Posted On:
25 OCT 2026 7:49PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 25 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या नेदरलँड्स दौऱ्याचा प्रारंभ केला. भारत आणि नेदरलँड्स दरम्यानचे आर्थिक संबंध अधिक बळकट करणे, व्यापार व गुंतवणुकीच्या नवीन संधी शोधणे आणि भारतीय समुदायासोबतची भागीदारी अधिक दृढ करणे यावर केंद्रित विविध कार्यक्रमांचा यात समावेश होता.
या दौऱ्यात रॉटरडॅम येथील सागरी आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा, आम्सटरडॅममध्ये भारतीय समुदायाशी संवाद, तसेच प्रसिद्धी माध्यमांशी साधलेला संवाद यांचा समावेश होता.
रॉटरडॅममधील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पीयूष गोयल यांनी तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी बाउडेविज्न सायमन्स यांच्यासोबत रॉटरडॅम बंदराची पाहणी केली. युरोपमधील सर्वात मोठे बंदर असलेले रॉटरडॅम हे भारतीय वस्तूंच्या युरोपीय बाजारपेठेतील प्रवेशासाठीचे मुख्य द्वार असून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीचा एक प्रमुख केंद्रबिंदू आहे; या भेटीमुळे त्याचे हे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित झाले.
केंद्रीय मंत्र्यांच्या रॉटरडॅम बंदर भेटीने युरोपचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून नेदरलँड्सचे धोरणात्मक महत्त्व विशेषतः भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या (India-EU FTA) पार्श्वभूमीवर अधोरेखित केले. या करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अशा वेळी नेदरलँड्सची जागतिक दर्जाची बंदरे, लॉजिस्टिक पायाभूत सुविधा आणि युरोपीय बाजारपेठांशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी व्यापार वाढवण्यासाठी तसेच भारत आणि युरोपमधील पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
यासोबतच, मंत्र्यांनी व्हॉल्डॉर्फ ॲस्टोरिया ऍम्स्टरडॅम येथे नेदरलँड्समधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या 'हाय टी' कार्यक्रमादरम्यान भारतीय समुदायाशी संवाद साधला. या कार्यक्रमाला सुमारे 70 नागरिक उपस्थित होते. यामध्ये व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसह भारतीय समुदायातील प्रतिनिधी एकत्र आले होते. या निमित्ताने तेथील भारतीय प्रवाशांशी थेट संवाद साधण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली.
या संवादातून भारत आणि नेदरलँड्समधील संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि द्विपक्षीय आर्थिक, सांस्कृतिक व परस्पर संबंध वाढवण्यात भारतीय समुदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
पीयूष गोयल यांच्या या दौऱ्याने व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य पुढे नेण्यासाठी डच भागधारकांशी सतत संवाद राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच, भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार आणि भारत व युरोपमधील घट्ट आर्थिक एकात्मतेच्या संदर्भासह सागरी लॉजिस्टिक व परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत सहकार्याच्या संधींवर या कार्यक्रमाने भर दिला.
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com