नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीत सुरू होणार जलपर्यटनाचा आनंद देणारी पहिली यमुना क्रूझ सेवा

Posted On: 09 NOV 2026 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026

दिल्लीच्या पर्यटन क्षेत्रात एका नवीन आकर्षणाची भर पडणार असून यमुनेच्या पात्रात जलपर्यटनाचा आनंद देणारी रिव्हर क्रूझ सेवा सुरू होत आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे दिल्लीचे नायब राज्यपाल सरदार तरणजीत सिंग संधू आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्या (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) सोनिया विहार येथे या सेवेचे उद्घाटन करतील. नदीवर आधारित पर्यटनाला चालना देणे आणि राष्ट्रीय राजधानीत येणाऱ्या पर्यटकांना एक नवीन मनोरंजक अनुभव देणे हा सोनिया विहार ते जगतपूर या नदीच्या टप्प्यावर विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश आहे.

उद्घाटन सोहळ्याला बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री  शांतनू ठाकूर आणि रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री  हर्ष मल्होत्रा यांच्यासह दिल्ली सरकारचे मंत्री उपस्थित राहतील.

राष्ट्रीय जलमार्ग कायदा, 2016 अंतर्गत यमुना नदीला 'राष्ट्रीय जलमार्ग-110' म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिल्लीतील यमुना नदीच्या सोनिया विहार ते जगतपूर टप्प्यावर या जलपर्यटनाचा आनंद देणाऱ्या रिव्हर क्रूझ सेवेचा विकास हे राष्ट्रीय जलमार्गाच्या क्षमतेचा वापर आनंददायी नौकानयन आणि नदी-आधारित पर्यटनासाठी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभारंभापूर्वी, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे (IWAI) वरिष्ठ अधिकारी आणि दिल्ली सरकारच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात क्रूझ जहाजाच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम शाश्वत अंतर्देशीय जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहरी वाहतूक व्यवस्था व पर्यटन पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून जलमार्गांचा विकास करण्याच्या प्राधिकरणाच्याची  वचनबद्धता  दर्शवणारा आहे.

या उपक्रमामुळे दिल्लीतील रहिवाशांना आणि पर्यटकांना अनोखा  अनुभव मिळण्याची अपेक्षा असून यमुना नदीविषयी जनतेची आस्था वाढण्यास मदत होईल. विजेवर चालणाऱ्या  क्रूझ जहाजांचा वापर स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी अंतर्देशीय जलमार्गांच्या क्षमतेचे दर्शन घडवेल. तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) एक नवीन मनोरंजक आकर्षणाची भर घालेल.

 

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2334458) अभ्यागत कक्ष : 10