Posted On:
29 OCT 2026 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2026
भारतात औद्योगिक क्षेत्रात परिवर्तन घडवण्यास चालना द्यायची असल्यास, त्यासाठी उत्तम गुणवत्ता, उत्पादनांची प्रचंड व्याप्ती, जागतिक बाजारपेठेत प्रवेश आणि सर्वसमावेशकता असायला हवी, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. त्यासाठी, सरकार, खाजगी क्षेत्रे आणि शैक्षणिक क्षेत्रांमधून नवोन्मेष येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. भारताच्या औद्योगिक परिवर्तनासाठीच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. आयएसआयडी आणि आयडीआरए यांनी ही परिषद आयोजित केली आहे. भारताने, जगाच्या व्यासपीठावर, उत्पादक देश म्हणून आपली ओळख तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही गोयल यांनी सांगितले.
भारताच्या औद्योगिक क्षेत्राचे चित्र बदलायचे असल्यास, त्याला गती देणाऱ्या चार गोष्टी आहेत, ज्यात, गुणवत्ता, जागतिक बाजारपेठेत प्रवेश, उत्पादनांची प्रचंड व्याप्ती आणि सर्वसमावेशकता, असे चार महत्वाचे स्तंभ त्यांनी मांडले. त्यातही, सर्वाधिक प्राधान्य गुणवत्ता किंवा दर्जाला द्यायला हवे, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट” मंत्रावर त्यांनी भर दिला. मुक्त व्यापार करारामुळे, आज जगभरातील बाजारपेठा आपल्यासाठी खुल्या होत असतांना, भारताने, त्या बाजारपेठेत वाटा मिळवण्यासाठी स्पर्धा करायला हवी, जागतिक पटलावर आपले अस्तित्व ठळक करायला हवे आणि आपल्यासाठी लाभदायक अशा बाजारपेठेत प्रवेश मिळाल्याचा लाभ घ्यायला हवा असेही गोयल यावेळी म्हणाले.
भारताच्या व्यापारी धोरणांबद्दल बोलतांना, गोयल यांनी सांगितले की, भारताचे व्यापारी करार केवळ व्यापारी शुल्क कमी करणे, मूळ उत्पादनाविषयीचे नियमन आखणे किंवा बाजारपेठेत प्रवेश निश्चित करणे, एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. तर, ही एक सर्वसमावेशक भागीदारी असून, त्यात, भारताची स्पर्धात्मक ताकद, निर्यातीसाठीच्या संधी लक्षात घेतल्या आहेत. संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यात आले आहे आणि उच्च- तंत्रज्ञानाची उत्पादने, ग्राफीक्स प्रोसेसिंग युनिट्स (जीपीयु) मेमरी तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि भारताच्या विकासासाठी आवश्यक इतर गोष्टींसाठी, या करारामुळे प्रवेश मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत- अमेरिका यांच्यातील कराराच्या वाटाघाटीविषयी त्यांनी सांगितले, की जेव्हा त्याची सगळी सविस्तर माहिती लोकांसमोर येईल, त्यावेळी, देशातल्या लोकांना लक्षात येईल, की शेतकऱ्यांसाठी आणि इतर संबंधितांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या क्षेत्रासाठी कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही. मात्र त्याचवेळी भारताला एक भक्कम तुलनात्मक लाभही या करारातून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाच्या शेवटी, भारताच्या औद्योगिक भविष्याबाबत तीन दिवस सखोल विचारमंथन आयोजित केल्याबद्दल गोयल यांनी आयएसआयडीची प्रशंसा केली. विकसित भारत 2047चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या या परिषदेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai