संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाचा पथदर्शी उपक्रम, स्वावलंबन 2026 अंतर्गत उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि स्वदेशी संरक्षण क्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाणार


नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन सेमिनार अर्थात नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवादाची पाचवी आवृत्ती 26-27 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजित केली जाणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 26 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत स्वावलंबन 2026च्या पूर्ण सत्राला उपस्थित राहणार

Posted On: 24 OCT 2026 11:30AM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचा पथदर्शी उपक्रम, नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन सेमिनार - स्वावलंबन 2026 ची पाचवी आवृत्ती 26-27 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे आयोजित केली जाईल. नवोन्मेष आणि स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती ही या परिसंवादाची मुख्य संकल्पना असेल. या कार्यक्रमात सशस्त्र दल, उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार एकत्र येऊन स्वदेशी तांत्रिक नवोन्मेषाला चालना देतील आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळकट करतील.

2022 मध्ये सुरू झालेला स्वावलंबन'उपक्रम आता एक राष्ट्रीय व्यासपीठ बनला आहे, जो भारतीय नौदलाच्या गरजांनुसार भारतीय उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राच्या तांत्रिक क्षमता यांची सांगड घालणारा आहे. या उपक्रमाचा उद्देश, स्वदेशी नवोन्मेषापासून प्रत्यक्ष वापरायोग्य उपकरण निर्मितीच्या क्षमतेपर्यंतचा प्रवास गतिमान करणे, सागरी सज्जता वाढवणे आणि आत्मनिर्भरता अधिक दृढ करणे हा आहे.

(https://www.pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1842970)

या कार्यक्रमांतर्गत आयोजित प्रदर्शनात सागरी गस्त ठेवणे, ड्रोनविरोधी प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान, एनबीसीडी, अणु, जैविक, रासायनिक आणि आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा, तसेच कार्यक्षमता वाढवणारी विविध स्वदेशी उत्पादने प्रदर्शित केली जातील. यासोबतच, कल्पनेपासून ते प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा प्रवास दर्शवणारी यशस्वी उदाहरणेही मांडली जातील.

या परिसंवादात क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त प्रणाली आणि हायपरसॉनिक तंत्रज्ञान यांसारख्या भविष्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा केली जाईल. यामध्ये भविष्यातील युद्ध आणि नौदल मोहिमांमध्ये या तंत्रज्ञानाचा संभाव्य वापर कसा होऊ शकतो, यावर विशेष भर दिला जाईल. याव्यतिरिक्त, आत्मनिर्भरता बळकट करणे, आय-डेक्स  व्यवस्थेचा विस्तार करणे, देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवणे, शैक्षणिक क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअप्सना त्यांच्या आशादायक स्वदेशी तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यास मदत करणे, या विषयांवर स्वतंत्र सत्रांचे आयोजन केले जाईल. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्टसोबतच्या संवादामुळे आश्वासक संरक्षण उद्योगांना निधी मिळवण्याच्या, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या आणि उत्पादनांचे व्यापारीकरण करण्याच्या संधी उपलब्ध होतील.

या परिसंवादाच्या पूर्ण सत्राला, 26 ऑक्टोबर 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या सत्रात, संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम  आणि स्वदेशीकरणासाठी योगदान दिल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रातील भागीदारांचा सत्कार केला जाईल. या प्रसंगी 'स्वावलंबन 5.0 दस्तऐवज आणि 'तंत्रज्ञानविषयक अत्यावश्यक बाबींवरील संग्रह  देखील प्रकाशित केले जातील. हे दस्तऐवज भारतीय नौदलाच्या तांत्रिक प्राधान्यक्रम, कार्यात्मक गरजा आणि स्वदेशी विकासाच्या संधींवर लक्ष केंद्रित करून चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतील.

हा कार्यक्रम भारतीय नौदलाच्या संरक्षण नवोन्मेष संघटना आणि भारतीय संरक्षण उत्पादकांची संघटना  यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.

***

राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2328111) अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein: English