आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष मंत्रालयाकडून 'राष्ट्रीय एकता दिना'निमित्त 'एकतेसाठी योग' उपक्रमाला प्रोत्साहन


दैनंदिन योगसाधना, सामूहिक आरोग्य आणि सामाजिक सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'योग 365' उपक्रम

Posted On: 31 OCT 2026 12:42PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीचे औचित्य साधून, आयुष मंत्रालय ‘एकतेसाठी योग’ या संदेशाचा प्रचार करत आहे. याद्वारे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सामूहिक आरोग्य संवर्धन करण्यात योगाची भूमिका अधोरेखित केली जात आहे.

'योग 365' या उपक्रमाशी जोडलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे; ज्यामुळे आरोग्याविषयीची सामूहिक जबाबदारी आणि एकमेकांमधील एकतेची भावना अधिक बळकट होईल. आयुष मंत्रालय देशभरातील आपल्या योग आणि निसर्गोपचार संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेत असून, 'एकतेसाठी योग' हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांचा व्यापक सहभाग वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि दृढनिश्चयाने देश एकसंध बांधला, असे नमूद केले. 'राष्ट्रीय एकता दिना'च्या निमित्ताने आपण सर्वांनी संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांचा एकतेचा संदेश पुढे नेला पाहिजे, असे ते म्हणाले. योग हा वय, क्षेत्र आणि पार्श्वभूमी यांसारख्या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतो, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यही समृद्ध करतो. 'योग फॉर युनिटी' (एकतेसाठी योग) आणि 'योग 365' या उपक्रमांद्वारे आम्ही प्रत्येक नागरिकाला योगाचा दैनंदिन जीवनशैलीत स्वीकार करण्याचे आणि अधिक निरोगी व सुदृढ भारत घडवण्यात आपले योगदान देण्याचे आवाहन करत असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. 

योग हा शारीरिक व मानसिक स्वास्थ सुधारण्यासोबतच व्यक्ती आणि समाजात आपुलकीची भावना निर्माण करण्याचा अत्यंत सोपा आणि सुलभ मार्ग आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यावेळी म्हणाले. 'योग 365' हा उपक्रम लोकांना वर्षभर नियमित योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित करतो, ज्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी हा आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनतो. 'योग फॉर युनिटी'च्या माध्यमातून हाच विचार अधिक दृढ करणे आणि आरोग्य, सौहार्द व सामूहिक कल्याणाची संस्कृती रुजवण्यासाठी समाजाचा जास्तीत जास्त सहभाग मिळवणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. 

योग हा केवळ एखाद्या विशिष्ट दिवसापुरता किंवा प्रसंगापुरता मर्यादित नसून, तो वैयक्तिक आरोग्य समृद्ध करणारी आणि सामाजिक एकात्मता अधिक बळकट करणारी एक शाश्वत दैनंदिन सवय म्हणून स्वीकारला जाऊ शकतो, या गोष्टीवर हा उपक्रम भर देतो.

योगाचे सामायिक वर्ग आणि नागरिकांचा सार्वजनिक सहभाग यांमुळे 'राष्ट्रीय एकतेची भावना' ही 'प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी' आणि 'निरोगी जीवनशैली'शी जोडण्यास मदत होईल.

या अभियानाचा एक भाग म्हणून, मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सर्व योग आणि निसर्गोपचार संस्थांना नियमित योगाभ्यास, लोकसहभाग आणि योगाच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. तसेच, हे अभियान 'योग 365' या संकल्पनेला अधोरेखित करेल, जेणेकरून केवळ विशेष प्रसंगांपुरते मर्यादित न राहता वर्षभर योगाशी जनतेचा सातत्यपूर्ण संवाद टिकून राहील आणि त्याचा विस्तार अधिक व्यापक होईल.

'योग फॉर युनिटी'च्या (एकतेसाठी योग) माध्यमातून, आयुष मंत्रालय निरोगी जीवनशैली आणि सामूहिक कल्याणासाठी योग ही एक सहज-सुलभ पद्धत म्हणून स्वीकारली जावी यासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे; आणि सोबतच सरदार वल्लभभाई पटेल यांनी मांडलेला राष्ट्रीय एकात्मता व एकतेचा विचारही पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे.

***

शिल्पा पोफळे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330855) अभ्यागत कक्ष : 11