Posted On:
30 OCT 2026 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026
भारतीय नौदलाच्या आयएनएस तीर, आयएनएस सुजाता आणि भारतीय तटरक्षक दलाचे जहाज सारथी यांचा समावेश असलेली पहिली प्रशिक्षण तुकडी आपली बंदर भेट यशस्वीरीत्या आटोपून श्रीलंकेतील कोलंबो येथून 29 ऑक्टोबर 2026 रोजी रवाना झाली. या भेटीदरम्यान भारतीय नौदल आणि श्रीलंकेच्या नौदलात अनेक द्विपक्षीय उपक्रम पार पडले आणि दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य तसेच सागरी वाहतूक क्षेत्रातील भागीदारी नव्याने दृढ झाली.
या बंदर भेटीदरम्यान पहिल्या प्रशिक्षण तुकडीचे (1TS) वरिष्ठ अधिकारी आणि जहाजांचे कमांडिंग ऑफिसर्स यांनी श्रीलंकेच्या नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल एरियाचे कमांडर यांची भेट घेतली. या संवादामुळे दोन्ही नौदलांमधील घनिष्ठ द्विपक्षीय संबंध आणि सागरी सहकार्य मजबूत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार झाला.
व्यवसायिक उपक्रमांचा भाग म्हणून 1TS च्या सागरी प्रशिक्षणार्थींनी ट्रिंकोमाली येथील नौदल आणि सागरी अकादमीला भेट दिली आणि तेथील श्रीलंकेच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. परस्पर सहकार्याच्या उपक्रमांतर्गत, नौदल आणि सागरी अकादमीमधील एसएलएन (SLN) कॅडेट्सनी 1TS जहाजांना भेट दिली आणि स्क्वॉड्रनच्या प्रशिक्षण सुविधा आणि उपक्रमांविषयी माहिती जाणून घेतली. या संवादात्मक कार्यक्रमामुळे अनुभवांची देवाणघेवाण होऊ शकली आणि दोन्ही नौदलातील प्रशिक्षणार्थींमध्ये व्यावसायिक बंध वृद्धिंगत झाले
आपल्या जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांनी पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत किनारा स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. अभ्यागतांसाठी देखील जहाजांवर प्रवेश खुला असल्याने स्थानिक समुदाय आणि भारतीय समुदायातील सदस्यांना भेट देता आली आणि नौदल कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आल्याने भारतीय नौदलाच्या प्रशिक्षण आणि कार्यान्वयन कार्याबद्दल माहिती जाणून घेता आली.
कोलंबो मधून रवाना होताना 1TS जहाजांनी श्रीलंकेच्या नौदलाच्या SLNS नंदिमित्रा या जहाजासोबत पॅसेज एक्सरसाइज (PASSEX) म्हणजेच सागरी सरावात सहभाग घेतला. या सरावामुळे दोन्ही नौदलांमधील सागरी हालचालींमध्ये समन्वय साधणे सोपे झाले, तसेच दोन्ही सागरी दलांमधील कार्यात्मक समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता अधिक दृढ झाली.
या भेटीमुळे भारताच्या महासागर अर्थात विविध क्षेत्रांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती या या संकल्पनेच्या अनुषंगाने भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी भागीदारी अधिक दृढ होण्यासह प्रादेशिक सागरी सहकार्य आणि क्षमता उभारणीसाठीच्या सामायिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला.
_20261030113003_d73b60.jpeg)
_20261030113023_7cfddb.jpeg)
_20261030113100_edc2df.jpeg)
आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai