Posted On:
24 OCT 2026 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 24 ऑक्टोबर 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज नवी दिल्लीत, दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (डीएलटीए) टेनिस क्रीडागार इथे अखिल भारतीय लॉन टेनिस असोसिएशनच्या (एआयटीए) एसीई 2032 उपक्रमांतर्गत आयोजित, केवळ महिलांसाठीच्या प्रशिक्षक अभ्यासक्रमातील सहभागींना संबोधित केले. यावेळी बोलताना, मुलभूत स्तरावरील सहभाग तसेच प्रशिक्षणापासून उत्कृष्ट कामगिरी आवश्यक असलेल्या स्पर्धा तसेच नेतृत्वापर्यंत, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक टप्प्यावर महिलांसाठी संधींचा विस्तार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
डीएलटीएचे अध्यक्ष रोहित राजपाल; एआयटीएचे प्रशिक्षण संचालक कवलजित सिंह; डेव्हीस चषक प्रशिक्षक आशुतोष सिंह, एआयटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एआयटीएचे खजिनदार दिनेश अरोरा, तसेच बीजेकेसी चषकाशी संबंधित प्रशिक्षक राधिका कानिटकर यांसारखे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रशिक्षक आणि क्रीडा व्यावसायिकांनी प्रशिक्षकांचे शिक्षण, मुलभूत पातळीवरील टेनिस तसेच क्रीडापटूंचा विकास यांना बळकटी देण्याबाबत आपापले दृष्टीकोन यावेळी मांडले.

मूलभूत स्तरापासून उच्च क्षमतेची कामगिरी करण्याप्रर्यंत प्रत्येक पातळीवर महिलांच्या सहभागाचा विस्तार
आघाडीचे क्रीडा राष्ट्र होण्याची भारताची महत्त्वाकांक्षा, खेळातील नैपुण्य लवकर ओळखणे तसेच महिला आणि मुलींना पात्र प्रशिक्षक, सुयोग्य पायाभूत सुविधा, नियमित स्पर्धा आणि सातत्यपूर्ण पाठबळ मिळेल याची खातरजमा करून घेणे यावर अवलंबून आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या ग्रामीण, आदिवासी, निम-शहरी तसेच शहरी समुदायांमध्ये क्रीडाविषयक कौशल्ये अस्तित्वात आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या क्रीडाविषयक प्रतिभेच्या साठ्याचा विस्तार करणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये देशाला यश मिळण्याच्या शक्यता मजबूत करण्यासाठी सहभागाचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी या क्षेत्रात असलेल्या संधी केवळ खेळ खेळण्याच्या स्तरापलीकडे जाऊन प्रशिक्षण, क्रीडाविज्ञान, प्रशासन, स्पर्धा व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक भूमिकांपर्यंत विस्तारायला हव्यात ही बाब देखील त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमातील चर्चांमध्ये, भारतातील खेळाडूंना संघटीत क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होता येण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आराखड्यांतर्गत अस्मिता महिला लीग बजावत असलेल्या भूमिकेवर अधिक भर देण्यात आला. वर्ष 2021 मध्ये सुरु करण्यात आलेल्या या लीग्ज, विविध भागांमध्ये तसेच समुदायांमध्ये सहभाग आणि स्पर्धेच्या संधी निर्माण करत तीन लाखांहून अधिक महिलांपर्यंत पोहोचल्या आहेत.
महिला प्रशिक्षकांच्या अधिक सशक्त मनुष्यबळाची उभारणी
पात्र महिला प्रशिक्षकांच्या संख्येत वाढ करणे आणि राज्यांमध्ये प्रशिक्षक शिक्षण तसेच प्रमाणीकरण यांची उपलब्धता विस्तारणे यावर या अभ्यासक्रमात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या क्षेत्रात महिलांच्या अधिक सहभागामुळे मुलींना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यात मदत होईलच पण त्याचसोबत खेळाडूंच्या विकासाचा दर्जा आणि व्याप्ती यांना अधिक बळकटी मिळेल.
क्रीडा कौशल्याचा शोध आणि खेळाडूंच्या उत्तम विकासाशी प्रशिक्षक शिक्षणाला जोडून घेणे हा एआयटीए एसीई 2032 उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांनी, स्पर्धात्मक खेळांच्या गरजांसाठी प्रशिक्षकांना सज्ज करण्यात व्यावहारिक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशिक्षण आणि खेळाडूंच्या विकासातील प्रादेशिक दृष्टीकोन
यावेळी सहभागींनी मूलभूत स्तरावरील टेनिस खेळाला बळकटी देण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या पद्धती सुधारण्याच्या संदर्भात आपापल्या भागांच्या बाबतीतील विचार मांडले.

उपस्थितांनी केलेल्या चर्चांमध्ये विकासाच्या विविध पातळ्यांवर असलेल्या आणि वैविध्यपूर्ण प्रादेशिक परिस्थितींमधील खेळाडूंच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात निर्धोक आणि शाश्वत कारकीर्द घडवणे
या अभ्यासक्रमामुळे, प्रशिक्षण, तंदुरुस्तीसंदर्भातील प्रशिक्षण, क्रीडाविज्ञान, क्रीडास्पर्धा व्यवस्थापन आणि प्रशासनासह क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक संधींची विस्तारत जाणारी श्रेणी अधिक ठळकपणे दिसून आली.

एआयटीए एसीई 2032 अंतर्गत केवळ महिला प्रशिक्षकांसाठीच्या या अभ्यासक्रमातून भारतीय क्रीडा विश्वात महिलांचा सहभाग तसेच नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येणारे प्रयत्न दिसून आले. प्रशिक्षणाच्या संधींचा विस्तार करून, मूलभूत पातळीवरील क्रीडा प्रतिभांना पाठबळ पुरवून आणि उत्कृष्ट कामगिरी असलेल्या खेळांकडे जाण्याचे मार्ग अधिक सुकर करुन हा उपक्रम 2036 साठी भारताने निश्चित केलेल्या क्रीडा महत्त्वाकांक्षेत तसेच विकसित भारत @2047 च्या संकल्पनेत योगदान देण्याचा प्रयत्न करतो.
***
राधिका अघोर/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com