नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 2 नोव्हेंबर 2026 रोजी 'भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026चे करणार उद्घाटन


या शिखर परिषदेत 130 हून अधिक देशांचा सहभाग अपेक्षित; जागतिक नेते, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नवोन्मेषक यानिमित्ताने एकत्र येणार

ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, युरोपियन महासंघ, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि ब्रिटन हे देश 'भागीदार देश' म्हणून सहभागी होणार

Posted On: 28 OCT 2026 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026

 

आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या शिखर परिषदेत सहभागी होत याद्वारे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि उत्पादन क्षमता प्रदर्शित करणार

राष्ट्रीय आणि जागतिक प्रदर्शक नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान सादर करणार; 'नॅशनल हॅकेथॉन', नवीकरणीय ऊर्जेवर आधारित प्रश्नमंजुषा आणि 'आरई-जेन पॅव्हेलियन' (REGen Pavilion) ही  या परिषदेतील मुख्य आकर्षणे असतील.

केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे 2–5 नोव्हेंबर 2026 दरम्यान नवी दिल्ली येथील 'भारत मंडपम' येथे 'भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 नोव्हेंबर  2026 रोजी या शिखर परिषदेचे उद्घाटन करतील.

केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष सारंगी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "भारताचे स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने  संक्रमण एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. ''भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026 हे जागतिक भांडवल, तंत्रज्ञान आणि औद्योगिक कौशल्य यांना भारतातील स्वच्छ ऊर्जेच्या वाढत्या संधींशी जोडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल, याद्वारे गुंतवणुकीच्या संभाव्य संधींचे रूपांतर प्रकल्प, भागीदारी आणि प्रगतीमध्ये होईल."

'गुंतवणूक करा. नाविन्यपूर्ण संशोधन  करा, प्रेरित करा' ही संकल्पना असलेल्या या चार दिवसीय कार्यक्रमात 130 हून अधिक देशांतील सहभागी  एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये मंत्री, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरिण, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, उत्पादक, नवोन्मेषक, संशोधक आणि बहुपक्षीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही शिखर परिषद 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी' सभेचे 9वे सत्र आणि 'हरित हायड्रोजन' वरील  चौथी  आंतरराष्ट्रीय परिषद यांसोबत आयोजित केली जाईल. हे तिन्ही कार्यक्रम नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय सहकार्य, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देतील.

ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि युनायटेड किंगडम हे भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहेत. नवीकरणीय ऊर्जा वित्तपुरवठा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवण, स्वच्छ ऊर्जा उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी इतर अनेक देशांची प्रतिनिधीमंडळेदेखील या शिखर परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

तेरा भारतीय राज्ये भागीदार राज्ये म्हणून सहभागी होतील आणि त्यांची नवीकरणीय ऊर्जेची क्षमता, गुंतवणुकीच्या संधी, धोरणात्मक उपक्रम आणि उत्पादन क्षमता सादर करतील. इतर सहभागी राज्येदेखील नवीकरणीय ऊर्जा विकास आणि गुंतवणुकीच्या संधींवर भाष्य करतील.

या चार दिवसीय परिषदेत वित्तपुरवठा, धोरण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित करणारी उच्चस्तरीय सर्वसाधारण सत्रे, मंत्रीस्तरीय चर्चा, सीईओ गोलमेज बैठका आणि देश व राज्य स्तरावरील सत्रे यांचा समावेश असेल. चर्चेमध्ये स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा साठवणूक आणि मनुष्यबळ विकास या विषय प्रामुख्याने असतील, ज्यात तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान, विस्तारक्षम उपाययोजना आणि जागतिक ऊर्जा संक्रमणामध्ये महिलांचा वाढीव सहभाग व नेतृत्व यावर विशेष भर असेल.

याचदरम्यान आयोजित 9 वी आयएसए सभा, भारताची यशस्वी धोरणे, तंत्रज्ञान आणि अंमलबजावणीची प्रारूपे जागतिक दक्षिणेकडील देशांपर्यंत पोहोचवून सौर ऊर्जा क्षेत्रात भारताचे जागतिक नेतृत्व अधिक बळकट करेल.

यासोबत होणाऱ्या प्रदर्शनात भारत आणि परदेशातील 400 हून अधिक आघाडीचे उत्पादक, डेव्हलपर, तंत्रज्ञान पुरवठादार, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था सहभागी होतील. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उपाययोजनांचे सादरीकरण या प्रदर्शनात केले जाईल, तसेच व्यावसायिक नेटवर्किंग, गुंतवणुकीला चालना आणि तांत्रिक भागीदारीसाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

देशभरात प्रादेशिक फेऱ्यांद्वारे आयोजित 'आरई नॅशनल रिन्यूएबल एनर्जी क्विझ 2026' चा महाअंतिम सोहळा भारत मंडपम येथे संपन्न होईल. 'आरईजेन पॅव्हेलियन' मुळे विद्यार्थी, तरुण नवोन्मेषक, उद्योजक आणि संशोधकांना त्यांच्या कल्पना सादर करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी समर्पित व्यासपीठ उपलब्ध होईल.

ही शिखर परिषद B2B, B2G आणि G2G स्तरावरील सहभागाची संधी देईल, ज्याद्वारे गुंतवणूकदार, उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार आणि सरकारी प्रतिनिधी यांना गुंतवणुकीच्या संधी, भागीदारी आणि प्रकल्प विकासाच्या शक्यता डिस्कव्हर करण्यासाठी परस्परांशी जोडले जाईल.

अधिक माहितीसाठी, भेट द्या:  www.bresummit.in

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329772) अभ्यागत कक्ष : 15