अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने त्रिची विमानतळावर वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला; 45 जिवंत सरपटणारे प्राणी जप्त; दोघांना अटक


महसूल गुप्तचर संचालनालयाने त्रिची विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने केलेल्या गुप्तचर कारवाईत बँकॉकहून कोलंबोमार्गे आलेल्या प्रवाशांच्या सामानातून खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवलेले गुंगीचे औषध दिलेले सरपटणारे प्राणी जप्त केले

Posted On: 28 OCT 2026 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

महसूल गुप्तचर संचालनालयाने त्रिची विमानतळावरील हवाई गुप्तचर युनिटच्या समन्वयाने केलेल्या कारवाईत भारतात त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर 45 सरपटणाऱ्या प्राण्यांची तस्करी करण्याचे रॅकेट उघडकीस आणले. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर 2026 रोजी कोलंबोमार्गे बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली असता, खाण्याच्या 27 पाकिटांमध्ये लपवून ठेवलेले जिवंत वन्यजीव सापडले; हे प्राणी बेशुद्ध अवस्थेत होते.

जप्त केलेल्या  सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 23 कॉर्न स्नेक्स, 16 बॉल पायथन्स, 5 अर्जेंटाइन ब्लॅक अँड व्हाईट टेगूस आणि 1 स्नो व्हाईट इग्वाना यांचा समावेश होता. त्रिची येथील हवाई गुप्तचर युनिटच्या अधिकाऱ्यांनी  सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार या सरपटणाऱ्या प्राण्यांना जप्त केले आणि दोघांना अटक केली. प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जात असताना हे वन्यजीव आढळून आले आणि पुढील आवश्यक कारवाईसाठी ते तातडीने त्रिची येथील हवाई गुप्तचर युनिटकडे सुपूर्द करण्यात आले.

देशातील वन्यजीवांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या सहकार्याने केलेल्या या यशस्वी कारवाईतून वन्यजीव तस्करी रोखण्याची महसूल गुप्तचर संचालनालयाची वचनबद्धता दिसून येते.

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329486) अभ्यागत कक्ष : 8