वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्य बळकट करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांचा पोलंड दौरा


पोलंडमध्ये जितिन प्रसाद यांच्या उच्चस्तरीय बैठका ; कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा

भारत-पोलंड व्यावसायिक भागीदारी अधिक दृढ करण्याचे आवाहन ; भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारांतर्गत उपलब्ध संधींवर टाकला प्रकाश

Posted On: 04 NOV 2026 10:20AM by PIB Mumbai

वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, जितिन प्रसाद यांनी 2-3 नोव्हेंबर 2026 रोजी पोलंडचा दौरा केला. त्यांच्यासोबत 12 भारतीय कंपन्यांचे एक व्यावसायिक शिष्टमंडळही होते. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी गेल्या महिन्यात केलेल्या भारत भेटीनंतर हा दौरा झाला असून, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांत वाढती गती दिसून येत आहे. 2026 मध्ये सुरू असलेले उच्चस्तरीय राजकीय संवाद, भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करत असल्याचेही दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 मधील ऐतिहासिक पोलंड भेटीदरम्यान ही भागीदारी स्थापित करण्यात आली होती.

या दौऱ्यामध्ये, जितिन प्रसाद यांनी पोलंडचे उपपंतप्रधान आणि डिजिटल व्यवहार मंत्री, क्रिस्तोफ गावकोव्स्की यांची भेट घेतली. या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि सायबर सुरक्षा यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य विस्तारण्यावर भर देण्यात आला.

पोलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील राज्य सचिव, इग्नासी निमचिस्की यांच्यासोबतच्या बैठकीत, प्रसाद यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या संधींवर सविस्तर चर्चा केली. हा करार आगामी काही महिन्यांत लागू होणार आहे. प्रसाद यांनी कृषी-तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अधिक सहकार्याच्या शक्यतेवर भर दिला, तसेच लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचे आवाहन केले.

प्रसाद यांनी पोलंडचे आर्थिक विकास आणि तंत्रज्ञान उपमंत्री, मिशाल बारानोव्स्की यांचीही भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी महत्त्वपूर्ण खनिजे, सेमीकंडक्टर आणि स्टार्टअप भागीदारीच्या क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या मार्गांवर चर्चा केली. राज्यमंत्र्यांनी मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उपलब्ध असलेल्या संधींवर प्रकाश टाकला आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे सह-विकास  व सह-उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले. 3 नोव्हेंबर रोजी, वॉर्सा येथील पोलिश नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स  मध्ये आयोजित भारत-पोलंड व्यापार मंचात जितिन प्रसाद यांनी उद्घाटनपर भाषण केले. यावेळी उपस्थित व्यावसायिक प्रतिनिधींना संबोधित करताना, त्यांनी भारतीय आणि पोलिश कंपन्यांना आवाहन केले की, नवीन व्यावसायिक संधी, अधिक मजबूत भागीदारी आणि वर्धित आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीची पूर्ण क्षमता विकसित करावी. त्यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या संधींवरही प्रकाश टाकला. तसेच, दोन्ही देशांतील उद्योगांना या कराराचा लाभ घेऊन बाजारपेठेतील प्रवेश विस्तारण्याचे, व्यापार व गुंतवणुकीचे संबंध दृढ करण्याचे आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याचे आवाहन केले.

या दौऱ्यादरम्यान, मंत्र्यांनी पोलंडमधील भारतीय व्यावसायिक समुदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. याव्यतिरिक्त, त्यांनी संभाव्य पोलिश गुंतवणूकदारांशी चर्चा करून भारतात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या संधींवर विचारविनिमय केला.

आपल्या उद्योगविषयक भेटीगाठींच्या मालिकेत, प्रसाद यांनी पोलंडमधील ट्रान्झिशन टेक्नॉलॉजीज - आयटी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनी आणि संरक्षण क्षेत्रातील कंपनी डब्ल्यूबी इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांना भेट दिली; या दोन्ही कंपन्यांचे भारतात व्यावसायिक हितसंबंध आहेत.

या भेटीमुळे पोलंडसोबतची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. लवचिक जागतिक पुरवठा साखळी उभारण्यासाठी पोलंड सरकार आणि तिथल्या व्यावसायिक संस्थांसोबत मिळून काम करण्यास भारत कटिबद्ध आहे. या दौऱ्यामुळे भारत-युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक होण्यासही मदत झाली आहे.

***

NitinFulluke / RajeshShirbhate / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332392) अभ्यागत कक्ष : 7