संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

13 व्या एडीएमएम-प्लस च्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांची सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा

Posted On: 28 OCT 2026 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026

 

फिलिपिन्सच्या सेबू येथे आयोजित 13 व्या 'आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या एडीएमएम-प्लस'च्या पार्श्वभूमीवर, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिंगापूरचे संरक्षण मंत्री चॅन चुन सिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध आणि भक्कम धोरणात्मक भागीदारीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली, तसेच या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण उपक्रमांचा आढावा घेतला आणि भविष्यातील सहकार्याची क्षेत्रे निश्चित केली.

दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंधांमधील वृद्धीबद्दल समाधान व्यक्त केले. चर्चेदरम्यान, लष्करी, नौदल आणि हवाई दलांमधील संयुक्त लष्करी सरावांची व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात आला, ज्याचा उद्देश कार्यात्मक समन्वय आणि परस्परांतील समज वाढवणे हा आहे.

आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेला आणि मुक्त, खुल्या व सर्वसमावेशक हिंद-प्रशांत  क्षेत्राला भारताचा पाठिंबा असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यांनी भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये सिंगापूर महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले.

संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, राजनाथ सिंह यांनी सिंगापूरचे संरक्षण मंत्री चॅन चुन सिंग यांना फेब्रुवारी महिन्यात बेंगळुरू येथे आयोजित होणाऱ्या 'एरो इंडिया 2027' मध्ये सहभागी होण्याचे औपचारिक  निमंत्रण दिले. यासोबतच, संरक्षण मंत्र्यांनी सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांचे एडीएमएम-प्लसच्या 2027 सालासाठी अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

* * *

निलिमा चितळे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329820) अभ्यागत कक्ष : 10