047 च्या दिशेने’ ही या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची संकल्पना आहे. 13 ते 23 नोव्हेंबर 2026 या दरम्यान हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यातून संस्थेच्या पाच दशकांच्या संस्थात्मक उभारणीचा आणि सेवेचा महत्त्वाचा टप्पा अधोरेखित होणार आहे. प्रशांती कुटीरमची स्थापना 1975 मध्ये झाली होती. या संस्थेची पायाभरणी भारतीय अध्यात्मिक ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. हे ठिकाण एस व्यासा या संस्थेचे मुख्यालय असून, 2002 मध्ये या संस्थेला अभिमत विद्यापीठ म्हणून दर्जा देण्यात आला होता. ही संस्था योगाभ्यासाच्या क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनासाठी समर्पित संस्था आहे.------------------------------------------------------ बंगळुरू येथे 1926 मध्ये जन्मलेले प्रख्यात विचारवंत, लेखक आणि संघटक होंगसंद्र व्यंकटरामय्या शेषाद्री जी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देखील हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. ते 1946 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले आणि 1978 ते 2000 या कालावधीत त्यांनी संघाचे सरकार्यवाह म्हणून कार्यभार सांभाळला. 'एस-व्यासा' (S-VYASA) या संस्थेच्या स्थापनेमागील दृष्ट्या व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा प्रामुख्याने समावेश होता, तसेच त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने 'प्रशांती कुटीरम'चा विकास घडवून आणण्यात आणि गेल्या काही दशकांत संस्थेचे ध्येय-उद्दिष्ट पुढे नेण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पंतप्रधान बंगळुरू येथील 15,600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ करतील. यामध्ये नागरी वाहतूक, वीज पारेषण, नवीकरणीय ऊर्जा, पेट्रोलियम पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि रेल्वे यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान सुमारे 3,470 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या काळेना अग्रहारा ते तावरेकेरे या 'बंगळुरू मेट्रो'च्या पिंक लाईनचे उद्घाटन करतील. हा नवीन मार्ग नागरी कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करेल, दैनंदिन प्रवास सोपा करेल, प्रवासाचा वेळ वाचवेल आणि बंगळुरूतील सार्वजनिक वाहतूक सुविधांना अधिक बळकट करेल.
तसेच, पंतप्रधान कोप्पळ-II आणि गदग-II येथील सुमारे 4,450 कोटी रुपये गुंतवणुकीतून विकसित केलेल्या 'नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या एकात्मतेसाठीची पारेषण योजना (टप्पा-2)' चे उद्घाटन करतील. ही पारेषण प्रणाली कर्नाटकातील कोप्पळ आणि गदग भागातून सुमारे 2 गिगावॉट (GW) क्षमतेची नवीकरणीय ऊर्जा वाहून नेऊन ती ग्रीडच्या माध्यमातून इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी सुलभता निर्माण करेल. यासोबतच ते बिदर येथील सौर ऊर्जा क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या पारेषण योजनेचेही उद्घाटन करतील, जी सुमारे 1,370 कोटी गुंतवणुकीतून विकसित केली गेली आहे. या प्रकल्पात 'बिदर पुलिंग स्टेशन'च्या स्थापनेचा समावेश असून, त्याद्वारे या भागातून 2.5 गिगावॉट (GW) सौर ऊर्जा वाहून नेणे शक्य होणार आहे.
पंतप्रधान 3,405 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 'दावणगेरे/चित्रदुर्ग आणि बेल्लारी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांच्या एकात्मतेसाठीच्या पारेषण योजनेची' पायाभरणी करतील. यासोबतच, ते दावणगेरे आणि बेल्लारी येथील अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या एकात्मिकरणासाठीच्या 1,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 'पारेषण प्रणाली बळकटीकरण प्रकल्पाचेही' भूमीपूजन करतील.
पंतप्रधान मंगळुरू येथे 850 कोटी रुपयांहून अधिक खर्चून उभारलेल्या देशातील सर्वात मोठ्या 'भूमिगत एलपीजी साठवणूक केव्हर्न'चे राष्ट्रार्पण करतील. 80,000 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असणारी ही सुविधा देशातील एलपीजी साठवणुकीच्या पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणावर बळकट करेल. या प्रकल्पात न्यू मंगळुरू बंदराला मुख्य टर्मिनलशी जोडणाऱ्या 9.4 किमी लांबीच्या एलपीजी पाईपलाईनचा समावेश असून, यामुळे एलपीजीची वाहतूक आणि साठवणूक अधिक प्रभावी व जलद गतीने होण्यास मदत होईल. तसेच, पंतप्रधान 'मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'च्या (MRPL) बंगळुरू येथील देवाणगोंथी मार्केटिंग टर्मिनलचेही राष्ट्रार्पण करतील. 330 कोटी रुपये गुंतवणुकीतून उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक सुविधा कर्नाटकातील पेट्रोलियम उत्पादनांची साठवणूक आणि वितरण यंत्रणा मजबूत करेल.---------------------------------- पंतप्रधान बेंगळुरू येथील हरळकुंटे येथे गेलच्या संपीडित जैववायू प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पात दररोज सुमारे 300 टन महानगरपालिका घनकचऱ्यावर प्रक्रिया करून 12.6 टन स्वच्छ संपीडित जैववायू (सीबीजी) तयार केला जाईल. या प्रकल्पामुळे शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळेल, पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि अधिक स्वच्छ व शाश्वत पर्यावरण निर्माण करण्यास हातभार लागेल.
पंतप्रधान अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या चार रेल्वे स्थानकांचे - चामराजनगर, चिक्कमगळुरू, सकलेशपूर आणि सुब्रह्मण्य रोड - उद्घाटन करतील. पुनर्विकसित स्थानकांवर प्रवाशांसाठी सुधारित सुविधा उपलब्ध असतील. ही स्थानके शहरांच्या केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांप्रमाणे काम करतील. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक उपक्रम आणि या प्रदेशातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
पंतप्रधान 284 किलोमीटर लांबीच्या गदग-होटगी दुहेरीकरण प्रकल्पाचा भाग असलेल्या 45 किलोमीटर लांबीच्या बागलकोट-वंडाल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे राष्ट्राला समर्पण करतील. या मार्गामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीत सुधारणा होईल, स्थानिक व्यापाराला चालना मिळेल आणि कुडगी येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी कोळशाचा पुरवठा सुलभ होईल.
पंतप्रधान 55 किलोमीटर लांबीच्या सकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड घाट रेल्वे विभागाच्या विद्युतीकरणाचेही राष्ट्राला समर्पण करतील. भारतातील सर्वात आव्हानात्मक रेल्वे भूप्रदेशांपैकी एका भागातून जाणारा हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे बेंगळुरू-मंगळुरू संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान बेंगळुरू-मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वेमुळे बेंगळुरू, किनारपट्टीवरील कर्नाटक आणि गोवा यांच्यात जलद आणि आधुनिक रेल्वे जोडणी उपलब्ध होईल. ही रेल्वे मडगाव येथे पोहोचण्यापूर्वी हासन, सकलेशपूर, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि कारवार या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडेल. यामुळे प्रवाशांना लाभ होईल आणि या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल.
मैसुरूत पंतप्रधानांचे कार्यक्रम
‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान भारत वन येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील. भारत वन हा जपानी मियावाकी पद्धतीचा वापर करून घनदाट आणि स्वयंपूर्ण स्थानिक वन विकसित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारा शहरी वनीकरण उपक्रम आहे. 17.63 एकर क्षेत्रात विस्तारलेल्या मैसुरू येथील या प्रकल्पाचे उद्दिष्ट 2 लाखांहून अधिक स्थानिक वृक्षांच्या लागवडीतून हरित सामुदायिक संपत्ती निर्माण करणे आहे.
या प्रकल्पात स्थानिक झुडपे, इमारती लाकडासाठी उपयुक्त वृक्ष, छत्राकार वृक्ष, फुलझाडे आणि फळझाडांच्या वाढीसाठी शेणखत, कंपोस्ट आणि जीवामृत यांसारख्या नैसर्गिक मृदा-संवर्धक सामग्रीचा वापर केला जात आहे. या बहुस्तरीय वनांमुळे जैवविविधता वाढण्यास, भूजल पुनर्भरण सुधारण्यास, धूळ आणि वायुप्रदूषण कमी करण्यास, स्थानिक तापमान नियंत्रित ठेवण्यास, मृदा धूप रोखण्यास आणि कार्बन साठवणुकीस मदत होईल.--------------------- पंतप्रधान कॉसमॉस-मैसुरू या तारांगणाचे उद्घाटन करतील. हे तारांगण देशातील तारांगण तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र शिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रगती दाखवते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे उभारलेले हे कॉसमॉस-मैसुरू हे भारतातील पहिले एलईडी डोम तारांगण आहे. खगोलशास्त्र शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून संकल्पित हे तारांगण, चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या मैसुरू विद्यापीठाच्या परिसरात आहे.
या अत्याधुनिक सुविधेत 15 मीटरचा कललेला घुमट आहे, जो सुमारे 6,150 पॅनेलपासून बनलेला असून त्यात 4.2 कोटी एलईडी बसवण्यात आले आहेत. पारंपारिक तारांगणांमध्ये प्रतिमा दाखवण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर केला जातो, परंतु येथे असलेल्या एलईडी पॅनेलवर रिअल-टाइममध्ये नियंत्रण मिळवता येते. यामुळे प्रेक्षकांना एक अत्यंत प्रभावी आणि तल्लीन करणारा दृश्य अनुभव मिळतो, तसेच खगोलशास्त्र शिक्षणासाठी नवनवीन संधी उपलब्ध होतात.
येथील स्काय थिएटरमध्ये खगोलशास्त्रावर आधारित व्यावसायिक कार्यक्रम दाखवले जातील. यासोबतच, मैसुरूचा इतिहास आणि खगोलशास्त्र यांचा परस्परसंबंध दर्शवणारा एक विशेष चित्रपटही येथे पाहता येईल. हे कार्यक्रम कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषांत उपलब्ध असतील. या केंद्रात प्रदर्शनासाठी दालने, खगोलशास्त्रीय मॉडेल्स आणि कलाकृतींचे संग्रहालय, व्याख्यान कक्ष, प्रशिक्षण केंद्र आणि बाहेरच्या प्रांगणात परस्परसंवादी प्रदर्शनेही असतील.
या केंद्रातील उपक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या विविध कार्यांना पूरक ठरतील; ज्यामध्ये भारतभर आणि अंतराळात असलेल्या मल्टी-वेव्हलेंथ अर्थात बहुतरंगलांबी दुर्बीण सुविधांचे संचालन, भविष्यातील खगोलशास्त्रीय सुविधांचा विकास आणि राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे.
***
Shailesh Patil / Tushar Pawar / Vaibhavi Joshi / Gajendra Deoda / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai