लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स सदस्य देशांच्या 12 व्या संसदीय मंच 2026 चे लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन; लोक-केंद्री विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी संसद व्यवस्था सक्षम करण्याचे आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत संयुक्त निवेदन एकमताने संमत होणे ही मोठी कामगिरी - लोकसभा अध्यक्ष

Posted On: 26 OCT 2026 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत संसद भवन संकुलात 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ब्रिक्स सदस्य देशांमधील सर्व सदस्यांना,लोक-केंद्री विकास, जागतिक शांतता, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीय सहयोग  अशी सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामुहिक निर्धार दृढ करण्याचे आवाहन केले. संसदीय कामकाजात देशात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असल्याचे सांगत, सर्वांसमोर असलेल्या सामाईक आव्हानांचा  सामना आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासह, जनतेच्या जीवनमानात अर्थपूर्ण, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामूहिक सूज्ञपणाची सांगड घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या संसदीय शिष्टमंडळांचे भारतात स्वागत करत,  या शिष्टमंडळांची उपस्थिती ही संवाद, संसदीय सहकार्य, परस्पर आदर आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे बिर्ला यावेळी म्हणाले. भौगोलिक, सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक विविधता असूनही, हे देश लोकशाही आदर्शांवरील विश्वासाने आणि मानवतेविषयीच्या समान जबाबदारीच्या भावनेने एकत्र जोडलेले आहेत, असे त्यांनी सांगितले. विविधतेचे रूपांतर सामर्थ्य, सामायिक उद्दिष्ट आणि सामूहिक प्रगतीच्या स्रोतामध्ये करण्याच्या क्षमतेतच ब्रिक्सचे खरे सामर्थ्य सामावलेले आहे, असेही बिर्ला यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत, संयुक्त निवेदनाचा प्रस्ताव एकमताने संमत होणे, हा या संघटनेच्या प्रवासातील मैलाचा टप्पा होता, असे सांगत त्यांनी सदस्य देशांची प्रशंसा केली. मात्र, आता पुढचे आव्हान, या संयुक्त निवेदनात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व तरतुदींची अंमलबजावणी प्रत्यक्षात करुन त्यांना मूर्त स्वरूप देणे आणि त्यातून दीर्घकालीन फल निष्पत्ती शोधणे, हे आहे, असे त्यांनी सांगितले.

जग सध्या गंभीर अनिश्चिततेच्या काळातून जात असल्याचे नमूद करत, बिर्ला यांनी प्रादेशिक संघर्ष, युद्धे, आर्थिक अस्थिरता, व्यापारविषयक तणाव, दहशतवाद आणि हवामान बदल यांमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या आव्हानांकडे लक्ष वेधले. या आव्हानांचे परिणाम राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जाणारे असून, त्यांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक जबाबदारीच्या भावनेची आवश्यकता आहे, असे ते पुढे म्हणाले.जागतिक स्तरावरील अशा आव्हानात्मक परिस्थितीत संवाद, राजनैतिक मुत्सद्देगिरी आणि सहकार्य यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जनतेच्या इच्छेचे प्रभावी प्रतिबिंब असलेल्या संसद या परस्पर सामंजस्याचे पूल म्हणून काम करू शकतात, परस्पर विश्वास दृढ करू शकतात, आंतरराष्ट्रीय तणाव कमी करू शकतात आणि जागतिक आव्हानांना शांततापूर्ण व विधायक पद्धतीने सामोरे जाण्यास मदत करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

ब्रिक्स संघटनेने, ग्लोबल साऊथ चा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांच्या महत्वाकांक्षा जागतिक व्यासपीठावर  पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडल्याचेही त्यांनी सांगितले. या महत्वाकांक्षा आता केवळ संवाद आणि जाहिरनामे यांच्यापुरत्याच मर्यादित न राहता, त्यांना प्रतिसाद देणारी धोरणे, प्रत्यक्ष सहकार्य आणि सामूहिक उपक्रमांची जोड द्यायला हवी, जेणेकरून त्यातून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारेल, अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली.

‘लोककेंद्रित विकासासाठी संसदांना सक्षम करणे’  ही  12 व्या ब्रिक्स संसदीय मंच 2026ची संकल्पना असून याविषयी बोलताना बिर्ला यांनी समकालीन जागतिक परिस्थितीच्या संदर्भात या संकल्पनेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. हा दोन दिवसीय कार्यक्रम लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या परस्परांशी निगडित चार प्रमुख स्तंभांवर सर्वंकष चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देईल. परस्परावलंबी होत चाललेल्या जगात लोकशाही संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी हे चारही स्तंभ अत्यंत आवश्यक आहेत.

शाश्वत विकासाच्या आवश्यकतेवर भर देताना   ओम बिर्ला यांनी सांगितले की, भारतीय तत्त्वज्ञानानुसार विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण या परस्परपूरक आणि एकमेकांना बळकटी देणाऱ्या प्रक्रिया आहेत. हा सर्वांगीण दृष्टिकोन ब्रिक्स देशांच्या संसदांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्व ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. विकास हा कधीही पर्यावरणीय संतुलनाची किंमत मोजून होता कामा नये तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठीच्या योजनांना पर्यावरणीय जबाबदारी, दीर्घकालीन शाश्वतता आणि आपल्या भावी पिढ्यांच्या हितांचे रक्षण करण्याच्या दृढ बांधिलकीने त्यांना आकार देणे महत्त्वाचे आहे.

नवीन पिढीच्या आशा आकांक्षांकडे लक्ष वेधताना बिर्ला यांनी सांगितले की आजच्या युगातील युवावर्गाला दर्जेदार शिक्षण आणि तांत्रिक ज्ञान उपलब्ध असून त्याचबरोबरीने समाजाला योगदान देण्यासाठी नवोन्मेष आणि उत्कृष्टतेचा ध्यास आहे. या महत्त्वाकांक्षांना अर्थपूर्ण संधींची जोड मिळाले आणि त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल असे पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. युवकांचे विचार आणि मते जाणून घेणे, त्यांच्या आशा-आकांक्षा व चिंता समजून घेणे आणि त्यांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि  क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यात उपयोगात आणण्यासाठी योग्य मार्ग निर्माण करणे, ही संसदांची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

ब्रिक्स सदस्य देशांमधील राष्ट्रीय परिस्थिती, विकासाची प्राधान्य क्षेत्रे आणि दृष्टिकोन हे घटक भिन्न असले तरी ते सर्व शांतता, सुरक्षा, परस्पर आदर, समान संधी आणि त्यांच्या नागरिकांसाठी उत्तम आयुष्य या समान मूलभूत आकांक्षांनी बांधले गेले आहेत, असे बिर्ला यांनी सांगितले. या सामायिक आकांक्षा अधिक सखोल संवाद आणि उद्देशपूर्ण सहकार्यासाठी भक्कम पाया प्रदान करतात, असे ते म्हणाले. त्यामुळे या समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी परस्पर विश्वास निर्माण करणे, एकमेकांविषयी  समज आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे तसेच सामूहिक कृतीला चालना देणे, यासाठी ब्रिक्स संसदीय मंचाने एक गतिमान व्यासपीठ म्हणून उदयास यावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(Release ID: 2328689) अभ्यागत कक्ष : 7