Posted On:
11 NOV 2026 10:38AM by PIB Mumbai
केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR - Council of Scientific and Industrial Research) वतीने 10 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे सिमेंट आणि बांधकाम क्षेत्राअंतर्गत कचऱ्यापासून संसाधन निर्मितीच्या उपाययोजना या विषयावर भारत नॉर्वे संवादाचे आयोजन केले होते. नॉर्वेची सिंटेफ (SINTEF) ही संशोधन संस्था आणि रिसर्च कौन्सिल ऑफ नॉर्वे यांच्यासोबत संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले गेले. शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि संसाधनांच्या पुनर्वापरासाठी सहकार्यात्मक दृष्टिकोनाचा शोध घेण्याच्या उद्देशाने या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या संवादाच्या निमित्ताने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील विविध संस्था, सिंटेफ, नियामक प्राधिकरणे तसेच सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधी एकत्र आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मे महिन्यात नॉर्वेला भेट दिली होती. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान भारत आणि नॉर्वेमधील संबंधांना हरित धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप देण्यात आले होते. या भागीदारीअंतर्गत चक्रीय अर्थव्यवस्था, स्वच्छ तंत्रज्ञान आणि संशोधन हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यासोबत मांडलेल्या दृष्टिकोनाला अनुसरून या संवादाची आखणी केली गेली होती. त्यामुळे हा संवाद कालसुसंगत ठरला. केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेचे (CSIR-CBRI - Central Building Research Institute) प्राध्यापक एस. के. सिंग यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतपर भाषण केले.
या उद्घाटन सत्राला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मुख्यालयातील आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवहार संचालनालयाचे (ISTAD - International S&T Affairs Directorate) प्रमुख डॉ. रामा स्वामी बन्सल, नवी दिल्लीतील रॉयल नॉर्वेजियन दूतावासातील डॉ. अरविन्न गाडगीळ, नॉर्वेच्या सिंटेफचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. कोरे हेलगे कार्स्टेनसेन आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील केंद्रीय इमारत संशोधन संस्थेचे संचालक प्राध्यापक आर. प्रदीप कुमार यांच्यासह इतर मान्यवरांनी संबोधित केले. या निमित्ताने झालेल्या चर्चांमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या संस्था, सिंटेफ आणि या उद्योग क्षेत्रातील भागीदारांच्या सहभागाच्या माध्यमातून संयुक्त तंत्रज्ञानाधारित प्रस्तावांच्या आधारे भारत आणि नॉर्वेमधील सहकार्याला अधिक भक्कम स्वरुप देण्यावर, तसेच संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षांचे व्यावहारिक तसेच व्यापक उपाययोजनांमध्ये रुपांतर करण्याच्या मुद्यांवर भर देण्यात आला.

प्राध्यापक आर. प्रदीप कुमार यांनी केलेल्या मांडणीमधून पारंपरिक रेषीय अर्थव्यवस्थेकडून (Linear Economy) चक्रीय अर्थव्यवस्थेकडे (Circular Economy) होणाऱ्या स्थित्यंतरावर आणि बांधकाम तसेच औद्योगिक कचऱ्याचे मौल्यवान संसाधनांमध्ये रुपांतर करण्याच्या गरजेवर भर दिला. बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणारा कचरा / राडारोडा, पोलाद निर्मितीतून उरणारी धातूमळी (Steel Slag), फ्लाय ॲश (Fly Ash), तांबडी माती (Red Mud) आणि इतर औद्योगिक अवशेषांच्या संभाव्य वापराबाबतही त्यांनी चर्चा केली. यासोबतच प्रक्रिया विषयक तंत्रज्ञान, मानकीकरण, आर्थिक सक्षमता आणि बाजारपेठेतील स्वीकारार्हतेशी संबंधित आव्हानांवरही त्यांनी आपली मते मांडली. पीओपी आणि घातक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट’ या विषयावरील तांत्रिक सत्र SINTEF चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. कारे हेल्गे कार्स्टेन्सन आणि CSIR-NEERI चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या सत्रात पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित पद्धतीने घातक कचऱ्यावर सिमेंट भट्टीमध्ये प्रक्रिया करण्याच्या शक्यतेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहणारे सेंद्रीय प्रदूषक, डीडीटी आणि पीसीबी दूषित पदार्थांचा समावेश होता.
CSIR-NEERI ने भारताच्या स्टॉकहोम कराराअंतर्गत असलेल्या बांधिलकीनुसार तयार केलेला राष्ट्रीय अंमलबजावणी आराखडा, 2025 चे बांधकाम व पाडकाम कचरा नियम, संबंधित नियामक तरतुदी आणि पूर्वीपासून साचलेल्या पीओपी प्रदूषकांच्या साठ्याची माहिती सादर केली. तर SINTEF ने विविध देशांतील अनुभवांच्या आधारे नियंत्रित उच्च तापमानाच्या परिस्थितीत सिमेंट भट्ट्यांमध्ये घातक सेंद्रीय प्रदूषकांचा नाश करण्याची क्षमता स्पष्ट केली. त्याचबरोबर पारंपरिक जीवाश्म इंधनांऐवजी कचऱ्यापासून तयार केलेल्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची शक्यताही अधोरेखित केली. या चर्चेत योग्य तांत्रिक कार्यपद्धती निश्चित करणे, नियंत्रित औद्योगिक चाचण्या घेणे, उत्सर्जनाचे निरीक्षण करणे आणि नियामक नियमांचे पालन करणे यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
CSIR-CRRI आणि CSIR-AMPRI यांच्या संशोधन उपक्रमांमधून फ्लाय ॲश, तांब्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा स्लॅग, रेड मड, प्लास्टिक कचरा, स्टील ग्रिट आणि इतर औद्योगिक उप-उत्पादनांचा रस्ते बांधकाम, जिओपॉलिमर काँक्रीट, विशेष प्रकारचे ॲग्रीगेट्स तसेच मूल्यवर्धित बांधकाम साहित्य तयार करण्यासाठी वापर करण्याच्या संधी सादर करण्यात आल्या. घातक कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासंदर्भातील आव्हाने व आवश्यक तंत्रज्ञान यावर CSIR-NEERI आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनीही चर्चा केली.
बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या पुनर्चक्रीकरणासाठी आयोजित स्वतंत्र सत्राचे नेतृत्व SINTEF चे डॉ. ख्रिश्चन जॉन एंगेल्सेन यांनी केले. या सत्रात पुनर्चक्रित ॲग्रीगेट्सचा वापर करून बांधकाम उत्पादने तयार करणे, फिरत्या पुनर्चक्रीकरण यंत्रणांचा वापर आणि कचऱ्यातील अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी प्रक्रिया तंत्रज्ञानात सुधारणा करणे यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यात आली. CSIR-CBRI चे प्रा. एस. के. सिंह यांनी ‘बांधकाम क्षेत्रात स्लॅग आणि इतर उत्पादनांचा वापर’ या विषयावर सादरीकरण केले. त्यामध्ये बांधकाम साहित्य निर्मितीतील या घटकांचे संभाव्य उपयोग आणि औद्योगिक कचऱ्याचा शाश्वत पद्धतीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या चर्चेत भविष्यातील सहकार्यासाठी काही प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले. यामध्ये भारत आणि नॉर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ते तीन संशोधन प्रस्ताव विकसित करणे, घातक कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी प्रायोगिक स्तरावरील प्रात्यक्षिक प्रकल्प राबवणे, डीडीटी आणि पीसीबी दूषित कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या विकासाला चालना देणे आणि उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील भागीदारी अधिक बळकट करणे यांचा समावेश आहे.
द्विपक्षीय संशोधन आणि तांत्रिक सहकार्य अधिक मजबूत करणे, बांधकाम क्षेत्रात पुनर्चक्रीकरण व संसाधनांच्या पुनर्वापरावर आधारित पद्धतींना प्रोत्साहन देणे तसेच सिमेंट आणि बांधकाम क्षेत्राला शाश्वत व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणाऱ्या व्यवस्थेकडे वेगाने नेणे, या सामायिक उद्दिष्टांवर भर देत या कार्यक्रमाचा समारोप झाला.



***
Shailesh Patil / Tushar Pawar / Vaibhav Joshi / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai