Posted On:
28 OCT 2026 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
देशभरातील शाळांमधील वर्गखोल्यांपर्यंत खेळांची विशुद्ध मूल्ये पोहोचवण्यासाठी ‘प्रत्येक वर्गखोलीत खेळांची मूल्ये’ (Sports Values in Every Classroom Toolkit) या टूल किटच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबववण्यासाठी आज म्हणजेच बुधवार 28 ऑक्टोबर 2026 रोजी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि युनेस्को यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी क्रीडा आणि शिक्षण यांचे एकात्मीकरण करण्याची गरज अधोरेखित केली. “खेलो भारत धोरण 2025” मध्येही या बाबीवर भर देण्यात आला आहे.

भारताच्या विशुद्ध क्रीडा परिषदेच्या निमित्ताने, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यसेवन विरोधी यंत्रणा (अॅंटी डोपिंग एजन्सी)-‘ नाडा’ च्या कार्यालयात हा सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश, शिक्षण, क्रीडा आणि वर्गखोलीतील दैनंदिन उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाप्रती आदर, सचोटी आणि निष्पक्षता यांसारखी मूल्ये रुजवणे हा आहे.
या टूल किटमधील व्हिडिओ मॉड्यूल्स 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अधिक सक्षम आणि न्याय्य क्रीडा व्यवस्था उभी करणे, हेही या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
“क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता आणि सचोटी या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत. क्रीडा क्षेत्रातील यशासाठी प्रतिभा, शिस्त आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत; मात्र तेवढेच महत्त्व, सचोटी, निष्पक्षता आणि विश्वासार्हता यांनाही आहे,” असे केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यावेळी सांगितले. भारताच्या वाढत्या क्रीडाविषयक महत्त्वाकांक्षांच्या पार्श्वभूमीवर विशुद्ध क्रीडाविषयक जनजागृती अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा या दोन्हींमध्ये भारताने अनुक्रमे चौथे स्थान मिळविल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावरून भारतीय क्रीडा क्षेत्राची वाढती ताकद आणि महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित होते. मात्र त्यासोबतच, उत्तेजक द्रव्यांचे सेवन (डोपिंग) ही गंभीर चिंतेची बाब कायम असून, यासाठी शिक्षण, प्रतिबंध, चाचण्या आणि नियमांची अंमलबजावणी या क्षेत्रांत सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सामंजस्य करारामुळे शिक्षण आणि क्रीडा यांच्यात दीर्घकाळापासून असलेली तफावत दूर करण्यास मदत होईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे विद्यार्थी नेहमीच क्रीडा क्षेत्रात सहभागी होत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, तळागाळातील स्तरावर क्रीडाविषयक संधी अधिक बळकट करण्याची आणि युवा खेळाडूंसाठी प्रगतीचे अधिक चांगले मार्ग निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षण आणि क्रीडा यांच्यातील दरी भरून काढण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही दरी दीर्घकाळापासून कायम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून क्रीडामूल्ये प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक अनुभवाचा अविभाज्य भाग बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

मुलांना आता विशुध्द क्रीडा स्पर्धा (Clean Sport) आणि त्याच्याशी निगडित मूल्यांची माहिती दिली जात आहे, याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे ते म्हणाले.
या टूलकिटच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवली जाणारी मूल्ये केवळ वर्गखोल्यांपुरती मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत. शिक्षणात क्रीडामूल्यांचा समावेश केल्याने जबाबदार नागरिक घडवण्यासोबतच लहान वयापासूनच निष्पक्षता आणि प्रामाणिकपणाची संस्कृती रुजवण्यास मदत होईल, असे जोशी यांनी नमूद केले.
डॉ. टिम कर्टिस यांनी या सामंजस्य कराराचे वर्णन भारतासोबतच्या युनेस्कोच्या भागीदारीतील एका नव्या पर्वाची सुरुवात असे केले. हा उपक्रम लाखो तरुणांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवतो आणि इतर देशांनाही अनुकरण करता येईल असा आदर्श निर्माण करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
वर्गातील प्रत्येक मुलाला नियमांचे पालन करून खेळण्याचा अर्थ काय, हे शिकता आले पाहिजे. या टूलकिटच्या माध्यमातून आम्ही शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात आदर, सचोटी आणि निष्पक्ष या तीन मूलभूत मूल्यांचा समावेश करत आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या डॉ. कर्टिस यांनी सांगितले.

या टूलकिटमध्ये विविध कल्पना आणि प्रत्यक्ष वापरता येतील अशी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत; मात्र ही मूल्ये मुलांच्या मनात रुजवण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करतात, असे ते म्हणाले.
शाळेच्या मैदानावर काय घडते आणि दैनंदिन परिस्थितीत मुले एकमेकांशी कशी वागतात, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कोणीही पाहत नसतानाही मुले प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून खेळतात का, हीच या मूल्यांची खरी कसोटी आहे. लहान वयापासूनच मुलांमध्ये अशा प्रकारची सचोटी रुजवणे, हेच आपले उद्दिष्ट आहे, असे डॉ. कार्टिस यांनी नमूद केले.
* * *
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai