Posted On:
05 NOV 2026 7:35PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणातल्या अंबाला इथे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
10 मे 1857 रोजी याच भूमीवर क्रांतिकारक वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा रणशिंग फुंकले होते. इथूनच या क्रांतीचा वणवा संपूर्ण देशभर पसरला आणि त्याने जगाला आश्चर्यचकित केले, असे यावेळी बोलताना अमित शाह यांनी सांगितले. ब्रिटिशांच्या प्रभावाखाली असलेल्या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याला केवळ बंड असे संबोधले. ब्रिटिशांसाठी ते बंड असू शकेल, मात्र वीरसावरकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतमातेच्या सुपुत्रांसाठी 1857 ची क्रांती हेबंड नव्हते, तर स्वातंत्र्ययुद्ध होते. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि गंगासागरापासून सोमनाथपर्यंत पसरलेल्या या विशाल देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत 1857 च्या क्रांतीनेच प्रज्वलित केली, असे शाह म्हणाले.
1857 ते 1947 या 90 वर्षांच्या महान संघर्षात असंख्य हुतात्म्यांनीआपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यानंतरच आजचा भारत आणि भारतमातेचे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे अमित शाह यांनी सांगितले. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पायावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न आपण पाहू शकतो. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या बळावर आणि 80 वर्षे लोकशाही संस्थांना अधिक बळकट केल्यामुळेच आज आपण संपूर्ण जगासमोर सन्मानाने उभे आहोत. 1857च्या क्रांतीतील नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बेगम हजरत महल आणि अन्य अनेक क्रांतिकारकांनी पराक्रम गाजवला आणि सर्वोच्च बलिदान दिले, असे शाह म्हणाले.
स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांचा गौरव केल्याशिवाय कोणत्याही देशाला आपल्या स्वातंत्र्याचे खरे महत्त्व समजू शकत नाही. इतिहासातील रक्तरंजित पानांना सुवर्णाक्षरांनी पुन्हा लिहिणारा देशचप्रगती करू शकतो. अंबाला येथे आज उभारण्यात आलेले हे हुतात्मा स्मारक भावी पिढ्यांतील तरुण आणि किशोरवयीन मुलांसाठी देशभक्तीची अमर्याद प्रेरणा ठरेल, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अमित शाह म्हणाले की, आज 1,260 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचेही उद्घाटन करण्यात आले. या महामार्गामुळे हरियाणातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने हरियाणात मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. प्रत्येक घरात गॅस सिलिंडर पोहोचवल्यामुळे हरियाणा हे देशातील पहिले धूरमुक्त राज्य बनले आहे. किमान आधारभूत किमतीने 24 पिकांची खरेदी करणारे हरियाणा हे भारतातील एकमेव राज्य आहे.
***
Radhika Aghor / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai