कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माणसे आणि शेती दोन्ही वाचवा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते कर्नाल इथल्या तरावडी येथून देशव्यापी खेत बचाओ अभियानाचा प्रारंभ


22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हे अभियान देशभरात राबवले जाणार, लोकजागरूकता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञ देशभरातील गावांना भेटी देणार - शिवराज सिंह चौहान

Posted On: 22 OCT 2026 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज हरयाणातील कर्नाल जिल्ह्यातील ऐतिहासिक तरावडी शहरातून देशभरात खेत बचाओ अभियानाचा प्रारंभ केला. देशभरातील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी संस्थांमधून लाखो शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकारी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. या सहभागींना केंद्रीय मंत्री चौहान यांनी संबोधित केले. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा असंतुलित वापर नियंत्रणात आणला नाही, तर ही जमीन भविष्यात पिके घेण्यास नकार देऊ शकते आणि मानवी शरीर आजारांचे उगमस्थान बनू शकते असा इशारा त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर, 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरातील प्रत्येक गावात व्यापक लोकजागरूकता अभियान राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.

खतांच्या किमती आणि शेतकऱ्यांप्रती सरकारच्या वचनबद्धतेबद्दलही त्यांनी सांगितले. परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध होत आहेत म्हणून त्यांचा अतिवापर करावा असे नाही असा सावधगिरीचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. कमी किमतीत खते मिळतात म्हणून आपण आपल्या शेतात युरियाच्या चार चार पोत्यांचा मारा करू नये असे ते म्हणाले. खतांचा जास्त मारा केल्याने जास्त उत्पादन मिळते हा एक गैरसमज आहे. गरजेपेक्षा जास्त खतांचा वापर करणे म्हणजे स्वतःचा कष्टाचा पैसा वाया घालवणे आणि जमिनीला विष खाऊ घालण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आपल्या प्रयोगशाळा तसेच कार्यालयांतून बाहेर पडावे आणि देशभरातील गावांना प्रत्यक्ष भेटी द्याव्यात असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. या सगळ्यांनी गावपातळीवर बैठका घ्याव्यात, शेतकऱ्यांसोबत चर्चांचे आयोजन करावे, जमिनीचे आरोग्य आणि संतुलित शेती पद्धतींचे महत्त्व समजावून सांगावे, असे त्यांनी सुचवले. या अभियानात स्वतः जमिनीवर उतरून सक्रियपणे सहभागी होण्याचा आणि हा उपक्रम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून भारतातील शेतीयोग्य जमीन ओसाड होण्यापासून वाचवण्यास मदत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

   

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327050) अभ्यागत कक्ष : 9