वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि मेक्सिको यांच्यात प्राधान्य व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींना सुरुवात, कराराच्या कार्यकक्षेच्या अटींवर स्वाक्षरी


भारत आणि मेक्सिको यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक संबंध विस्तारण्यावर चर्चा, प्राधान्य व्यापार करारामध्ये प्रमुख व्यापार क्षेत्रांचा अंतर्भाव

Posted On: 28 OCT 2026 10:38AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

भारत आणि मेक्सिको यांनी आपसातील आर्थिक आणि व्यापारी बंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने प्राधान्य व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींना सुरुवात केली असून कराराच्या कार्यकक्षेच्या अटींवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये नवीन आर्थिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या वाटाघाटींसाठीची चौकट, व्याप्ती, कार्यपद्धती आणि आराखडा निश्चित होईल.

सध्या स्वाक्षरी केलेल्या कार्यक्षेत्रात परस्परांना लाभदायी आणि संतुलित प्राधान्य व्यापार कराराच्या वाटाघाटींचा समावेश असून त्यामाध्यमातून द्विपक्षीय व्यापार वाढवणे, व्यापाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि लवचिक तसेच वैविध्यपूर्ण मूल्य साखळीत योगदान देणे शक्य होईल. 

कॅनडा येथे झालेल्या G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर  जून 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष डॉ. क्लॉडिया शिनबॉम यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या घडामोडींना वेग आला. दोन्ही नेत्यांनी त्या बैठकीत भारत मेक्सिको भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सहमती दर्शवली होती.    

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या भेटीदरम्यान दोन्ही शिष्टमंडळांनी द्विपक्षीय संबंध आणि व्यापार तसेच गुंतवणुकीचा ओघ वाढवण्याच्या संधींवर विस्तृत चर्चा केली. या चर्चा मेक्सिकोचे परकीय व्यापार उपसचिव लुईस रोसेंडो गुटिरेझ रोमानो यांच्यासोबत झाल्या; त्यांनी अर्थमंत्री मार्सेलो एब्रार्ड कासाउबोन यांच्या वतीने यात सहभाग घेतला होता.

कराराच्या कार्यकक्षेच्या अटींमध्ये वाटाघाटींच्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश असून यामध्ये वस्तुंना बाजारपेठेत प्रवेश,  उत्पत्तीचे नियम, सीमाशुल्क प्रक्रिया आणि व्यापाराला पोषक वातावरण, वादविवाद निवारण, स्वच्छताविषयक आणि वनस्पती-आरोग्यविषयक उपाय, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि व्यापार उपाय इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. 

या प्रस्तावित कराराच्या माध्यमातून दोन्ही अर्थव्यवस्थांमधील एकमेकांना पूरक घटकांचा लाभ घेण्याचा आणि मेक्सिकन उत्पादने तसेच उद्योगांना भारतीय बाजारपेठेत विस्ताराच्या संधी निर्माण करुन देण्याचा प्रयत्न साधला आहे. जागतिक मूल्य साखळीशी असलेल्या मजबूत दुव्यांमुळे मेक्सिको हा देश भारतीय निर्यातदार आणि गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ ठरु शकतो. भविष्यात सहकार्याच्या महत्त्वपूर्ण क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहनउद्योग, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, कृषी उत्पादने, ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, वैद्यकीय उपकरणे आणि प्रगत उत्पादकता आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. 

शिष्टमंडळाने द्विपक्षीय आर्थिक आघाडीवरील विविध पैलूंवर चर्चा केली, तसेच व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करणे तसेच दोन्ही देशांच्या उत्पादक क्षेत्रातील सहकार्य वाढवून संबंध बळकट करण्यावर भर दिला. 

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी 2027 च्या पहिल्या तिमाहीत मेक्सिकोच्या व्यापारी प्रतिनिधीमंडळाचा भारत दौरा आयोजित करण्याच्या शक्यतेवरही पुढील चर्चा केली. प्रस्तावित व्यापारी दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिकांना परस्पर भेटीगाठी  आयोजित करण्याची संधी मिळेल. तसेच, व्यापाराच्या नवीन संधी शोधणे तसेच भारत आणि  मेक्सिको या दोन्ही देशांतील उत्पादन क्षेत्रांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे, हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असेल.

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329443) अभ्यागत कक्ष : 13