Posted On:
09 NOV 2026 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026
‘माय भारत-राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) यांच्या वतीने ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा : 100 आठवड्यांचा संकल्प अभियान’अंतर्गत देशभरातील 153 संस्थांमध्ये ‘दिवाळी स्नेहमिलन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 1,07,494 जणांनी सहभाग नोंदवला. अभियानांतर्गत आठव्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अभियानाच्या दुसऱ्या महिन्याची सांगता झाली. या निमित्ताने युवक, कुटुंबीय आणि समाजातील विविध घटक एकत्र आले. सामुदायिक स्नेहमेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक संकल्प आणि स्वेच्छेने केलेल्या सेवाकार्याच्या माध्यमातून व्यसनमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.

व्यसनमुक्तीचा संदेश शैक्षणिक संस्थांपुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांत आणि परिसरातील समुदायांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी आणि सण-उत्सव जबाबदारीने साजरे करण्यासाठी कुटुंबांनी तसेच समाजाने सामूहिक जबाबदारी स्वीकारावी, यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. उर्वरित संस्थांमधील उपक्रम सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतर आयोजित केले जाणार आहेत.
‘नशामुक्त दीपोत्सव’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवक, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि मुलांनी एकत्र येऊन, व्यसनरूपी अंधःकारावर प्रकाशाचा विजय म्हणून प्रतिकात्मकरीत्या दिवे प्रज्वलित केले. दीपोत्सव आणि स्नेहमिलन या दोन्ही उपक्रमांमध्ये मिळून 41,600 हून अधिक जण सहभागी झाले. सणाच्या आनंदातून समाजाचा सहभाग वाढवत व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.

सहभागी संस्थांमध्ये स्थानिक भाषांमधून पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा आणि नशामुक्तीपर गीते असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये 24,100 हून अधिक जणांनी सहभाग घेतला. पारंपरिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व या कार्यक्रमांतून पटवून देण्यात आले.
या स्नेहमिलन कार्यक्रमांमधील ‘व्यसनमुक्त दिवाळीचा संकल्प’ हा महत्त्वाचा उपक्रम ठरला. जवळपास 25,000 व्यक्ती आणि कुटुंबीयांनी व्यसनकारक पदार्थांपासून दूर राहून दिवाळी साजरी करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. सण-उत्सव साजरे करताना जबाबदार पद्धतींचा अवलंब करावा आणि युवकांना आरोग्यदायी पर्याय निवडण्यासाठी पाठबळ द्यावे, असे आवाहन या संकल्पातून करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘मी नव्हे, तर तू’ (‘नॉट मी, बट यू’) या ब्रीदवाक्याला अनुसरून स्वयंसेवकांनी सणाच्या उत्सवाबरोबरच समाजसेवेलाही प्राधान्य दिले. सेवा उपक्रमांतर्गत 16,700 हून अधिक स्वयंसेवकांनी वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालये आणि झोपडपट्टी परिसरांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी मातीचे दिवे आणि मिठाईचे वाटप केले. या उपक्रमातून समाजाप्रती करुणा, सर्वसमावेशकता आणि सेवाभाव ही मूल्ये अधोरेखित झाली.
युवा स्वयंसेवकांनी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करून या अभियानाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला.पथनाट्यांचे विशेष चित्रीकरण असलेल्या 1100 हून अधिक सोशल मीडिया पोस्ट आणि रील्स इन्स्टाग्रामवर #NashaMuktYuva या हॅशटॅगसह अपलोड करण्यात आल्या. या माध्यमातून व्यसनमुक्त दिवाळीचा संदेश व्यापक स्तरावर प्रसारित करण्यात आला.
निलीमा चितळे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com