Posted On:
24 OCT 2026 4:51PM by PIB Mumbai
तीन दिवसीय 'इंडिया केम-2026' या कार्यक्रमाचा आज मुंबईत समारोप झाला. 'ॲडव्हान्टेज भारत: अँन इमर्जिंग ग्लोबल केमिकल्स हब' या संकल्पनेखाली 22 ऑक्टोबरपासून आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या 'इंडिया केम 2026' ने जागतिक भागीदारीला बळकटी दिली. तसेच रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा मार्ग सुकर केला.
या कार्यक्रमादरम्यान सीईओ फोरम, भारत-जपान, भारत-अमेरिका आणि भारत-युरोपियन युनियन फोरममध्ये विचारमंथन करणारी सत्रे, व्यावसायिक बैठका आणि फलदायी चर्चा झाल्या. तसेच रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबंधित विविध आव्हानांवर गोलमेज चर्चांचे आयोजन झाले.
भारताचे, विशेषतः रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात भक्कम व्यापारी संबंध असलेला जपान या कार्यक्रमासाठी भागीदार देश होता.
'इंडिया केम 2026' चे उद्घाटन करताना केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी रसायन क्षेत्रातील उद्योग प्रमुख, गुंतवणूकदार, नवसंशोधक आणि धोरणकर्त्यांना ViksitBharat@2047 चे ध्येय गाठण्यासाठी परस्पर सहकार्याने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशाचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल उपस्थित होत्या.

रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योग हे विकासाला खूप मोठ्या प्रमाणाला चालना देणारे क्षेत्र आहे आणि यामध्ये वाढ करण्याची तसेच आर्थिक विकासात योगदान देण्याची प्रचंड क्षमता आहे, असे नड्डा म्हणाले.
2047 सालापर्यंत 'विकसित भारत' बनण्याचे देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या क्षेत्राने असाधारण भूमिका बजावली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. या क्षेत्राला त्याच्या सध्याच्या बाजारपेठेच्या आकारमानानुसार सुमारे 220 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 2040 पर्यंत सुमारे 1 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत सुमारे 1.6 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईओ फोरममध्ये उद्योग, स्पर्धात्मकता मजबूत करणे आणि भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक रसायन आणि पेट्रोकेमिकल हब म्हणून पुढे आणण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला गती देण्यावर भर देण्यात आला. जगभरातील उद्योग प्रमुखांनी भारतीय रसायन उद्योगातील संधी आणि आव्हानांवर चर्चा केली. 'इंडिया केम 2026' मधील भारत-जपान, भारत-अमेरिका आणि भारत-युरोपियन युनियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स फोरमअंतर्गत झालेल्या विचारमंथन सत्रांदरम्यान, प्रतिनिधी आणि उद्योग प्रमुखांनी या क्षेत्राशी संबंधित व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानामधील सखोल सहकार्याच्या संधींची चाचपणी केली. 'ऍडव्हान्टेज भारत: ऍन इमर्जिंग ग्लोबल केमिकल्स हब' या संकल्पनेखाली आयोजित या कार्यक्रमात विशेष प्रकारची रसायने, रसायन आणि पेट्रोकेमिकल्ससाठी पायाभूत सुविधा, ॲग्रोकेमिकल्स, पर्यावरणीय मुद्दे, प्लांट मशिनरी, पंप्स आणि व्हॉल्व्ह्स यांसारख्या विषयांवरील विविध गोलमेज चर्चा झाल्या. 'इंडिया केम 2026' च्या 14 व्या आवृत्तीत 'इंडिया केम यूथ इनोव्हेशन चॅलेंज' हा नवीन उपक्रम पाहायला मिळाला. तरुण नवसंशोधकांना भारताच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राशी जोडण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात रसायन उद्योगाच्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि त्यांनी शोधलेल्या उपायांचे मूल्यांकन उद्योगातील तज्ज्ञांच्या ज्युरीद्वारे करण्यात आले.

आयसीटी (ICT), मुंबईचे विद्यार्थी सौम्या भोळे आणि सार्थक काळे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. व्हीएनआयटी (VNIT), नागपूरच्या सुमन बटवे आणि सलोनी म्हादेसर तसेच आयआयटी (IIT), गांधीनगरच्या जश प्रसाद आणि स्मित बांभोरलिया यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले. रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग आणि फिक्की (FICCI) द्वारे संयुक्तपणे आयोजित या समांरभाने उद्योग प्रमुख आणि सरकारी प्रतिनिधींना या क्षेत्राशी संबंधित विशिष्ट विषयांवर विचारमंथन करण्यासाठी, गुंतवणुकीच्या शक्यता, नियामक आराखडे आणि धोरणात्मक आव्हानांवर संवादाची सुविधा उपलब्ध करून दिली.


या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात या क्षेत्रातील प्रमुख भारतीय आणि जागतिक कंपन्यांचे तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि बिहार या भागीदार राज्यांसह अनेक भारतीय राज्यांची दालने उभारण्यात आली होती. या कार्यक्रमात जपान, अमेरिका, कॅनडा, युके, युरोपियन युनियनमधील देश, लॅटिन अमेरिका, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि आसियान देशांसह अनेक देश सहभागी झाले. तसेच 3 दिवसांत 5000 हून अधिक अभ्यागतांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com