Posted On:
23 OCT 2026 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई इथल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने, म्हणजेच आयसीएआर सीआयआरसीओटीने, 22 ऑक्टोबर 2026 रोजी चेंगलपट्टू इथल्या ट्रस्ट एआरएस रबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी कापूस वेचणाऱ्या कामगारांसाठी संरक्षक हातमोज्यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सामंजस्य करार केला.
या तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे या हातमोज्यांचे व्यावसायिक उत्पादन आणि विक्री सुलभ होईल, तसेच ते अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. याचा थेट लाभ, कापूस उत्पादक शेतकरी आणि कृषी कामगारांना होणार आहे. योग्य संरक्षक उपकरणांच्या वापराला प्रोत्साहन देऊन हातांना होणाऱ्या जखमा कमी करणे, कामाची परिस्थिती सुधारणे आणि अधिक सुरक्षित पद्धतीने कापूस वेचणी करायला चालना देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कृषी मजुरांचे सर्वंकष कल्याण साधण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत होईल.

कापूस वेचणीच्या कामादरम्यान कामगारांची सुरक्षितता आणि संरक्षण वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. विशेष रचनेचे हे हातमोजे कापसाच्या बोंडावरच्या टोकदार आवरणामुळे हातांना होणाऱ्या जखमांपासून संरक्षण देतात. त्याच वेळी ते वापरताना हातांची सुलभतेने हालचाल करणे शक्य होईल आणि वापरताना आराम मिळेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. हे हातमोजे पुन्हा वापरता येण्याजोगे आणि टिकाऊ असल्यामुळे शेतीतल्या कठीण परिस्थितीत वारंवार वापरण्यासाठी योग्य आहेत.
या सहकार्यामुळे उद्योग आणि संशोधन संस्थांमधली भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. तसेच आयसीएआर सीआयआरसीओटीने विकसित केलेल्या तांत्रिक नवकल्पनांचे कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त व्यावहारिक पातळीवर रूपांतर करण्यासाठीही मदत होणार आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून आयसीएआर सीआयआरसीओटीने शेतातल्या प्रत्यक्ष समस्या सोडवणारे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवणारे आणि कापूस मूल्यसाखळीतल्या विविध घटकांचे जीवनमान सुधारणारे, गरजाधारित तंत्रज्ञान विकसित करून त्याचे हस्तांतरण करण्याविषयी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.
* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai